Saturday, March 22, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखआयपीएलचा बाजार

आयपीएलचा बाजार

इंग्लंडमध्ये १९८३ वनडे वर्ल्डकप जेतेपदानंतर भारतीय क्रिकेटमध्ये आमूलाग्र बदल झाला. केवळ मैदानावर नव्हे, तर मैदानाबाहेर भारताचा दबदबा राहिला. बीसीसीआयने आशियापाठोपाठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवरही (आयसीसी) भारताच्या प्रशासकांनी काम पाहिले. नव्वदीनंतर झटपट क्रिकेटला मोठे महत्त्व प्राप्त झाले. त्यात या प्रकारात टी-ट्वेन्टीची भर पडली. अल्पावधीत या क्रिकेट प्रकाराने जागतिक प्रसिद्धी मिळवली. कसोटी आणि वनडेच्या तुलनेत टी-ट्वेन्टीची मागणी वाढली. टी-ट्वेन्टी प्रकाराची लोकप्रियता पाहता बीसीसीआयने आयपीएल ही खासगी टी-ट्वेन्टी लीग सुरू केली. २००७मध्ये स्थापना झालेल्या आयपीएलचे यंदाचे १५वे वर्षं आहे. या दरम्यान आयपीएलने जगभरात मोठी प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळे या लीगमध्ये खेळण्यासाठी जगभरातील क्रिकेटपटू उत्सुक असतात. यंदाच्या १५व्या हंगामातही तेच पाहायला मिळाले.

आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीगच्या १५व्या हंगामासाठीचा महालिलाव (मेगा ऑक्शन) बंगळूरुमध्ये दिमाखात झाला. जगातील एक श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) यंदाच्या (२०२२) लिलावात ५ अब्ज ५१ कोटी ७० लाख रुपये खर्चून क्रिकेटपटूंची देवाण-घेवाण झाली. १५व्या हंगामासाठीच्या लिलावात मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्ज, कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स या जुन्यांसह लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या दहा फ्रँचायझी संघांनी २०४ क्रिकेटपटूंना बोली लावली. त्यात भारताच्या १३७ क्रिकेटर्सचा समावेश आहे. यावेळच्या लिलावात परदेशी प्लेयर्सची संख्याही मोठी आहे. यंदा ६७ फॉरेन क्रिकेटर्स करारबद्ध झाले. यंदाच्या लिलावात आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक महागडा क्रिकेटपटू होण्याचा मान झारखंडचा युवा यष्टिरक्षक, फलंदाज ईशान किशन याने मिळवला. माजी विजेता मुंबई इंडियन्सने त्याला १५ कोटी २५ लाख रुपयांची बोली लावत आपल्याकडे कायम ठेवले. युवा मध्यमगती गोलंदाज दीपक चहर (१४ कोटी, चेन्नई सुपरकिंग्ज), आघाडीतील फलंदाज श्रेयस अय्यर (१२ कोटी २५ लाख, कोलकाता नाइट रायडर्स), इंग्लंडचा अष्टपैलू लियाम लिव्हिंगस्टोन (११ कोटी ५० लाख, पंजाब किंग्ज), मध्यमगती गोलंदाज शार्दूल ठाकूर (१० कोटी ७५ लाख, दिल्ली कॅपिटल्स), श्रीलंकेचा अष्टपैलू वनिंदू हसरंगा (१० कोटी ७५ लाख, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु), अष्टपैलू हर्षल पटेल (१० कोटी ७५ लाख, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु), वेस्ट इंडिजचा यष्टिरक्षक, फलंदाज निकोलस पूरन (१० कोटी ७५ लाख, सनरायझर्स हैदराबाद), वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन (१० कोटी, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु), वेगवान गोलंदाज आवेश खान (१० कोटी, लखनऊ सुपर जायंट्स) यांनीही सर्वाधिक रक्कम घेणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये नाव नोंदवले.

