संगीत, तेही सिने संगीत आणि त्यातून हिंदी चित्रपट संगीत म्हणजे भारतीय समाजजीवनाचा जीव की प्राण. देशभरात अनेक भाषा जरी असल्या तरी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वांना भावते ते हिंदी चित्रपट संगीत. त्यात भाषिक, प्रांतिक भेदाभेद कधीच दिसून येत नाही. म्हणूनच हिंदी चित्रपट उद्योग हा सर्वसमावेषक आणि देशभरातील नागरिकांना एकत्र आणणारा आणि लोकप्रिय असा उद्योग असल्याने त्यातील संगीतही तसेच सर्वांना एका माळेत बांधणारे असेच म्हटले पाहिजे. तुमच्याकडे चांगले, आगळेवेगळे टॅलेंट असेल आणि स्वत:ला सिद्ध करण्याची तुमची तयारी असेल तर हे उद्योग क्षेत्र तुम्हाला लोकप्रियतेच्या अत्युच्च शिखरावर घेऊन जाईल आणि तसे कित्येक उदाहरणांवरून स्पष्ट झाले आहे. याच वैशिष्ट्यामुळे वेगवेगळ्या प्रांतातील व कोणत्याही क्षेत्रातील कलावंत येथे येतो आणि इथलाच होऊन जातो आणि सर्वांच्या गळ्यातला ताईत बनतो. म्हणूनच पश्चिम बंगालच्या जलपायगुडीमध्ये जन्मलेले अलोकेश लाहिरी म्हणजेच आपले बप्पी लाहिरी हे सिनेसंगीत – मनोरंजन विश्व आणि चाहत्यांमध्ये ‘बप्पी दा’ या नावाने लोकप्रिय झाले. त्यांचे आई-वडील अपरेश लाहिरी आणि बन्सुरी लाहिरी हे दोघेही बंगाली गायक आणि शास्त्रीय व श्यामा संगीतातील संगीतकार होते. पण त्यांच्या मुलाने शस्त्रीय संगीतापेक्षा त्या काळात भारतीयांना नवीन असणाऱ्या अशा डिस्को संगीताकडे त्यांनी आपला मोर्चा वळवला आणि ते देशभरात ‘डिस्को संगीता’चा एक अनोखा माहोल त्यांनी आपल्या कैशल्याने बनविला. ८० च्या दशकात तर त्यांनी आपल्या अनोख्या संगीताने तरुणाईला थिरकवायला लावले आणि अक्षरश: वेड लावले. त्यांनी पाश्चमात्य धाटणीच्या संगीताला आपल्या देशात मोठी लोकप्रियता मिळवून दिली.
बप्पी लाहिरी यांनी १९७०-८० च्या दशकाच्या उत्तरार्धात बप्पी दांनी ‘चलते चलते’, या चित्रपटास दिलेले संगीत लोकांना खूपच आवडले. याच चित्रपटातील ‘चलते चलते, मेरे ये गीत याद रखना…कभी अलविदा ना कहेना…’ या गाण्याने सिनेरसिक भारावून गेले. त्याच गाण्याची जादू आजही कायम असलेली दिसते. याचे कारण कोणत्याही कार्यक्रमात किंवा निरोप समारंभात हे गाणे हमखास गायले जाते आणि त्याच्या जादूत उपस्थित रसिक हेलावून जातात आणि पुन:श्च हरिओम म्हणत नव्या उमेदीने पुढच्या कामाला लागतात याचा अनुभव हा अनेकांना आलाच असेल हे निश्चत. विशेष म्हणजे बप्पी लाहिरी यांची शेकडो गाणी हिट झालेली आहेत. त्यांनी संगीत दिलेल्या अनेक चित्रपटांनी सिल्व्हर ज्युबिलीही केलेली आहे. एवढ्या सर्व गाण्यांमध्ये बप्पीदांचे सर्वात आवडते गाणे म्हणजे, ‘चलते, चलते मेरे ये गीत याद रखना’ हे असल्याचे एका मुलाखतीमध्ये त्यानी सांगितले होते. जगभरात कुठेही म्युझिक कॉन्सर्ट किंवा कार्यक्रम झाला तरी त्याचा शेवट याच गाण्याने करत असल्याचे बप्पीदांनी सांगितले होते. किशोर कुमार यांना बप्पीदा हे किशोर मामा म्हणायचे. त्याचे कारण म्हणजे किशोर कुमार हे नात्याने त्यांचे मामा लागत होते. ‘चलते-चलते’ हे गाणं गाताना त्यावेळी किशोर मामांनाही अश्रू अनावर झाले होते असा किस्साही ते सांगत. त्यामुळे आपल्या जीवनात हे गाणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे बप्पीदांनी सांगितले होते. त्यानंतर मिथून चक्रवर्ती याची भूमिका असलेल्या ‘डिस्को डान्सर’ने तर हंगामा केला होता.
