
कोविड विषाणू जनुकीय सूत्र निर्धारण अंतर्गत नवव्या चाचणीचे निष्कर्ष जाहीर
१९० पैकी २३ जणांचा मृत्यू, पैकी १५ जणांनी घेतली नव्हती कोविड लस
मृत २३ पैकी २१ रुग्ण हे ६० वर्षांपेक्षा अधिक वयाचे व सहव्याधीग्रस्त
मुंबई (हिं.स.) : कोविड १९ विषाणूच्या जनुकीय सूत्राचे निर्धारण (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग) करणा-या चाचणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या निर्देशानुसार नियमितपणे केल्या जात आहेत. या अंतर्गत नवव्या तुकडीमध्ये मुंबईतील १९० रुग्णांमधील कोविड विषाणू नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला असून त्याचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. यात ‘ओमायक्रॉन’ चे ९४.७४ टक्के रुग्ण आढळले आहेत. या १९० पैकी २३ रुग्णांचा मृत्यू ओढवला. पैकी २१ रुग्ण हे ६० वर्षांपेक्षा अधिक वयाचे व सहव्याधीग्रस्त होते. एवढेच नव्हे तर या २३ पैकी १५ जणांनी कोविड लसीचा एकही डोस घेतला नव्हता. त्यामुळे कोविड लसीकरण आवश्यक असल्याची बाब पुन्हा स्पष्ट झाली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात स्थित नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅब व पुणे स्थित राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या नवव्या चाचणी तुकडीचा (बॅच) भाग म्हणून कोविड बाधा झालेल्या एकूण २८२ रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यातील १९० रुग्ण हे मुंबई महानगरातील नागरिक आहेत. त्यामुळे या १९० नमुन्यांसंदर्भातील निष्कर्ष देण्यात येत आहेत.
सदर १९० रुग्णांचे वयोगटनिहाय वर्गीकरण पुढीलप्रमाणे
- ० ते २० वर्षे वयोगट - १७ रुग्ण (९ टक्के)
- २१ ते ४० वर्षे वयोगट - ३६ रुग्ण (१९ टक्के)
- ४१ ते ६० वर्षे वयोगट - ४१ रूग्ण (२२ टक्के)
- ६१ ते ८० वयोगट - ७४ रुग्ण (३९ टक्के)
- ८१ ते १०० वयोगट - २२ रुग्ण (१२ टक्के)
कोविड विषाणू उपप्रकारानुसार या १९० बाधित रुग्णांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे
- ओमायक्रॉन - १८० रुग्ण (९४.७४ टक्के)
- डेल्टा व्हेरिअंट - ३ रुग्ण (१.५८ टक्के)
- डेल्टा – १ रुग्ण (०.५३ टक्के)
- इतर - ६ रुग्ण (३.१६ टक्के)
या १९० पैकी वय वर्ष १८ पेक्षा कमी असलेल्या वयोगटामध्ये १३ जण मोडतात. पैकी,
- ११ जणांना ओमायक्रॉनची बाधा
- एका जणास डेल्टा डेरिव्हेटीव्हची बाधा
- एका जणास इतर उप प्रकाराची लागण
कोविड लसीकरण निकष लक्षात घेता, १९० पैकी १०६ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. पैकी,
- पहिला डोस घेतलेले ५ जण रुग्णालयात दाखल.
- दोन्ही डोस घेतलेल्यांपैकी ५० जण रुग्णालयात दाखल.
- लसीचा एकही डोस न घेतलेले ५१ जण रुग्णालयात दाखल.
रुग्णालयात दाखल १०६ पैकी फक्त ९ जणांना प्राणवायू पुरवठा करावा लागला. तर ११ जणांना अतिदक्षता उपचारांची गरज भासली.
एकूण १९० संकलित नमुन्यांपैकी २३ नमुने मृत रुग्णांशी संबंधीत संकलित केले आहेत. पैकी,
मृत रुग्णांमध्ये वय वर्ष ६० ते ८० या वयोगटातील १३, तर ८१ ते १०० या वयोगटातील ८ अशा एकूण २१ नागरिकांचा समावेश आहे. प्रामुख्याने ते सहव्याधीग्रस्त देखील होते.
मृतांपैकी १५ जणांनी कोविड लसीचा एकही डोस घेतला नव्हता.
२३ पैकी २१ नागरिकांना ओमायक्रॉन, तर इतर दोघांना अन्य उप प्रकाराची लागण झाली होती.
लक्षणे आढळल्याच्या सातव्या दिवसानंतर २२ जणांचा तर सात दिवसांच्या आत एकाचा मृत्यू झाला.
कोविड विषाणूचा धोका अद्याप टळलेला नसल्याने, नागरिकांनी गाफील न राहता कोविड प्रतिबंधक वर्तन कायम ठेवले पाहिजे. सर्वांनी मुखपट्टी (मास्क) चा उपयोग करणे, सुरक्षित अंतर राखणे, हातांची स्वच्छता आदी नियमांचे पालन कठोरपणे करणे आवश्यक आहे. कोविड बाधा निष्पन्न झाल्यानंतर प्रत्येकाने वेळीच व योग्य वैद्यकीय उपचार घेणे देखील आवश्यक आहे.
सर्व पात्र नागरिकांनी कोविड लसीकरण पूर्ण करुन घेणे देखील गरजेचे आहे. लसीकरण पूर्ण करुन घेणाऱयांना व कोविड प्रतिबंधक नियम पाळणाऱयांना विषाणू बाधेपासून सर्वाधिक संरक्षण मिळते तसेच बाधा झाली तरी त्याची तीव्रता पूर्णपणे रोखता येते. लस न घेतलेल्यांना कोविड बाधेपासून तीव्र धोका संभवतो, हा वैद्यकीय इशारा लक्षात घेता सर्व पात्र नागरिकांनी कोविड लसीचे दोन्ही डोस घेवून लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करुन घेणे आवश्यक आहे.