कणकवली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसमुळे कोरोना वाढला असल्याचे व्यक्तव्य संसदेत केले होते. त्याचा निषेध म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या नेतृत्त्वाखाली आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यासाठी मोर्चाने निघाले होते. त्यावेळी पोलिसांनी अगोदरच हा मोर्चा रोखत कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान भाजप कार्यकर्ते सुद्धा राणेंच्या बंगल्यासमोर आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी जमा झाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सिंधुदुर्गातले काँगेस कार्यकर्ते आज आक्रमक झाले होते. मोदींनी कोरोना काँग्रेसमुळे वाढला असे वक्तव्य केले होते. त्याचा निषेध म्हणून राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्यासमोर मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार कणकवली येथे काँग्रेस कार्यालयापासून सकाळी साडेअकरा वाजता मोर्चाला सुरुवात झाली. मात्र कणकवली प्रांत कार्यालय येथे मोर्चा आला असता पोलिसांनी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांची रवानगी कणकवली पोलीस ठाण्यात केली.
दरम्यान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करणार असे आव्हान देताच प्रति आव्हान देत भाजपा कार्यकर्ते राणेंच्या बंगल्या बाहेर एकवटले. हिम्मत असले तर बंगल्यावर येऊन दाखवा, असे प्रतिआव्हान भाजपा तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संतोष कानडे यांनी दिले होते. त्यानुसार भाजपाचे कार्यकर्ते जिल्हाभरातून एकवटले होते. काँग्रेसने आंदोलन करण्याचा इशारा देऊन नाहक कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा बंगला हा खाजगी आहे शासकीय नाही, त्यामुळे येथे आंदोलन करता येणार नाही. उगाच आम्हाला आव्हाने देऊ नका, असा इशारा यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी दिला.