Friday, May 9, 2025

देशमहत्वाची बातमी

पाच राज्यातल्या निवडणुकांनंतर पुन्हा इंधन दरवाढ?

पाच राज्यातल्या निवडणुकांनंतर पुन्हा इंधन दरवाढ?

नवी दिल्ली : जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत असतानाही देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत नाहीत. याचा परिणाम तेल कंपन्यांच्या उत्पन्नावर होत आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करत नाहीत. निवडणुकीनंतर तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लिटरमागे ५ ते ६ रुपयांनी वाढ करू शकतात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.


पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ न झाल्यानं कंपन्यांचं मोठं नुकसान होत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अशा स्थितीत प्रतिलिटर पाच ते सहा रुपयांनी दरवाढ करणं आवश्यक झालं आहे. तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती चढत्या राहिल्या तर, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती नक्कीच वाढतील.


आयसीआयसीआय सिक्युरिटीजचे विश्लेषक प्रबल सेन यांचं म्हणणं आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उताराचा परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसून येत आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल एक डॉलरने वाढली, तर देशांतर्गत बाजारात किंमत प्रतिलिटर ४५-४७ पैशांनी वाढते. मात्र परदेशी बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असल्या तरी दिवाळीपासून देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. नोव्हेंबरपासून कच्चे तेल प्रति बॅरल २५ डॉलरवर वर पोहोचलं आहे.


रशिया आणि युक्रेनमधील तणाव कायम असल्यानं आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती मंगळवारी ९४ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या. २०१४ नंतर पहिल्यांदाच क्रूडच्या किमतीने एवढी पातळी गाठली आहे. रशिया आणि युक्रेनमधील तणाव कायम राहिल्यास कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल १२५ डॉलरपर्यंत पोहोचू शकते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

Comments
Add Comment