युवा क्रिकेटपटूंमध्ये एकही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना न खेळलेल्या शाहरुख खानच्या बोलीनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याची मूळ किंमत ४० लाख रुपये आहे. गेल्या वेळी पंजाब किंग्जने शाहरुखला जवळपास ५ कोटी रुपयांना खरेदी केले होते. यावेळीही पंजाबने शाहरुखसाठी ९ कोटी मोजले. आयपीएलमध्ये सर्वाधिक बोली लागलेल्या क्रिकेटपटूंप्रमाणे महाराष्ट्रातील क्रिकेटपटू किती आहेत, याचीही मोठी चर्चा झाली. दहाहून अधिक कोटी मिळवण्यात श्रेयस अय्यर आणि शार्दूल ठाकूर यांचा नंबर लागला. मात्र गतविजेता चेन्नई सुपरकिंग्जनी महाराष्ट्राच्या पाच युवा क्रिकेटपटूंवर विश्वास दाखवला, हे महत्त्वाचे आहे. ऋतुराज गायकवाडला चेन्नईने रिटेन केले आहे. मुंबईकडून खेळणाऱ्या तुषार देशपांडेला २० लाखांच्या बेस प्राइजवर, तर प्रशांत सोळंकी १ कोटी २० लाखांत चेन्नईने खरेदी केले. १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकलेल्या भारतीय संघातील राजवर्धन हंगारगेकरला चेन्नईने दीड कोटींत खरेदी केले. मुकेश चौधरीला २० लाखांच्या बेस प्राइजमध्ये खरेदी केले.

आयपीएल लिलावादरम्यान ऑक्शनर ह्यूज एडमीड्स पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात अचानक बेशुद्ध होऊन खाली पडले. त्यानंतर चारू शर्मा यांनी सूत्रसंचालकांची भूमिका बजावली. कमीत कमी वेळेत उपलब्ध झाल्याने शर्मा यांचे टाळ्या वाजवून स्वागत झाले. लिलावादरम्यान दिल्ली कॅपिटल्सचे सहमालक किरण कुमार गांधी यांनीही वेगळ्या कारणाने लक्ष वेधून घेतले. आयपीएल लिलावात सहभागी असलेल्या प्रत्येक संघाला ९० कोटींचे बजेट होते. रिटेन केलेल्या क्रिकेटपटूंमुळे नियमानुसार प्रत्येक टीमच्या बजेटमध्ये कपात झाली. उर्वरित रकमेत टीम मॅनेजमेंटला जास्तीत जास्त क्रिकेटपटूंची खरेदी करून एक सक्षम टीम उभी करायची होती. पण काही टीम मॅनेजमेंट मुद्दाम क्रिकेटपटूंवर अधूनमधून चढ्या बोली लावत आहेत. यामुळे खेळाडूंचा भाव वधारतो आणि अचानक बोली लावणारे थांबतात. यामुळे शेवटची मोठी बोली लावणाऱ्याला आयत्यावेळी चढ्या दराने क्रिकेटपटूची खरेदी करावी लागते. या प्रकारात पैसे वेगाने संपतात आणि महत्त्वाचे क्रिकेटपटू खरेदी करणे कठीण होऊन बसते. जीएमआर इन्फ्रास्ट्रक्चरचे सीईओ, एमडी आणि संचालक असलेल्या किरण कुमार गांधी हे लिलाव प्रक्रियेत वारंवार ठरवून क्रिकेटपटूंचे दर वधारतील आणि इतर टीमचे पैसे भराभर संपतील, अशी कृती करत होते.

आयपीएलच्या लिलावाचा आणखी एक अध्याय संपला. जास्तीत जास्त बोली लागलेले क्रिकेटपटू आनंदी आहेत. मात्र वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन टी-ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेच्या पूर्वसंध्येला नियोजित कर्णधार रोहित शर्माने केलेले विधान खूप काही सांगून जाते. लिलावाबाबत विचारले असता, संबंधित क्रिकेटपटूंचे अभिनंदन करतो. मात्र आपण दोन महिने आयपीएल खेळतो. उर्वरित दहा महिने देशाचे प्रतिनिधित्व करतो, अशी आठवण करून दिली. रोहितचे हे वक्तव्य खूप काही सांगून जाते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -