
मुंबई : शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्यातील भाजप सरकार आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. राज्यात भाजपचे सरकार असताना सरकारने महाआयटीमध्ये २५ हजार कोटींचा घोटाळा झाला असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. हा गंभीर आरोप करताना राऊत यांनी अमोल काळे आणि विजय ढवंगाळे यांची नावे घेतली आहेत. यांच्या बँक खात्यातून पैसे कुठे कुठे गेले, विना टेंडर कोणाला कंत्राट दिले गेले, याची तक्रार आपण करणार असल्याची घोषणा खासदार राऊत यांनी केली आहे.
संजय राऊत यांनी म्हटले आहे की, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे. खोटे आरोप, बदनाम्या, त्यांचा दबाव, एकतर तुम्ही गुडघे टेका नाहीतर सरकार आम्ही घालवू, अशा प्रकारच्या धमक्या सतत दिल्या जात आहेत. ज्या महाराष्ट्रामध्ये १७० आमदारांचं बहुमत असताना भाजपचे लोक सरकार पडण्याची एक तारीख देतात, ती कशाच्या आधारावर देतात? यासंदर्भात मी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून केंद्रीय तपास यंत्रणा कशाप्रकारे त्रास देत आहेत, याबाबत तक्रार केली आहे.
भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला सांगितले आहे की, तुम्ही या सरकारच्या वाटेतून बाजूला व्हा, तुम्ही मध्ये पडू नका, तुम्ही आम्हाला मदत करा. जर तुम्ही काही लोकांनी आम्हाला मदत केली नाही, तर केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला टाईट करतील. त्यानुसार दिल्लीत सिद्धता झाली आहे. तुम्ही मदत केली नाही तर तुम्हाला भविष्यात पश्चात्ताप होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
पुढे त्यांनी म्हटले की, सध्या पवार कुटुंबियांवर धाडी पडत आहेत. त्यांना सुद्धा टाईट करु, असे सांगण्यात आले होते. त्यानंतर ईडीचे लोक पवार कुटुंबियांवर धाडी टाकू लागले. ईडी तर आहेच, त्याचबरोबर केंद्रीय पोलिस बल लावू, त्यानंतर तिसऱ्या दिवशी माझ्यावर आणि निकटवर्तीयांवर ईडीच्या धाडी पडायला लागल्या. मुलुंडचा दलाल (किरीट सोमय्या) सांगतो की आता संजय राऊतांवर धाडी पडत आहेत. तुमचं सरकार आलं नाही, म्हणून याप्रकारे सूड उगवत आहात आणि तुम्हाला असं वाटतं की आम्ही झुकू? हे शक्य नाही, असे राऊत म्हणाले.
माझ्या मुलीच्या लग्नाच्या खर्चाच्या हिशोबाला हे लोक लागले. हारवाले, मंडपवाले, मेहंदीवाल्याकडे गेले. किती पैसे दिले अशी विचारणा केली. गुजरातमध्ये इतका घोटाळा झाला त्याचं काहीच केलं नाही. भाजपच्या एका मंत्र्याच्या मुलीचं लग्न झालं. त्यात जंगलाचा सेट केला. त्यात कार्पेट टाकलेलं त्याची किंमत साडेनऊ कोटी होती. घरात शिरायचं नाही, पण तुम्ही आमच्या घरात शिरताय, मुलांच्या, नातेवाईकांच्या घरात शिरताय. जेलमध्ये टाकणार आहात, टाका... पण माझ्यासोबत तुम्हीही असणार आहात.
माझ्या आय़ुष्यात कधीच चुकीचं काम केलं नाही. २० वर्षांचे स्टेटमेंट घेऊन गेले. ईडीचा तपास गंमतीचा आहे. माझं गाव अलिबाग, माझी जमिन अलिबागला असेल ना, मॉरिशिअसला नसेल ५० गुंठे जमिनीचा तपास ईडी करतंय. ५० गुंठे जमिनीसाठी ईडीच्या लोकांनी तिथल्या गावात नातेवाईकांना पहाटे चार वाजता गरीब लोकांना ईडीच्या कार्यालयात आणून बसवलं, संजय राऊतांच्या विरोधात लिहून दे, तुला किती कॅश दिली असं त्यांना धमकी दिली. गरीब लोक घाबरतायत ते, १२ - १४ तास त्यांना बेकायदा डांबून ठेवलं. कोणत्या कायद्याने कोणता तपास करताय.
'ईडी दूधवाल्या एन नरवरला ओळखते का?'
मागील फडणवीस सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करताना खासदार संजय राऊत यांनी हरयाणातील एन नरवर या दूधवाल्याचा उल्लेख केला. राऊत म्हणाले की एन नरवर हा हरयाणातील एक दूधवाला आहे. मी ईडीला विचारतो की, या नरवरला ओळखता का? हा दूधवाला आहे. या दूधवाल्याकडे ७ हजार कोटींची संपत्ती आहे. हा दूधवाला ७ हजार कोटींचा मालक कसा बनला? त्याच्याकडे कोणाचा पैसा आहे? असा प्रश्नांचा भडीमार राऊतांनी केला. राज्यात भाजपचे सरकार होते तेव्हा हा दूधवाला नरवर महाराष्ट्रात ये-जा करत होता. त्यानंतरच त्याची ही मालमत्ता तयार झाली, असा गंभीर आरोप करताना हे मनी लाँड्रिंग कोणी केले, याबाबत मी तक्रार करणार असल्याचे खासदार राऊत म्हणाले.
किरीट सोमय्या म्हणजे मुलुंडचा दलाल
पुढे त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांचा उल्लेख मुलुंडचा दलाल असे करत म्हटले की ठाकरे परिवाराच्या नावावर कोरलाई गावात १९ बंगले बांधून ठेवले आहेत, असा दावा त्या मुलुंडच्या दलालाने केला आहे. माझं त्याला आव्हान आहे, कधीही सांगा आपण चार बसेस करु आणि १९ बंगल्यांमध्ये पत्रकारांची पिकनीक काढू. मी देतो चाव्या. ठाकरेंच्या मालकीचे बंगले आढळले तर मी राजकारण सोडेन. जर दिसले नाहीत तर संपूर्ण शिवसेना किरीट सोमय्यांना जोड्याने मारेल.
लोकांच्या मनात भ्रम निर्माण करायचा. मराठी माणसाचा द्वेष, महाराष्ट्राविषयी असूया, हायकोर्टात सोमय्यांनी मराठी भाषा मुंबईतून, शालेय शिक्षणात सक्तीची असू नये यासाठी धाव घेतली होती. त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची, आणि मुंबईत मराठी कट्टा चालवता? असा सवालही त्यांनी केला आहे.
पीएमसी बँक घोटाळ्यात किरीट आणि नील सोमय्या यांना अटक करा
पीएमसी बँक घोटाळ्याचा सोमय्यांकडून पुन्हा पुन्हा उल्लेख केला त्यातला मुख्य आरोपी राकेश वाधवानशी आमचे संबंध असल्याचे सांगितले. राकेश वाधवानच्या खात्यातून भाजपच्या खात्यात वीस कोटी गेले, पक्ष निधीच्या नावावर. मला सांगा निकॉन इन्फ्रा कंपनी कोणाची आहे? ती किरीट सोमय्यांची आहे. किरीट सोमय्या राकेश वाधवानचे भागिदार आहेत. किरीट समोय्यांनी हजारो कोटींचा प्रकल्प उभारला आहे. त्यांचा वसईत प्रकल्प आहे. पीएमसी बँक घोटाळ्यात सोमय्यांनी ब्लॅकमेल करून कॅश आणि दुसऱ्याच्या नावावर जमीन घेतली.
पीएमसी घोटाळ्यातला मुख्य आरोपी असलेल्या वाधवानकडून कोट्यवधी रुपयांची जमिन लाडानी याच्या नावावर घेतली. रोख रक्कमसुद्धा घेतली. ही रक्कम ८० ते १०० कोटींच्या घरात आहे. वसईत ४०० कोटी रुपयांची जमिन लाडानीच्या नावावर साडेचार कोटी रुपयांना घेतली आहे.
ईडीवाल्यांनो ऐका, हिंमत असेल तर माझ्या घरी या... जितेंद्र नवलानी कोण आहे?
ईडीवाल्यांनो ऐका, हिंमत असेल तर माझ्या घरी या... मै नंगा आदमी हू, मै शिवसैनिक हू... तुम्ही कितीही मला अडकवण्याचा प्रयत्न करा, जितेंद्र चंद्रलाल नवलानी कोण आहे, हे नाव ऐकून मुंबई आणि ईडीच्या अधिकाऱ्यांचा श्वास बंद होईल. चार महिन्यांपासून बिल्डर्सकडे वसुली सुरु आहे. ईडीच्या नावाने वसुली होत आहे. याची ईडीला सुद्धा माहिती आहे. हे कोण आणि कोणाची माणसं याचा डेटा आहे. मी सर्वात आधी पंतप्रधान मोदींना, अमित शहांना देणार आणि त्यानंतर तुम्हाला सांगेन...जितेंद्र नवलानी, फरिद शमा, रोमी आणि फिरोज शमा कोण?
मुंबईतल्या ६० लोकांनी ३०० कोटी जमा केले. कुठं झालं मनी लाँड्रिंग आणि ईडीचे लोक कुठं बसतात, काय करतात? हे मी देशाला सांगेन. मला गोळी मारा, जेलमध्ये टाका, काहीही करा, मी घाबरणार नाही.