फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे
समुपदेशनला नेहमी महिलाच वैवाहिक समस्या घेऊन येतात असे नाही, तर वैवाहिक आयुष्याबाबत मार्गदर्शन, सल्ला घ्यायला अनेकदा विवाहित पुरुष, त्यांच्या कुटुंबातील सदस्य देखील सातत्याने संपर्क साधत असतात, भेट घेत असतात. अशा प्रकारे पुरुषांना प्रामुख्याने त्यांना पती म्हणून समुपदेशन करताना अनेकदा त्यांचा मनापासून अभिमान वाटतो, तसेच अनेकदा त्याच्या घरच्यांबाबत देखील खूप आदर वाटतो.
आपल्या समाजात शक्यतो असेच चित्र निर्माण केलेले असते की, पुरुष कायम महिलेवर अत्याचार करीत असतो आणि महिला अबला असल्यामुळे सतत अन्याय सहन करीत असते. या प्रसंगांना अनेक अपवादसुद्धा आहेत, हे समुपदेशन करताना जाणवते. कोणत्याही कारणास्तव पत्नी रागावून माहेरी गेलेली असेल, अथवा पत्नी फारकतीचा विचार करीत असेल किंवा एकत्र राहत असतानासुद्धा पती-पत्नीमधील कोणतेही मतभेद असतील तरी अनेक पुरुषांची खूप सकारात्मक मानसिकता असते. अनेकदा विवाहित पुरुष विचारतात की, आमचं नेमक काय आणि कुठे चुकत आहे, आमच्या वागण्यात आम्ही काय बदल करू जेणेकरून कौटुंबिक ताण-तणाव निवळतील. अनेकदा पुरुष विचारतात की, आम्ही बदलायला तयार आहोत, आमच्या चुका असल्यास आम्ही त्या सुधारायला देखील तयार आहोत, पण आम्हाला आमचा संसार मोडायचा नाहीये, आम्हाला पत्नीला उत्तमरीत्या नांदवायचे आहे. आम्हाला आमची बायको कायम सोबत हवी आहे.
पत्नीने राग विसरावा, परत सासरी यावं, नवऱ्याला संधी द्यावी, संसार मोडू नये यासाठी पुरुष देखील पूर्ण प्रयत्न करताना दिसतात. वेळप्रसंगी आम्ही तिला कायदेशीररीत्या हवं ते लिहून देतो. तिच्या अटी-शर्ती मान्य करून इथून पुढे तसेच वागतो, पण तिच्यासोबतच राहतो इथपर्यंत त्यांची तयारी दाखवतात. खूप ठिकाणी प्रपंचात स्त्रीची देखील पत्नी म्हणून चूक झालेली असते, पण ते सगळं विसरून मला आजही तिला स्वीकारायचं आहे ही भूमिका पुरुषांची असते. अगदी आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध समजूनसुद्धा, ते सिद्ध होऊनसुद्धा तिला मोठ्या मनाने परत स्वीकारायला, मुलांचे भवितव्य बिघडू नये म्हणून स्वतः तडजोड करायला पुरुष तयार असतात. घर सोडून, संसार सोडून परपुरुषासोबत कायमची राहायला गेलेली पत्नी सुद्धा पती मोठ्या मनाने स्वीकारायला तयार असतात. कारण त्यांना त्यांचा संसार टिकवायचा असतो. समाजात अनेक असे पुरुष आहेत जे महिलांच्या मानसिक अत्याचाराने, धमक्या, मनमानी वागणूक, उधळपट्टी स्वभाव, माहेरचा अतिरिक्त हस्तक्षेप इत्यादींमुळे त्रस्त आहेत. तरीही स्वतःचे कुठेही वाकडे पाऊल न पडू देता, तिला अद्दल घडवायला दुसरीकडे लफडं वगैरे न करता, बदल्याची सुडाची भावना न ठेवता, ते प्रांजलपणे स्वतःच्या देखील काही चुका मोठ्या मनाने मान्य करून पत्नीची माफी मागायला तयार असतात. पत्नीने अजूनही परत यावे, तिच्या घरात तिला आजही स्थान आहे, हा दृष्टिकोन नवऱ्यामध्येसुद्धा पाहायला मिळतो.
