मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी (८०) यांचे आज निधन झाले.
त्यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून अत्यवस्थ होती. त्यांच्यावर मुंबईतल्या जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. सुधीर जोशी यांना कोविड १९ संसर्गाची बाधा झाली होती. त्यातून ते बरे झाले होते.
सुधीर जोशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी होते. शिवसेना पक्ष संघटनेत सुधीर जोशी यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. ते शिवसेनेचे मुंबईचे दुसरे महापौर होते.
सुधीर जोशी हे 1968 साली प्रथम नगरसेवक झाले. मुंबई महानगरपालिका गटनेता, विरोधी पक्षनेता म्हणून ते राहिले. 1972-73 मध्ये मुंबई महानगरपालिकेचे ते महापौर झाले, तेव्हा ते सर्वांत तरुण महापौर होते. 1978 पासून सुधीर जोशी विधान परिषद सदस्य होते. 1992-93 या दरम्यान ते विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते होते. तेव्हा त्यांनी राज्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पाची पाहणी करून त्यासंदर्भात अहवाल निष्कर्ष पुस्तिकेद्वारे शासनाकडे सादर केला. युती सरकारात सुधीर जोशी जून 1995 ते मे 1996 या कालखंडात प्रथम महसूल मंत्री होते. नंतर 1996 ते 1999 पर्यंत शिक्षण मंत्री म्हणून कार्यरत होते. मंत्री म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय लोकाभिमुख ठरले आहेत.
आजारपणामुळे त्यांनी १९९९ मध्ये सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेतली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते फारसे सार्वजनिक जीवनातही दिसत नव्हते.