अहमदाबाद : अहमदाबादमध्ये २६ जुलै २००८ रोजी झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेप्रकरणी अहमदाबादच्या विशेष कोर्टाने ४९ आरोपींना दोषी ठरवले होते. सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए. आर. पटेल यांनी ४९ दोषींपैकी ३८ जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर ११ जणांना जन्मठेप सुनावली गेली आहे. अहमदाबादच्या विशेष कोर्टाने तब्बल १४ वर्षांनी हा निकाल दिला आहे. या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन कोर्ट परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
2008 Ahmedabad serial bomb blast case | A special court pronounces death sentence to 38 out of 49 convicts pic.twitter.com/CtcEWGze2z
— ANI (@ANI) February 18, 2022
अहमदाबादच्या बॉम्बस्फोटांमध्ये ७० मिनिटांत ५६ जणांचा मृत्यू झाला होता. या बॉम्बस्फोटांमध्ये २०० हून अधिक जण जखमी झाले होते. गेल्या आठवड्यात विशेष कोर्टाने ४९ जणांना दोषी ठरवले होते, तर २८ जणांची निर्दोष मुक्तता केली होती.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ७७ आरोपींविरुद्ध खटल्याची कार्यवाही पूर्ण केली होती. खटला सुरू असलेल्या ७८ आरोपींपैकी एक सरकारी साक्षीदार ठरला होता. हे आरोपी इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा पोलिसांचा दावा आहे. २००२ च्या गोध्रा दंगलीचा बदला घेण्यासाठी इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोटाचा कट रचला होता, असा आरोप करण्यात आला होता.