केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा खळबळजनक दावा
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या जुहू येथील बंगल्याची पाहणी करणे आणि बेकायदा बांधकामाची मोजणी करण्यासंदर्भात नोटीस पाठवली. यानंतर लगेचच नारायण राणे यांनी ट्विट करत खळबळजनक दावा केला आहे. मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले, असे राणे यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. राणे यांच्या या ट्विटमुळे शिवसेना विरुद्ध नारायण राणे हा संघर्ष आता अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियन प्रकरणांचाही उल्लेख केला आहे. या दोन्ही प्रकरणांची चौकसी पुन्हा होईल असे नारायण राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच त्यानंतर त्यांनी मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचेही म्हटले आहे. मात्र हे चौघे कोण याचा उल्लेख राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये केलेला नाही.
नारायण राणे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी. लवकरच सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली त्यांचीही चौकशी परत होईल. एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले.
शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन भाजप नेते किरीट सोमय्या आणि भाजप नेत्यांवर आरोप करत हल्ला चढवला होता. त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवली. आता मुंबई महापालिकेकडून राणे यांना नोटीस बजावण्यात आल्यानंतर हा वाद अधिक चिघळणार अशी चर्चा सुरू असतानाच आता राणे यांनी ट्विट करत हा नवा गौप्यस्फोट केला आहे.