प्रपंचात पती-पत्नीपेक्षाही महत्त्वाची भूमिका असते ती महिलेच्या सासरच्या लोकांची. बहुतांश घरांमध्ये पुरुष कितीही चुकीचे वागला तरी त्याची पाठराखण करताना त्याच्या घरचे घरातल्या सुनेवर मात्र सपशेल अन्याय करीत असतात. यासारख्या उदाहरणांना देखील काही ठिकाणी अपवाद आहेत, हे समजल्यावर खरंच त्यांचा अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही. आपला मुलगा, आपला भाऊ जर चुकत असेल, तर त्याला स्पष्ट विरोध करणे, त्याला जाब विचारणे, त्याला चुकीच्या वागण्यापासून परावृत्त करणे आणि सुनेच्या पाठीमागे खंबीर उभे राहणारे सासर देखील समाजात आहे. सतत सुनेला दोष-आरोप न देता, तिची निंदा न करता आपल्या मुलाची कानउघाडणी करणारे माता-पिता पण अस्तित्वात आहेत, याचा गर्व वाटतो. आपल्या घरातील सुनेचा, पत्नीचा यथोचित आदर करणे, तिच्या भावना समजावून घेणे, तिला मानसिक, शारीरिक, भावनिक त्रास आपल्यामुळे होऊ नये यासाठी पतीसुद्धा जेव्हा डोळ्यांत पाणी आणतात तेव्हा जाणीव होते की, कायमच पुरुष चुकीचा नसतो, खोटा नसतो. वाहिनीच्या पाठीमागे सुख-दुःखात उभ्या राहणाऱ्या, तिला बहिणीप्रमाणे जीव लावणाऱ्या नणंदा, सासरी असल्यावर माहेर विसरायला लावतील अशा मैत्रिणीसारख्या जावा, कायम आदर देतील असे घरातील इतर सदस्य आजही अनेक कुटुंबात अस्तित्वात आहेत. समुपदेशन दरम्यान अनेकदा पती तसेच त्यांच्या कुटुंबातील लोकांशी संवाद साधण्याचा प्रसंग येतोच. सुनेला, पत्नीला योग्य ते स्थान, योग्य तो न्याय मिळण्यासाठी अनेकदा सासरचेसुद्धा प्रयत्नशील दिसतात. स्वतःचा मुलगा, भाऊ पती म्हणून जर चुकीचं वागत असेल, तर त्याच्याविरोधात जाऊन त्याला वठणीवर आणायलासुद्धा सासरचे मागे-पुढे पाहत नाहीत.
समुपदेशन दरम्यान येणाऱ्या अनेक प्रकारणांमधील पती, त्यांची भूमिका, त्यांच्या पत्नीकडून असलेल्या अतिशय वाजवी आणि माफक अपेक्षा, कमीपणा घेण्याची तयारी, सकारात्मक मार्ग काढण्याची मानसिकता खरंच त्यांच्याबद्दलचा आदर द्विगुणित करतात. अनेक स्त्रियांना लग्न झाल्यावर पुढे शिकण्यासाठी, नोकरी-व्यवसाय करू देण्यासाठी नवराच पुढाकार घेतो. अनेक ठिकाणी पत्नीच्या कला-गुणांना प्रोत्साहन देणे, तिची चार लोकांत स्तुती करणे, तिला आर्थिक स्वातंत्र्य देणे देखील पुरुष करतात. अनेक ठिकाणी सासरची मंडळी सुनेच्या शिक्षणाचं, तिच्यातील गुणांचं तोंडभरून कौतुक करताना दिसतात. कोणत्याही कारणास्तव कौटुंबिक भांडण, वादविवाद असून देखील अतिशय खरं, चांगलं, स्पष्ट, नि:स्वार्थी मत आपल्या सुनेबद्दल तिच्या अनुपस्थितीमध्ये मांडणं यांसारखा मनाचा प्रामाणिकपणा खूप क्वचित पाहायला मिळतो. घरातील पत्नी अथवा सुनांचा तोंडावर पदोपदी अपमान करणारे पती अथवा कौटुंबिक सदस्य यांच्या सातत्याने तक्रारी येत असताना देखील जेव्हा सुनेच्या माघारीसुद्धा तिची स्तुती करणारे, तिचा अभिमान बाळगणारे सासू-सासरे, नणंदा, जावा, दीर पाहिले की समजते, अशी सुसंस्कृत, सुसंस्कारी कुटुंब देखील आपल्याच समाजात आहेत.
या लेखामार्फत समस्त महिलांना हाच संदेश द्यावासा वाटतो की, पुरुषांना स्वतःच्या भावना रडून जरी व्यक्त करता आल्या नाहीत, तरी तो मनातून खूप खचलेला असू शकतो, खूप उदास असू शकतो आणि त्याला समजावून घेणे पत्नी म्हणून आपलीही जबाबदारी आहे.पुरुष विवाहबाह्य संबंध ठेवतात, असे सर्रास बोलले जाते, पण त्याच्यासोबत अनैतिक संबंध ठेवणारी महिलाच असते. एका स्त्रीचा संसार उद्ध्वस्त करणारी दुसरी स्त्रीच अशा प्रकरणात असते, हे देखील विसरून चालणार नाही. अनेकदा पतीची चूक नसतानाही पतीचे कुटुंबीय पत्नीला मानसिकरीत्या अपमानित करून, तिचे खच्चीकरण करून पती-पत्नीत वाद निर्माण होईल, असे वागतात. अनेकदा स्त्रियांच्या माहेरचे देखील पतीला अपमानित करणे, त्याचा मानसन्मान धुळीस मिळवणे, असे प्रकार करतात. त्यामुळे अनेकदा पतीचा नाईलाज होतो आणि त्याला पत्नीला दुखवावे लागते, वादाला तोंड फुटते. महिलांनी कोणत्याही प्रापंचिक वादाला किती महत्त्व द्यायचे, कोणता वाद चव्हाट्यावर न्यायचा, कोणता घरातच मिरवायचा, यावर योग्य विचार करणे क्रमप्राप्त आहे, जेणेकरून समाजात अशी अनेक आदर्श कुटुंब आणि आदर्श पती आपल्याला पाहायला मिळतील.