नवी दिल्ली : युक्रेनमध्ये सध्या प्रचंड अस्थिरतेची स्थिती असून रशियाकडून युद्ध छेडले जाण्याची दाट शक्यता असल्याचा दावा खुद्द युक्रेनकडूनच करण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये सध्या वास्तव्यास असलेल्या भारतीयांनी सुरक्षेच्या कारणास्तव मायदेशी परतावे असे आवाहन भारतीय दुतावासाने केला आहे. यासाठी दुतावासाने भारतीयांसाठी संदेशही जाहीर केला आहे.
या संदेशपत्रात दुतावासाने म्हटले आहे की, सध्याची युक्रेनमधील अनिश्चिततेची स्थिती पाहता येथे असलेल्या भारतीय नागरिकांनी विशेषतः ज्या विद्यार्थ्यांना येथे राहणे गरजेचे नाही त्यांनी तात्पुरत्या स्वरुपात मायदेशी परतावे. त्याचबरोबर भारतीय नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की युक्रेन अंतर्गत सर्व प्रकारचे अनावश्यक प्रवास त्यांनी टाळावेत. भारतीय नागरिकांना विनंती आहे की, त्यांनी युक्रेनमधील त्यांच्या वास्तव्याबाबत भारतीय दुतावासाला माहिती द्यावी. यामुळे दुतावासाला भारतीयांना सर्व प्रकारची आवश्यक ती सुविधा पुरवण्यात येईल, असेही या संदेशपत्रात लिहिले आहे.
युक्रेनवरून अमेरिका आणि रशिया यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. युक्रेनच्या सीमेवर तब्बल 1 लाख 30 हजार सैनिकांच्या तैनातीनंतर युक्रेनने आपली भूमिका जाहीर केली आहे. रशिया आपल्या देशावर लवकरच हल्ला करण्याच्या तयारीत असून हल्ल्याची तारीख 16 फेब्रुवारी दिल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र, हा आरोप रशियाने पूर्णपणे फेटाळून लावला आहे. दरम्यान, अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने बेलारूसमधील आपल्या नागरिकांना परत येण्यास सांगितल्यामुळे युध्दजन्यस्थिती निर्माण झाल्याचे स्पष्ट होत आहे.