मुंबई : मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायिका वैशाली भैसने हिच्या जीवाला धोका असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैशालीने फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. या पोस्टमुळे एकच खळबळ उडाली आहे.
काही लोकांकडून माझ्या जिवाला धोका आहे. माझ्या हत्येचा कट रचला जातोय. 2 दिवसानंतर पत्रकार परिषद घेऊन याचा गौप्यस्फोट मी करणार आहे. आज मला तुमच्या सपोर्टची गरज आहे, अशी पोस्ट वैशालीने केली आहे. दरम्यान, चाहत्यांनी तिला काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
वैशाली भैसने सारेगमप या मराठी गायन रिअॅलिटी शोची विजेती राहिली आहे. तसेच तिने 2009 मध्ये हिंदी सारेगमपच्या विजेतेपदाचाही मान पटकावला होता. सूर नवा ध्यास नवा, बिग बॉस मराठी यासारख्या शोमध्येही ती झळकली.”बाजीराव मस्तानी” या चित्रपटात वैशालीने ‘पिंगा’ हे गाणं गायले. त्यानंतर तिने ”कलंक” या चित्रपटात ”घर मोरे परदेसिया” हे गाणं गायले आहे. याशिवाय तिने कुलवधू, होणार सून मी ह्या घरची, माझ्या नवऱ्याची बायको यासारख्या लोकप्रिय मराठी मालिकांची शीर्षकगीते गायली आहेत. वैशालीने काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तिच्याकडे विदर्भाचे विभागीय अध्यक्षपद सोपवण्यात आले होते.