Tuesday, December 3, 2024
Homeताज्या घडामोडीसंगीतकार बप्पी लहरी यांचे निधन

संगीतकार बप्पी लहरी यांचे निधन

मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज संगीतकार-गायक आणि गोल्ड मॅन बप्पी लहरी यांचे मुंबईतील क्रिटी केअर या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते. जवळपास पाच दशके आपल्या संगीत आणि आवाजाने त्यांनी बॉलिवूडवर छाप सोडली आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी चित्रानी आणि मुलगी गायिका रेमा लहिरी बन्सल असा परिवार आहे.

रुग्णालयाचे संचालक डॉ. दीपक नामजोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बप्पी लहरी मागील महिनाभरापासून रुग्णालयात उपचार घेत होते. यानंतर त्यांना सोमवारी (१४ फेब्रुवारी) घरी सोडण्यात आले. मात्र, मंगळवारी त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. त्यांच्या कुटुंबियांनी घरीच डॉक्टर बोलावून तपासणी केली. यानंतर त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. बप्पी लहरी यांना प्रकृती विषयक अनेक त्रास सुरू होते. त्यांचा मृत्यू ओएसए म्हणजेच ऑबस्ट्रक्टिव्ह स्लीप अॅप्नियामुळे मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास झाला.

याआधी एप्रिल २०२१ मध्ये कोरोना संसर्गही झाला होता. त्यावेळी त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते.

बप्पी लहिरी यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९५३ रोजी पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे झाला होता. त्यांचे मूळ नाव आलोकेश लहरी असे होते. त्यांना गायनाचा वारसा आपल्या आई-वडिलांकडूनच मिळाला होता. त्यांचे आई-वडील बंगाली गायक होते. त्यांना बालपणापासूनच गायनाची आवड होती. वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षापासून त्यांनी तबला वादन सुरू केले होते. किशोर कुमार हे बप्पींचे मामा होते. त्यांनीच त्यांना मनोरंजन सृष्टीत आणले, हे फारच कमी लोकांना माहिती असेल. वयाच्या १९ व्या वर्षी बप्पीदा कोलकाता सोडून मुंबईला आले होते. लहिरी यांना सोन्याचे दागिने घालण्याची प्रचंड आवड होती. यासाठीही ते प्रसिद्ध होते.

लहिरी यांनी आपल्या आई-वडिलांनी गायिलेल्या ‘नन्हा शिकारी’ या गाण्याला १९७२ मध्ये संगीत दिले होते. याआधी त्यांनी एका बंगाली चित्रपटात गाणे सुद्धा म्हटले आहे. परंतु त्यांना खरी ओळख ‘जखमी’ या चित्रपटातील गाण्यांमुळे मिळाली होती. १९७५ मध्ये आलेल्या या चित्रपटात बप्पीदांनी मामा किशोर कुमार आणि मोहम्मद रफी यांच्यासोबत गाणे गायिले होते.

सत्तरीच्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीत क्षेत्रात अनेक नवे प्रयोग करत रॉक आणि डिस्को संगीताची ओळख करून दिली. १९८२ मध्ये आलेल्या मिथुन चक्रवर्ती यांच्या ‘डिस्को डान्सर’ या चित्रपटामुळे ते प्रकाशझोतात आले. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये गायक आणि संगीतकार म्हणून काम केले. १९८५ मध्ये शराबी या चित्रपटासाठी त्यांना फ़िल्मफेअर सर्वोतम संगीतकार पुरस्कार मिळाला होता.

लहिरी यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक हिट गाणी दिली. ‘चलते चलते’, ‘डिस्को डान्सर’ आणि ‘शराबी’ या चित्रपटांमधील त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी लोकप्रिय ठरली. तम्मा तम्मा लोगे, याद आ रहा है, तेरा प्यार ही सुपर हिट गाणी दिली. ‘डर्टी पिक्चर’ या चित्रपटात त्यांनी संगीतबद्ध आणि पार्श्वगायन केलेल्या ‘उ लाला’ हे गाणेही चांगलेच लोकप्रिय ठरले. ‘भंकस’ नावाचे त्यांचे शेवटचे बॉलिवूड गाणे २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या बागी ३ चित्रपटात ऐकायला मिळाले होते.

रिएलिटी शो मध्ये जज म्हणूनही त्यांनी भूमिका निभावली होती. शरीरावर प्रचंड सोनं, गळ्यात चेन, हातात अंगठ्या अशी त्यांची प्रतिमा होती. अमेरिकन रॉकस्टार एल्विस प्रेस्लीपासून त्यांना अंगावर सोने घालण्याची प्रेरणा मिळाली. २०१४ च्या निवडणुकीत बप्पी यांनी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. परंतु त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार सन २०१४ मध्ये त्यांच्याकडे ७५४ ग्रॅम सोने आणि ४.६२ किलो चांदी होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -