
राऊतांकडून होतोय प्रसारमाध्यमांचा गैरवापर
मुंबई : केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी होण्याच्या शक्यतेमुळे शिवसेना नेते खासदार संजय राऊत प्रचंड तणावाखाली आले आहेत. त्यांना शिवसेनेकडून हवी तशी मदत मिळत नाही. त्यामुळेच संजय राऊत आता रश्मी ठाकरे आणि त्यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांना वादात ओढण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. तसेच संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांचे काही पुरावे असतील तर त्यांनी ते सरकारला द्यावेत. केवळ टेलिव्हिजन वाहिन्यांसमोर आरोप करू नयेत आणि आरोप केल्यास पुराव्यांची पडताळणी करण्याची जबाबदारी माध्यमांची असल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले.
संजय राऊत माझ्यावर आरोप करण्यासाठी माध्यमांचा गैरवापर करत आहेत. त्यामुळे यापुढे संजय राऊत यांनी कोणताही आरोप केल्यास माध्यमांनी त्यांच्याकडे कागदपत्रे मागावीत, असा सल्ला किरीट सोमय्या यांनी दिला.
'मी कोणतेही आरोप करताना त्याचे सबळ पुरावे देतो. वृत्त वाहिन्यांनीही एखादा व्यक्ती आरोप करत असेल तर त्याचे पुरावे संबंधित व्यक्तीकडे आहेत का, याची पडताळणी करुन घ्यायला हवी. त्यानंतरच बातम्या दाखवाव्यात. कारण राऊतांकडून माध्यमांचा गैरवापर केला जात आहे. त्यांच्याकडे जर माझ्या किंवा माझ्या मुलाविरोधात पुरावे असतील तर ते कोर्टात द्यावेत. सरकार त्यांचेच आहे', असे आव्हान किरीट सोमय्या यांनी राऊतांना दिले आहे.
उद्धव ठाकरेंच्या नावावरचे १९ बंगले हरवले आहेत. रश्मी ठाकरे यांनी जानेवारी २०१९ मध्ये पत्रं लिहून माझ्या नावावर बंगले करा, असे सांगितले होते. मी संजय राऊत आणि त्यांच्या मित्रमंडळींनी केलेल्या कोविड सेंटरमधील घोटाळ्याबद्दल बोललो होतो. मी या बंगल्यांबाबत काहीच बोललो नाही. पण संजय राऊतांनीच आपल्या भ्रष्टाचार विषय थांबवून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठी हा विषय मुद्दाम उकरून काढला आहे. या बंगल्यांबाबत ठाकरे कुटुंबीयांनी बोलावे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि शिवसेना नेते रविंद्र वायकर या बंगल्याबाबत का बोलत नाहीत? संजय राऊतच या बंगल्याबाबत का बोलत आहेत? असा सवाल उपस्थित करत किरीट सोमय्यांनी संजय राऊतांवर जोरदार पलटवार केला आहे.
रश्मी ठाकरे या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे मला याप्रकरणावर बोलायचे नव्हते. पण संजय राऊत यांनी हा मुद्दा उपस्थित केल्याने आता मला या सगळ्यावर बोलावे लागत असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला. संजय राऊत आता स्वत: अडचणीत आहेत. त्यामुळे आता संजय राऊत ठाकरे कुटुंबीयांच्या बाबतीत 'हम तो डुबेंगे, सनम तुमको भी ले डुबेंगे' अशा पद्धतीने वागत असल्याचा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला.
जानेवारी २०१९ मध्ये माझ्या नावाने बंगले करा, असं रश्मी ठाकरेंचं पत्र आहे. मी बंगले दाखवणार नाही. तुम्हीच कागदपत्रांच्या आधारे त्या ठिकाणी बंगले असल्याचं सिद्ध केलं आहे. मी जाऊन तिथे बंगले शोधले. पण मला बंगले सापडले नाहीत. आता मुख्यमंत्र्यांचे 19 बंगले हरवलेत, यावर रश्मी ठाकरे, वायकर हे सगळे बोलतील. उद्या अलिबागला जाणार, बंगले नसतील, तर पोलिस स्थानकात तक्रार करणार आहे, असेही त्यांनी सांगितले. यासंदर्भातील एक ट्विट देखील किरीट सोमय्यांनी केले आहे.
https://twitter.com/KiritSomaiya/status/1494163362208378880जानेवारी आणि मे २०१९ मध्ये रश्मी ठाकरे यांनी कोर्लई ग्रामपंचायत अलिबागला त्यांच्या नावावर १९ बंगले ट्रान्सफर करण्यासाठी पत्र लिहिले होते, असे कॅप्शन देत किरीट सोमय्यांनी संबंधित पत्राचा पुरावाच ट्विट केला आहे. उद्या याच गावात जाऊन संबंधित जागेवर जर बंगले नसतील तर पोलीस ठाण्यात तक्रार करणार असल्याचेही सोमय्या यांनी म्हटले आहे.
दकम्यान, संजय राऊत हे जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी माझ्यावर आरोप करत आहेत. त्यामुळे कोव्हिड सेंटरच्या भ्रष्टाचाराचा मूळ मुद्दा बाजूला राहिला, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले. सुजीत पाटकर यांनी बनावट कागदपत्रे सादर करुन कोव्हिड सेंटरचे कंत्राट मिळवले. त्यांच्या आणखी काही बनावट कंपन्यांची तक्रार मी दिल्लीत जाऊन केल्याचेही किरीट सोमय्या यांनी सांगितले.
https://twitter.com/KiritSomaiya/status/1493469515996225540