
मुंबई : शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी मंगळवारी शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेवरून राज्यातले राजकीय वातावरण तापलेले असतानाच त्यावर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गंभीर आरोप करत सडकून टीका केली. नारायण राणेंनी आज संध्याकाळी मुंबईत भाजपा कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊतांच्या त्या पत्रकार परिषदेवर निशाणा साधतानाच संजय राऊतांनी भाजपावर केलेल्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले.
“संजय राऊतांचे लक्ष उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर आहे. त्यांना सुपारी मिळाली आहे, यांना हटवा, तुम्हालाच मुख्यमंत्री करतो. उद्धव ठाकरे जेव्हा सरकार स्थापनेबाबत पहिल्यांदा शरद पवारांना भेटायला गेले होते, तेव्हा उद्धव ठाकरेंसोबत संजय राऊत आणि आदित्य ठाकरे होते. संजय राऊतांची कुंडली माझ्याकडे आहे. मी आज ओळखतो का तुम्हाला?” असा खळबळजनक आरोप नारायण राणे यांनी केला आहे.
“संजय राऊत यांची पत्रकार परिषदेला केविलवाणी परिस्थिती झाली होती. पत्रकार परिषदेची जाहिरात सांगत होती की राज्यभरातले नेते, मंत्री येणार. पण साधे विभाग प्रमुखही आले नव्हते. शिवाजी पार्कचे विभाग प्रमुख नव्हते. नाशिकचे मात्र काही मोजके नेते होते. कारण संपर्क प्रमुख आहेत ते”, असे राणे म्हणाले.
“संजय राऊत २ जून १९९२ ला शिवसेनेत आले. सामनामध्ये संपादक म्हणून आले. मार्मिकमधून हकालपट्टी झाली. मग ते लोकप्रभाला गेले. लोकप्रभात असताना त्यांनी पराक्रम केले. त्यांनी तेव्हा बाळासाहेब ठाकरेंविरुद्ध अनेक लेख लिहिले. साहेबांनी हा कसा पत्रकार आहे याविषयी बोलले होते. संजय राऊत अंतर्गत आग कशी लावता येईल हे पाहात असतो, असे बाळासाहेब म्हणाले होते”, असे देखील राणे म्हणाले. शिवसेनेसाठी पत्रकार परिषद घेतली की स्वत: अडचणीत आहेत म्हणून घेतली? जणू शिवसेना प्रमुख हेच झालेत अशा आवेशात पत्रकार परिषद घेतली, असे राणे म्हणाले.
“म्हणून राऊतांना घाम फुटला होता”
प्रवीण राऊतने ईडीला जी मुलाखत दिली त्यानंतर याच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्याला आता अटक होणार हे समजले आहे. अनिल परब यांनाही अटक होणार आहे. आज सेना भवन आठवले का, असा सवालही राणे यांनी केला. स्वत:च्या डोक्यावर ईडी चौकशीची टांगती तलवार आहे. म्हणूनच राऊतांना घाम फुटला होता. ते वारंवार सांगत होते की मी कुणाला घाबरत नाही. मर्दांची शिवसेना आहे. पण मर्द माणसाला मर्द आहे हे सांगायची गरज नसते. जो घाबरतो, तोच वारंवार सांगत असतो की मी कुणाला घाबरत नाही”, असे राणे म्हणाले.
“संजय राऊतांचा थयथयाट सुरू”
“संजय राऊत का बेजबाबदारपणे घामाघूम होऊन बोलत होते? प्रविण राऊतांनी ईडीला दिलेल्या मुलाखतीनंतर हा थयथयाट सुरू झाला. का फक्त आरोप करता? पुरावे द्या ना? सुजीत पाटकर संजय राऊतांचे कोण लागतात? त्यांच्या नावाने इतके व्यवहार कसे करता? त्यांच्या कंपनीत संजय राऊतांच्या मुली कशा संचालक असतात?” असा सवाल राणेंनी उपस्थित केला.
'राऊत म्हणालेले, ...तर साहेबांचे आणि उद्धव ठाकरेंचे कपडे उतरविन'; नारायण राणेंनी सांगितला किस्सा
संजय राऊत यांची कुंडली माझ्याकडे आहे. ती वेळ आल्यावर बाहेर काढणार. राऊत हे शिवसेनेचे नाहीत, पूर्ण राष्ट्रवादीचे आहेत. त्यांना शिवसेना संपविण्यास सांगितले आहे. ठाकरेंना हटव शिवसेनेची खूर्ची तुला देतो, असे सांगण्यात आल्याचा गौप्यस्फोट नारायण राणे यांनी केला आहे. तसेच सत्तास्थापनेच्या त्या रात्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे जेव्हा सिल्व्हर ओकवर शरद पवारांना भेटण्यास गेले तेव्हा राऊत हे एकटेच तिथे होते, असा आरोपही राणे यांनी केला.
साहेबांचे आणि उद्धवचे मी कपडे उतरवीन, मला पद दिले नाही तर पाहून घेईन, असे हे संजय राऊत एकदा बोलले होते. याचा साक्षीदार माझ्याकडे आहे. त्याला हवा तेव्हा समोर आणतो. माझ्यासमोर साहेबांबद्दल बोलला असता तर तिथेच आडवा केला असता. आता पदे मिळालीत म्हणून हे पैसे कमवायला आलेत. संजय राऊत हे पगारी नेता आहेत, सामनामध्ये काम करतात, अशी टीकाही राणे यांनी केली.
राऊत यांनी कधी कोणाच्या कानाखाली वाजविल्याची बातमी ऐकली आहे का, रग लागते त्यासाठी. याच्यात रक्तच नाही, अशा शब्दांत राणे यांनी टिका केली. तसेच आम्ही मंत्री आहोत, ईडी सीबीआयकडे जाऊन बसलो तर राऊत यांची पळता भुई थोडी होईल, असा इशारा राणे यांनी दिला.
राऊतांनी आरोप केले पण पुरावे का नाही दिले, असा सवालही त्यांनी केला. काल आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषद आपण पाहिली असाही त्यांनी टोला लगावला. यावेळी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना राऊत यांच्याबद्दल काय वाटायचे आणि राऊतांनी काय काय लिहिले आहे, याबाबतची कात्रणेही राणे यांनी वाचून दाखविली.