Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीदेशातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा मुंबईत सुरू

देशातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा मुंबईत सुरू

मुंबई : देशातील पहिल्या आणि बहुप्रतीक्षित मुंबई ते बेलापूर वॉटर टॅक्सी सेवेचे आज लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय बंदरे, नौवहन व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल, केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री कपिल पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे बंदर विकास मंत्री अस्लम शेख, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार डॉ. विनायक सहस्त्रबुद्धे, खासदार कुमार केतकर, खासदार राजन विचारे, आमदार निरंजन डावखरे, आमदार रविंद्र फाटक, आमदार बाळाराम पाटील, आमदार रमेश पाटील, आमदार मंदा म्हात्रे, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा, मेरी टाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासह वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या वॉटर टॅक्सी सेवेचे उद्घाटन झाले.

बेलापूर येथून दक्षिण मुंबईत भाऊचा धक्का येथे पोहोचण्यास स्पीड बोटीने फक्त 30 मिनिटे तर कॅटामरान बोटीला 45 ते 50 मिनिटांचा कालावधी लागणार आहे.

स्पीडबोटीचे भाडे प्रति प्रवासी रु. 825 ते रु. 1210 तर कॅटामरान बोटीकरीता प्रति प्रवासी रु 290 इतके ठेवण्यात आले आहे. बेलापूर येथून भाऊच्या धक्क्याबरोबरच एलिफंटा, जेएनपीटी या जलमार्गावर सुद्धा प्रवासी सेवा चालविण्यात येणार आहे.

वॉटर टॅक्सीचे भाडे

बेलापूर ते भाऊचा धक्का (स्पीड बोट) एकेरी भाडे 2 प्रकार – रुपये 825 आणि रुपये 1210

बेलापूर ते भाऊचा धक्का (कॅटामरन) एकेरी भाडे – रुपये 290

बेलापूर ते जेएनपिटी (स्पीड बोट) एकेरी भाडे – रुपये 825

बेलापूर ते एलिफंटा (स्पीड बोट) एकेरी भाडे – रुपये 825

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, आजचा दिवस नक्कीच आनंदाचा आहे. देशातील पहिली टॅक्सी सेवा आजपासून सुरू होत आहे. महाराष्ट्राला प्राथमिकता दिल्याबद्दल केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल साहेब तुमचे आभार. मुंबईत ते ठाणे अशी देशातील पहिली रेल्वे धावली होती. मला खात्री आहे ज्या कामाची, सेवेची सुरुवात मुंबईतून होते त्याचं अनुकरण संपूर्ण देशात होते. आज पाण वॉटर टॅक्सी सुरू करत आहोत. समुद्राची ताकद छत्रपती शिवाजी महारादांनी ओळखली, आरमार उभारलं. येत्या काही वर्षात समुद्राचं पाणी आपण पिण्यायोग्य करतो आहोत.

बेलापूर येथून प्रत्येकी 10 ते 30 प्रवासी क्षमता असलेल्या 7 स्पीडबोटी आणि 56 प्रवासी क्षमता असलेली एक कॅटामरान बोट अशा एकूण 8 बोटींद्वारे वॉटर टॅक्सी सेवा सुरु करण्यात आली आहे. मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवरील जलवाहतूकीचा पुढील टप्पा म्हणून नवी मुंबईपासून मुंबई, एलिफंटा, जेएनपीटी अशा विविध जलमार्गांवर प्रवासी वाहतूक सुरु करण्यासाठी बेलापूर, नवी मुंबई येथे सुमारे 8.37 कोटी खर्च करुन प्रवासी जेट्टीचे बांधकाम करण्यात आले असून केंद्र आणि राज्य शासनामार्फत 50 : 50 प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

