नवी दिल्ली : रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील १९ बंगल्यांचा कर रश्मी ठाकरेंच्या नावे भरण्यात आल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी सोमय्या पिता-पुत्रांवर आरोप केले होते. त्यानंतर सोमय्या यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन राऊत यांना प्रत्युत्तर दिले.
सोमय्यांनी रश्मी ठाकरे आणि रवींद्र वायकर यांचे अलिबागमधील १९ बंगल्याचे कनेक्शन सोमय्यांनी बाहेर काढले होते. यासंबंधी त्यांनी आज, बुधवारी पत्रकार परिषदेत ठाकरेंनी भरलेल्या मालमत्तेच्या पावत्या सादर केल्या. संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांना बंगले दाखवण्याचे आव्हान दिले होते. तसेच बंगले न सापडल्यास जोड्याने मारणार असल्याची भाषा केली. यावर किरीट सोमय्यांनी थेट पायातील चप्पल काढून दाखवली. आणि मी केलेले दावे खोटे ठरवल्यास माझ्याच चप्पलीने मारा, असे आव्हान त्यांनी दिले.
यावेळी सोमय्या म्हणाले की, अलिबागचे बंगले ठाकरेंशी संबंधित नव्हते तर, मालमत्ता कर का भरला, असा प्रश्न सोमय्यांनी उपस्थित केला. रश्मी ठाकरे यांचे पार्टनर रवींद्र वायकर यांच्याशी संबंधित माहिती समोर आणली आहे. संबंधित बंगले असणाऱ्या ग्रामपंचायतीची रश्मी ठाकरेंनी माफी मागितल्याचे सोमय्यांनी सांगितले. अन्वय नाईकने २००८ मध्ये बंगले बांधले. त्यानंतर २००९ पासून १९ बंगल्यांचा कर हा रश्मी ठाकरे आणि वायकर यांनी भरला आहे. रश्मी ठाकरे आणि मनीषा रविंद्र वायकर यांनी जागा कधी घेतली? गेल्या वर्षीपर्यंत ते कर भरत होते. जर बंगले त्यांच्या नावावर नाहीत तर मग कर का भरला? असे प्रश्न सोमय्या यांनी उपस्थित केले. रश्मी ठाकरे यांनी १९ बंगल्यांचा मालमत्ता कर ग्रामपंचायतीत भरला आहे. इतकंच नाही तर रश्मी उद्धव ठाकरे यांनी त्याआधीचा प्रॉपर्टी टॅक्स अन्वय नाईकच्या नावाने, त्यानंतर रश्मी ठाकरेंनी भरला असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
संजय राऊत यांनी सोमय्यांवर आरोप केल्यानंतर ट्वीट करत बाप-बेट्यांना जेलमध्ये टाकणार असल्याचे म्हटले आहे. यानंतर सोमय्यांनी पत्रकार परिषद घेतली. कोरोना काळात ठाकरे सरकारने केलेला घोटाळा बाहेर काढणार असल्याचे ते म्हणाले. मला जेलमध्ये टाकणार असाल तर, मी स्वत: येतो, असे सोमय्या म्हणाले. कशाला खोली सॅनिटाईज करता, असा सवाल सोमय्यांनी उपस्थित केला आहे. एका दमडीचा घोटाळा काढून दाखवा, असे म्हणत मला फरक पडत नसल्याचे आव्हान सोमय्यांनी दिले.