पुणे : लग्नाच्या भूलथापा देऊन एका २४ वर्षीय तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर ती गरोदर राहिली. त्यानंतर जबरदस्तीने तिचा गर्भपात करून त्या तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून शिवसेना उपनेता, कामगार सेनेचा सरचिटणीस आणि राज्याच्या किमान वेतन समितीचा अध्यक्ष रघुनाथ बबनराव कुचिक याच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
आपल्या तक्रारीत पीडित तरुणीने आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला आहे. ६ नोव्हेंबर २०२० ते १० फेब्रुवारी २०२२ या काळात आपल्यासोबत हा सर्व प्रकार घडला असल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे.
गर्भपात केल्याचे तसेच आपल्या संबंधांबाबत कुणालाही सांगितले तर तुला जीवे मारेल अशी धमकी देण्यात आल्याचेही पीडित तरुणीने म्हटले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून लग्नाचे आमिष दाखवण्यात येत होते. लग्नाचे आमिष दाखवत आपल्यावर पुणे, गोव्यातील विविध ठिकाणी शारीरिक संबंध ठेवले, असेही पीडित तरुणीने म्हटले आहे. या संदर्भात अद्याप शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांची कुठलीही प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये.
या प्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोलिसांनी आयपीसी ३७६, ३१३, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. मात्र, एका ज्येष्ठ नेत्याच्या विरोधात बलात्काराची तक्रार दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.