छत्रपतींनी समुद्रावर हुकूमत असली पाहिजे या भावनेने कल्याणमध्ये आरमारची बांधणी सुरु केली तेव्हापासूनच या परिसराचे महत्व अधोरेखित झाले. त्यानंतर इंग्रजांनी रेल्वे आणली. आपल्याकडील साधनसंपत्तीचे महत्व आपण किती ओळखतो आणि त्याचा जनतेला किती उपयोग करून देतो याकडे लक्ष देणे गरजेचे. एलिफंटाला जाण्यासाठी ही ही जलवाहतूक सेवा उपयोगी ठरणार आहे. विकासात दळणवळणाची सेवा महत्वाची. नवी मुंबईला मुंबईशी जोडणारी ही जलवाहतूक सेवा आज सुरु होत आहे. रस्ते, पुल, रेल्वे, मेट्रो, भुयारी रेल्वे यामध्ये आधुनिकीकरणाची कास धरत आज वॉटर टॅक्सी सुरु झाली, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

समुद्राचा उपयोग फक्त सुर्योदय सुर्यास्त पाहण्यासाठी नाही. समुद्राचा उपयोग वाढला पाहिजे. आर्थिक विकासाची चळवळ गतिमान करतांना जलवाहतूक असेल किंवा अन्य काही त्याचा उपयोग वाढला पाहिजे. येत्या दोन तीन वर्षात समुद्राचे खारे पाणी आपण गोड करत आहोत. मुंबई- पुणे रस्ता असेल, मुंबईतील ५५ उड्डाणपूल असतील, सागरी किनारा मार्ग असेल , मुंबई- कोकणाला जोडणारा सागरी मार्ग असेल, शिवडी न्हावा शेवा मार्ग असेल असे परिहवनाचे जाळे आपण विकसित केले आहे.

मुंबई देशाची आर्थिक राजधानी, ती जगाशी हवाई मार्गाने जोडली. पण एमएमआर रिजनला जोडणारी ही सेवा महत्वाची आहे, कामासाठी, उद्योग व्यवसायासाठी मुंबई येणाऱ्या सर्वसामान्य माणसाला ही सेवा अधिक उपयुक्त सिद्ध होईल असंही मुख्यमंत्री म्हणाले.

वॉटर प्लेन हा ही आणखी एक मार्ग आहे. नवी मुंबई विमानतळ विकसित होत आहे, नवी मुंबई स्पोर्टस सिटी म्हणून विकसित होत आहे हे सर्व लक्षात घेता येथे अनेक पायाभूत सुविधांचा राज्य शासनामार्फत विकास केला जात आहे. उद्योजक ही गुंतवणूक करतांना पायाभूत सुविधांचा विचार पहिल्यांदा करत असतात त्यादृष्टीनेही या सर्व कामांना वेगळे महत्व आहे. या प्रकल्पाला ज्यांचें ज्यांचे सहकार्य लाभले त्यांना धन्यवाद. ही सर्व कामे जनतेसाठी आहेत. पक्षीय मतभेद विसरून सर्वसामान्य जनतेसाठी काम करण्याची गरज आहे. कोणत्याही लोकोपयोगी कामासाठी निधी कमी पडू देणार नाही. जनतेच्या हिताचे काम करतांना केवळ महाराष्ट्रालाच नाही तर देशाला बलशाली बनवण्यासाठी एकत्र येऊन काम करूया, त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य महाराष्ट्र देईल अशी ग्वाही ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

मंत्री अस्लम शेख म्हणाले की, महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील बंदरे व खाड्यांमधून दरवर्षी सुमारे 2 कोटी प्रवासी जलवाहतूकीद्वारे प्रवास करतात. जलवाहतूकीचा पर्याय हा किफायतशीर, इंधन व वेळेची बचत करणारा आणि पर्यावरणस्नेही असतो. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे यासारख्या वाहतूककोंडीची समस्या भेडसावणाऱ्या शहरांसाठी तसेच हळूहळू अलिबागपर्यंत विस्तारत जाणाऱ्या लोकवस्तीसाठी रस्ते व रेल्वे वाहतूकीला पर्याय म्हणून मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवर जलवाहतूक सुरु करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -