मुंबई : राज्यातील कोव्हिड सेंटर घोटाळाप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मंगळवारी मुंबईच्या आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावेळी त्यांनी पोलिसांकडे ८९ पानांचे तक्रारपत्र सुपूर्द केले. पोलिसांनी आता यावरुन सात दिवसांत गुन्हा दाखल करावा. अन्यथा आम्ही आझाद मैदान पोलिसांना न्यायालयात खेचू, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.
आझाद मैदान पोलीस ठाण्यातून बाहेर आल्यानंतर किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, आम्ही संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या आशीर्वादाने सुजीत पाटकर यांच्या बनावट कंपनीला कोव्हिड सेंटरचे कंत्राट देण्यात आले. सुजीत पाटकर यांच्या कंपनीला कंत्राट देऊन मुख्यमंत्र्यांनी कोव्हिड रुग्णांच्या जीवाशी खेळ करुन धंदा केला आहे. पुणे महानगरपालिकेने सुजीत पाटकर यांच्या कंपनीला ब्लॅकलिस्ट केले होते. तरीही त्यांच्या कंपनीला १३ कंत्राटे देण्यात आली, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले.
सुजीत पाटकर यांच्या कंपनीने कोव्हिड सेंटरचे कंत्राट मिळवण्यासाठी दाखल केलेली कागदपत्रे बनावट होती. अनेक कोव्हिड सेंटरमध्ये डॉक्टर्स आणि नर्सेस नव्हत्या. बीएएमएस डॉक्टर्सला एमडी म्हणून दाखवण्यात आले. ही कागदपत्रं खोटी असतील तर माझ्यावर गुन्हा दाखल करा. अन्यथा सुजीत पाटकर यांच्या कंपनीवर आणि त्यांना कंत्राट देणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. मी गेल्या १५ दिवसांपासून ही कागदपत्रे दाखवत आहे. मग अजूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांच्या पार्टनरला अटक का केली नाही, असा सवाल किरीट सोमय्या यांनी विचारला.
यावेळी किरीट सोमय्या यांनी माझी पत्नी मेधा आणि मुलगा नील सोमय्या यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. संजय राऊत यांनी मला खुशाल बर्बाद करावं, पण रुग्णांच्या जीवाशी खेळ करु नये. माझ्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी फरक पडत नाही, असेही सोमय्या यांनी म्हटले.
दरम्यान, पुणे आणि मुंबईतील कोव्हिड केंद्रांच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असा आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांना आता कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. कोव्हिड केंद्रांचे कंत्राट मिळालेल्या लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस या कंपनीकडून सोमय्या यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसने किरीट सोमय्या यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. किरीट सोमय्या यांनी नोटीस मिळाल्यानंतर २४ तासांत लेखी माफी मागावी. अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार राहावे, असे कंपनीने म्हटले आहे.
आमच्या कंपनीला कोव्हिड सेंटरचे कंत्राट हे कायदेशीर प्रक्रियेने मिळाले होते. त्यामुळे कुठल्याही यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी झाली तरीही आम्ही त्यासाठी तयार आहोत, असे लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता यावर किरीट सोमय्या काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.