Wednesday, July 24, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यकोकणात फळबागेतलं पर्यटन...!

कोकणात फळबागेतलं पर्यटन…!

संतोष वायंगणकर

निसर्गाचे चक्र हे अस्थिरच असणार आहे. पूर्वीप्रमाणे सगळं सुरळीत होईल की नाही हे कोणालाच छातीठोकपणे सांगता येणारे नाही. वारंवार होणारे हवामानातील बदल हे यापुढच्या काळात आणखीही वाढत जातील. अलीकडे वर्षभरात सात-आठ महिने कोकणात आणि महाराष्ट्रातील अनेक भागांत पाऊस कोसळतो. अगदी मृगनक्षत्रावर कोसळावा अशाच पद्धतीने पाऊस पडतो. थंडी केव्हा वाढते. उष्णता किती प्रमाणात होते हे सगळेच ऋतुचक्र इतकं बिघडलेय की, कोणीच काही सांगू शकत नाही आणि ठरवूही शकत नाही. पूर्वी हवामान खात्याचे अंदाज पूर्णपणे चुकायचे. आज पाऊस पडणार, असा अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला, तर त्यादिवशी कडक उन्हं असायची; परंतु अलीकडे मात्र ऋतुचक्र जणू हवामान खात्याला विचारून सारे काही सुरू आहे की काय, असे वाटावे खरोखरीच अशीच काहीशी स्थिती आहे. या अस्थिर ऋतुचक्राने अनेकांच्या व्यवसायाचे गणित काहीसे बिघडले आहे. मासेमारी, पर्यटन, पर्यटनावर अवलंबून असणारा हॉटेल व्यवसाय या सर्व व्यवसायावरही फार मोठा परिणाम झालेला आहे. मात्र अवती-भवतीची परिस्थिती जरी बिघडली असली तरीही आपण स्वस्थ बसून चालणार नाही. सतत प्रयत्न करायला हवेत. कोकणामध्ये पर्यटन व्यवसायाला प्रचंड वाव आहे. नजीकच्या गोवा राज्यात जरी पर्यटक मोठ्या संख्येने येत असले तरीही तिथल्या गर्दीला येणारा पर्यटक फार खूश आहे असे नाही. पर्यटकाला पर्यटनाचा आनंदही घ्यायचा असतो आणि त्याचबरोबर त्याला शांतताही हवी असते. म्हणूनच रत्नागिरी, सिंधुदुर्गातील किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर परदेशी पर्यटक यायला लागले आहेत. शिरोडा, मोचेमांडला तर परदेशी पर्यटक किनाऱ्यावर मोटर रायडिंग करताना दिसतात. पर्यटक आपल्या कोकणात येत आहेत.

महाराष्ट्र, गुजरातमधून पर्यटक येतात; परंतु ही संख्या आणखी वाढली पाहिजे. यासाठी आणखी पर्यटनाच्या वेगळ्या ‘क्लृप्त्या’ लढवल्या पाहिजेत. बागायतीतील पर्यटन कोकणात विकसित झाले पाहिजेत. बारामतीमध्ये चिकूच्या, पेरूच्या बागांमध्ये रिसॉर्ट उभे करून पर्यटकांना दिवसभराचे फॅमिली पॅकेज दिले जाते, असे पर्यटन व्यवसायात नवनवीन ‘कन्सेफ्ट’ आणायला हवेत. महाराष्ट्रात, देशात आणि परदेशात पर्यटन विकसित करण्यासाठी काय-काय केले जाते, हे समजून घेऊन त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले पाहिजेत. कोकणात गणपतीपुळे येथे ‘गावगाढा’ची निर्मिती केली आहे. नव्या पिढीला पूर्वीचा गावगाढा कसा चालायचा, हे सांगण्याचा आणि तिथे उभ्या केलेल्या देखाव्यातून दिसून येते. सिंधुदुर्गात नेरूर, प्रभुसृष्टी हिर्लोकला मामाचे गावची संकल्पना राबवून पर्यटक येऊ लागले आहेत. सावंतवाडी तालुक्यातील माडखोलमध्ये माडखोल नदीवरील धरणाच्या समोरच माडापोफळीच्या बागेत पर्यटक आनंद घेतील, अशी व्यवस्था प्रमोद सावंत यांनी राबविली आहे. कोकणात पर्यटक आले पाहिजेत. येणारे पर्यटक कोकणात रमले पाहिजेत. त्यांना पुरेपूर आनंद घेता आला पाहिजे, यासाठीचे प्रयत्न सावंतवाडी माजगावचे डी. के. सावंत यांनी चालविले आहेत. कोकणातील पर्यटनवृद्धीसाठी असंख्य कोकणवासीय प्रयत्न करीत आहेत.

मात्र पर्यटन व्यवसाय हा अखंडपणे बहरला पाहिजे. त्यात प्रत्येक वर्षी वाढ व्हायला हवी. कोकणातील संस्कृती, ग्रामदैवतांचे पावित्र्य, मंदिर परिसरातील आध्यात्मिक भक्तिभाव हे सर्व जपले पाहिजेत; परंतु हे या सर्वांची जपणूक करत असताना कोकणातील अर्थव्यवस्थेला बळकटी मिळायला हवी. निवास-न्याहरी योजनेतून अनेक घरांना, कुटुंबांना पर्यटन व्यवसायाचा आधार होऊ शकला. विशेषत: कोकणातील किनारपट्टीवर अनेक नवीन व्यावसायिक उभे होऊ शकले. काहींनी किनारपट्टीचा इतका छान उपयोग करून घेतलाय की, घरासमोरील दुचाकीची जागा चारचाकीने घेतली आहे. कोकणातील प्रत्येक घरामध्ये आर्थिक समृद्धी येण्याचे पर्यटन व्यवसाय हे माध्यम आहे. याचा विचार कोकणातील सर्वांनी केला पाहिजे. माडा, पोफळीच्या बागा तर आहेतच; परंतु पेरू, चिकूच्या बागाही आपल्याकडे होऊ शकतात. जे आपणाला करणे शक्य आहे, त्यासाठी सरकारची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. शासनाने काही केलं नाही तरीही आर्थिक समृद्धी आली की, त्यातून अनेक गोष्टी सहज सोप्या होऊन जातील. गावा-गावांतून पर्यटनवाढीची चळवळ उभी राहिली पाहिजे. फक्त सर्वांनीच वडापावच्या टपऱ्या टाकून चालणार नाही. त्यातून फक्त गावातली स्पर्धा होईल. पण व्यावसायिक उभे राहणार नाहीत. यासाठी सर्वांनी एकत्र बसून व्यवसायाचे नियोजन करायला हवे. यासाठी द्वेष, मत्सर असुया, या अवगुणांना बाजूला ठेवून ‘मिळून सारेजण व्यवसाय करू आणि आर्थिक समृद्धी आणू’ ही नवी मानसिकता स्वीकारावी लागेल. मानसिकता बदलली, तर अनेक कुटुंबात कष्ट, मेहनतीने समृद्धी येईल. पर्यटन व्यवसायात हा नवा आयाम आणण्याची आवश्यकता आहे. या बदलाने कोकणही बदलेल असे वाटते.

santoshw2601@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -