मुंबई : महाआयटी घोटाळ्याचे कथित सूत्रधार म्हणून उल्लेख केलेल्या अमोल काळे यांनी गुरुवारी एक निवेदन प्रसिद्ध करत आपली बाजू मांडली आहे. यात त्यांनी ‘मी कुठेही पळून गेलेलो नाही. माझ्या विरोधात बदनामीचा कट रचला असून अशा लोकांविरोधात मी कायदेशीर कारवाई करणार आहे’ असे म्हटले आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाआयटी घोटाळ्याचे सूत्रधार म्हणून उल्लेख केलेली अमोल काळे ही व्यक्ती अखेर समोर आली आहे. अमोल काळे यांनी संजय राऊत यांना अप्रत्यक्षपणे का होईन पण कठोर इशारा दिला आहे. अमोल काळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, मी एक खासगी व्यावसायिक आहे. मी मुंबई क्रिकेट असोसिएशनचा उपाध्यक्षही आहे. माझ्यासंदर्भात काही नेत्यांकडून वक्तव्ये केली जात आहेत. माझ्या उत्पन्नाचा तपशील आयकर खात्याला सादर करण्यात आलेल्या विवरणपत्रात आहे. मी महाराष्ट्र सरकारचे कोणतेही कंत्राट घेतले नव्हते. तरीही काही नेत्यांकडून संभ्रम निर्माण करण्यासाठी हेतुपूर्वक माझी बदनामी केली जात आहे. मी कुठेही पळून गेलेलो नाही. अशा लोकांविरोधात मी कायदेशीर कारवाई सुरु करत आहे, असे अमोल काळे यांनी म्हटले आहे.
अमोल काळे लंडनला पळाल्याचा दावा
अमोल काळे हा लंडनला पळून गेल्याचा संशय काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी व्यक्त केला होता. महाआयटी घोटाळ्यातील तो घोटाळेबाज अमोल काळे तर नाही ना? कुठे आहे अमोल काळे?, असा सवाल अतुल लोंढे यांनी उपस्थित केला. त्यामुळे अमोल काळे या नावाभोवतीचे गुढ आणखीनच वाढले होते.
दरम्यान, संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात २५ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा झाल्याचा आरोप केला होता. या घोटाळ्यात अमोल काळे आणि विजय ढवंगाळे हे मुख्य सूत्रधार असल्याचेही राऊत यांनी म्हटले होते. या दोघांच्या बँक खात्यातून पैसे कुठे कुठे गेले, विना टेंडर कोणाला कंत्राट दिले गेले, हा पैसा कुठे कुठे गेले याची तक्रार आपण करणार असल्याची घोषणा खासदार राऊत यांनी केली होती. पाच हजार कोटींचा हिशोब माझ्याकडे आलेला आहे. याबाबतची सगळी माहिती मी संबंधित तपास यंत्रणांकडे देणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले होते. तसेच अमोल काळे हा कोण आहे, याचा खुलासा भाजपने करावा. अन्यथा आम्ही त्याला समोर आणू, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला होता. त्यानंतर दुस-या दिवशी संजय राऊत यांनीही महाआयटी घोटाळ्यातील आरोपी विदेशात पळून गेल्याची व यासंदर्भात केंद्रीय मंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले होते.