शिवसेनेचे खासदार आणि दररोज मीडियासमोर झळकणारे संजय राऊत यांना प्रसिद्धीची नशा चढलेली दिसते. शिवसेनेचा एकही नेता, प्रवक्ता, पदाधिकारी टीव्ही कॅमेरापुढे रोज रोज दिसत नाही, पण राऊतांना टीव्हीच्या पडद्यावर आल्याशिवाय चैन पडत नसावी. मराठी वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे रोज सकाळी राऊतांच्या निवासस्थानी लावले जातात आणि राऊत रोज भाजपच्या विरोधात गरळ ओकत असतात. शिवसेना असे म्हणते, मग तुम्हाला काय वाटते, असा प्रश्न घेऊन वृत्तवाहिन्या भाजप नेत्यांसमोर कॅमेरा व माईक धरतात, हा खेळ गेली दोन वर्षे चालूच आहे. महाआघाडी सरकार राज्यात आल्यापासून राऊत हेच आघाडीचे प्रवक्ते आहेत, अशा थाटात रोज बडबड करीत असतात. महाआघाडीचे सरकार आपल्यामुळेच स्थापन झाले व ते टिकविण्याची जबाबदारी आपल्याच शिरावर आहे, असा आव आणत आणि डोळे फिरवत ते बोलत असतात.
मोदी-शहांविषयीचा द्वेष आणि भाजपविषयी संताप रोज त्यांच्या बोलण्यातून प्रकट होत असतो. मोठा गाजावाजा करून त्यांनी मंगळवारी शिवसेना भवनमध्ये पत्रकार परिषद घेतली, पण त्यातून त्यांनी वेगळे काय सांगितले… रोज सकाळी मीडियासमोर ते बोलतात, ते सर्व महिनाभराचे एकत्र करून त्यांनी या पत्रकार परिषदेत तेच ते सांगितले… चंद्रकांत पाटील यांच्या भाषेत सांगायचे, तर खोदा पहाड, निकला चुहाँ, अशी राऊतांची पत्रकार परिषद होती. महाआघाडी सरकारच्या वतीने मी का रोज बोलायचे, मी काय रोज बोलण्याचा ठेका घेतला आहे का, हे उद्गार संजय राऊत यांनीच काही दिवसांपूर्वी काढले होते. राऊत यांच्या बोलण्याला कोणी साथ देत नाही व त्यांना कोणी गांभीर्याने घेत नाही, हे त्यांना समजत नाही आणि पक्षप्रमुखही त्यांना त्याची जाणीव करून देत नाहीत. अनिल देशमुख कोठडीतून बाहेर येणार आणि भाजपचे साडेतीन लोक त्याच कोठडीमध्ये जाणार, अशी दर्पोक्ती त्यांनी पत्रकार परिषदेच्या आदल्या दिवशीच केली होती. सर्व मीडियाला आणि राजकीय पक्षांना वाटले की, ते त्यांची नावे जाहीर करतील, प्रत्यक्षात तासाभराच्या पत्रकार परिषदेत त्यांनी अर्धे कोण हेही सांगितले नाही.
शिवसेना भवनमधील पत्रकार परिषद ही शिवसेनेची आहे, पक्षाची आहे, असे त्यांनी आदल्या दिवशी वारंवार म्हटले होते. प्रत्यक्षात त्यांची वैयक्तिकच झाली व बोलावलेले नेते हाताची घडी, तोंडावर बोट ठेवून बसले होते. स्वतःचे महत्त्व वाढविण्यासाठी त्यांनी सेना भवनात पत्रकार परिषद घेतली का, आपल्या पाठीशी पक्ष खंबीरपणे उभा आहे, हे दाखविण्यासाठी मुंबईतील सर्व शाखांना निरोप देऊन शिवसैनिकांना तेथे गर्दी करायला बोलावले का? किशोरी पेडणेकर, दिवाकर रावते, अरविंद सावंत, गजानन कीर्तिकर, उदय सामंत, दादा भुसे, राहुल शेवाळे अशा डझनभर नेत्यांना तेथे काय शोभेला बोलावले होते का? मुंबईपासून ते नाशिकपर्यंत तसेच विविध भागांतून शिवसैनिक झुंडीच्या झुंडीने सेना भवनबाहेर आले होते. संजय राऊत आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा देत होते. पण राऊत यांना पक्षात कोणी अडवले आहे का? पक्षाबाहेरून राऊत यांना धोका आहे का? पक्षात राऊत यांना अनेक सीनिअर नेते आहेत, ते या पत्रकार परिषदेकडे का फिरकले नाहीत? ठाकरे सरकारमध्ये एकनाथ शिंदे, अनिल परब किंवा मिलिंद नार्वेकर हे तिथे का आले नाहीत? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः वर्षाच्या बाहेर पडत नाहीत, पण आदित्य ठाकरे तरी का दिसले नाहीत? म्हणे भाजपवर बाॅम्ब टाकणार, असा आव राऊत यांनी आणला होता, पण त्यांनी किरीट सोमय्या व त्याचे पुत्र यांच्यावर कारवाई करा, अशी आदित्य ठाकरेंकडे मागणी केली. भाजपच्या भ्रष्टाचारी नेत्यावर कारवाई करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. गेली सव्वादोन वर्षे ठाकरे सरकार सत्तेवर आहे, मग त्यांचे हात कोणी बांधले आहेत का? केंद्रीय मंत्री नारायण राणे व त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांच्यावर राजकीय सूड घेण्यासाठी ठाकरे सरकारने पोलीस व प्रशासनाचे सारे बळ एकवटले होते, मग राऊत यांच्या तक्रारींकडे त्यांचेच सरकार का बरे दुर्लक्ष करीत आहे?
शिवसेनेतील अनेक नेत्यांसह राऊत आणि पवार यांच्या कुटुंबीयांच्या सांपत्तिक गैरव्यवहाराची ईडीकडून चौकशी चालू आहे. ठाकरे कुटुंबीयांचीही नावे चौकशीच्या चक्रात अडकली आहेत, पण त्याचा संताप राऊत यांनी लाऊड स्पिकर लावून का प्रकट करावा? जसे शरद पवार यांनी चला मी स्वतः चौकशीला सामोरे जायला तयार आहे, असे सांगत ते स्वतः ईडीच्या कार्यालयात निघाले, तसे राऊत धाडस का दाखवत नाहीत? राऊतांची शिवसेना भवनमधील पत्रकार परिषद म्हणजे मोठा पब्लिसिटी शो होता, त्यांचे मराठी वृत्तवाहिन्यांनी थेट प्रक्षेपण केले, पण त्यातून साध्य काय झाले? सरकार पडणार म्हणून भाजपचे नेते वारंवार तारखा देत असतात, पण महाविकास आघाडीकडे जर १७० आमदारांचे बळ आहे, मग राऊतांना भीती कशाची वाटते? सरकारमधून बाहेर पडा, यासाठी भाजपचे नेते त्यांना भेटून दबाव आणतात, असे ते वारंवार सांगत आहेत. जे कोण त्यांच्याशी संपर्क करतात ते काय उद्धव ठाकरेंशी थेट बोलू शकत नाहीत, असे त्यांना सुचवायचे आहे का?
शिवसेना घाबरणार नाही, (तुम्हालाच) टाइट करू, …तर ठिणगी पडेल, साडेतीन लोक जेलमध्ये जातील, अशा धमक्या देणे म्हणजे ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’, अशी त्यांची अवस्था झाली आहे.