शाळा – कॉलेजच्या विद्यार्थ्यांबरोबरच संपूर्ण तरूण पिढीला तेव्हा या गाण्याने डिस्कोची झिंग चढली. प्रत्येकजण डिस्को डान्सच्या प्रेमात पडला आणि डिस्को गाणे व नृत्य प्रकार शिकून घेऊ लागला. त्यानंतर प्रत्येक कार्यक्रमांमध्ये त्याकाळी ‘डिस्को’ची फर्माईश तर हमखास केली जायची… इतकेच नव्हे तर ‘डिस्को’ हे आगामी काळातील अनेक चित्रपटांचे अविभाज्य अंग बनलेले दिसले. लोकांची आवड लक्षात घेऊन निर्माते, दिग्दर्शक हे तेव्हा आपल्या चित्रपटात एकतरी ‘डिस्को’ गाणे असावे याचे कटाक्षाने भान ठेवत. याच चित्रपटानंतर मिथुन चक्रवर्ती तर एका रात्रीत स्टार झाला आणि त्याची लोकप्रियता अफाट वाढली होती. मिथुनला तर ‘डिस्को डान्सर’ ही नवी ओळख बप्पी दा यांच्यामुळेच मिळाली. भारताला डिस्को संगीताची ओळख करुन देणाऱ्या गायकांपैकी एक मानले जातात. त्यांनी भारतीय चित्रपटात सिंथेसाईज डिस्को संगीताचा वापर लोकप्रिय केला आणि स्वतःच्याही काही रचना गायल्या. त्यांनी बंगाली चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले होते. वारदात, डिस्को डान्सर, नमक हलाल, शराबी, डान्स डान्स, कमांडो, साहेब, गँग लीडर, सैलाब यासारख्या सिनेमांतील त्यांची गाणी प्रचंड गाजली होती. थानेदार सिनेमातलं ‘तम्मा – तम्मा’, द डर्टी पिक्चरमधलं ‘ऊलाला ऊलाला’, साहेब मधलं ‘यार बिना चैन कहाँ रे’ ही गाणी प्रचंड गाजली. त्यांना अमेरिकन पॉप स्टार एल्विस प्रेस्ली खूप आवडत व त्यांचा प्रभावही त्यांच्यावर होता. एका कॉन्सर्टमध्ये प्रेस्लीने गळ्यात सोन्याची चेन घातलेली त्यांना भावली होती. प्रेस्लीला पाहिल्यानंतर त्यांनी ठरवून टाकले की वाटायचे की, आपण जेव्हा यशस्वी कलावंत बनू व स्वत:ची वेगळी प्रतिमा तयार करू त्यावेळी प्रेस्लीप्रमाणे सोने परिधान करायचे. त्यामुळेच गळ्यामध्ये सोन्याच्या साखळ्या, हातात अंगठ्या असे मोठ्या प्रमाणावर सोने ते नेहमी परिधान करीत असत.
अलीकडेच त्यांनी ‘दमादम मस्त कलंदर’ नावाचे एक गाणे रेकॉर्ड केले आहे.बप्पी दांना राजकारणातही रस होता व त्यातूनच २०१४ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यापूर्वी त्यांनी २००४ मध्ये त्यांनी काँग्रेसचाही प्रचार केला होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत बप्पी यांनी हुगळी जिल्ह्याच्या श्रीरामपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली पण त्यांचा पराभव पत्करावा लागला होता. संगीतावर आणि विशेषत: ‘डिस्को’ आणि सोन्यावर नितांत प्रेम करणाऱ्या बप्पी दांनी रसिकांना ‘डिस्को’मय तर केलेच आणि ‘डिस्को दिवाना’ही बनविले असेच म्हणावे लागेल.