मुंबई : काँग्रेस नेत्यांचे शिष्टमंडळ आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे. संध्याकाळी ५ वाजता ही भेट होणार असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी अनेक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदासाठीची निवडणूक अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या पहिल्याच आठवड्यात होईल, असे संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत. तसेच राज्यात १० मार्चनंतर मोठे बदल दिसतील असे सूचक विधानही केले आहे. त्यामुळे या बैठकीकडे राज्याचे लक्ष आहे.
शिष्टमंडळात बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि नाना पटोले सहभागी असतील. महाविकास आघाडीतील मतभेदांसंबधी विचारले असता ते म्हणाले की , “जरी एका पक्षाचे सरकार असले तरी अनेक प्रश्न निर्माण होतात आणि मुख्यमंत्र्यांना ते सोडवावे लागतात. आज तीन पक्षांचे सरकार असताना काही प्रश्न नक्कीच आहेत. ते आम्ही आग्रहाने मांडून सोडवून घेणार आहोत”
काँग्रेससोबत दुजाभाव केला जात आहे का? अशी विचारणा केली असता ते म्हणाले, “असे काही मी म्हणणार नाही. प्रश्न आहेत हे मात्र आम्ही मान्य करतो. निधीच्या बाबतीतही प्रामुख्याने प्रश्न असून आज ते सोडवले जातील”.
“तपास यंत्रणांचा उपयोग राजकारणासाठी केला जात आहे. कुटुंबातील मुलांपर्यंत, सदस्यांपर्यंत हे राजकारण पोहोचणे महाराष्ट्रातील जनतेला पटणार नाही. संजय राऊत यांचा रोष हा असाच आहे. महाविकास आघाडी टिकू नये यासाठीच हे प्रयत्न सुरु आहेत. भाजपाच्या कार्यपद्धतीविरोधात जो रोष आहे त्याच्यासोबत आम्ही आहोत,” असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
नाना पटोले यांनी राज्यात १० मार्च रोजी राज्यात मोठे फेरबदल होणार असल्याचे म्हटले आहे. त्यासंबंधी विचारले असता ते म्हणाले की, “१० मार्चनंतर काय बदल होणार आहे याबद्दल पक्षाचे अध्यक्षच सांगू शकतील. तेच याबद्दल स्पष्ट सांगू शकतात. ते नेमकं कशा पद्दतीने बोलले याची मला माहिती नाही”.