शिबानी जोशी
काही वर्षांपूर्वी मुंबईतील चेंबूर हा भाग म्हणजे छोटसं गावच होतं. शिक्षणाच्या सोयीही विशेष उपलब्ध नव्हत्या. चेंबूरमधील मुलांना कुर्ला, दादर येथे शिक्षण घेण्यासाठी जावे लागत असे. तिथे अनेक सिंधी समाजातील लोकही येऊन राहिले होते. त्यांच्याही मूलभूत गरजा होत्या.
त्याच काळात विवेकानंद एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली. आज याच शैक्षणिक संस्थेमुळे चेंबूर परिसर एज्युकेशन हब म्हणून ओळखला जात आहे.
१९६२ मध्ये हशू अडवाणी यांनी फक्त २६२ विद्यार्थ्यांमध्ये एक छोटीशी शाळा उभी केली. आज त्याच संस्थेत बावीस हजार विद्यार्थी नर्सरीपासून मॅनेजमेंटपर्यंतचं उच्चशिक्षण घेत आहेत. आज संस्थेच्या जवळजवळ अठरा इन्स्टिट्यूटमध्ये विविध कोर्सेस उपलब्ध आहेत. यात मॅनेजमेंट, फार्मसी, पॉलिटेक्निक, इंजिनीअरिंग, आर्किटेक्चर, लॉ अशा उच्च शिक्षणापासून मराठी, हिंदी, इंग्रजी माध्यमाच्या शाळा तसेच डे केअर सेंटर, योगा अभ्यास वर्ग, वोकेशनल गायडन्स ब्युरो, संशोधन यांचा समावेश आहे. स्वामी विवेकानंद यांच्या विचार आणि तत्त्वज्ञानावर आधारित या संस्थेतून संस्कारक्षम आणि दर्जेदार शिक्षण दिलं जात आहे. संस्थेची अनेक कॉलेजेस आज मुंबईतली उच्च रँकिंग वर्गातली असून या ठिकाणी ॲडमिशन मिळण्यासाठी हुशार विद्यार्थ्यांची नेहमीच धडपड असते. आज संस्थेचे अनेक विद्यार्थी गुगल, मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या जागांवर असून अनेक विद्यार्थी संशोधक म्हणून देश-विदेशात कार्यरत आहेत आणि संस्थेचे नाव उंचावत आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये आज संस्थेने किती मोठा दर्जा प्राप्त केला आहे, हे संस्थेला भेट दिलेल्या व्यक्तींवरून आपल्याला लक्षात येऊ शकेल. देशाचे माजी राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री तसेच अनेक मंत्र्यांनी संस्थेला काही ना काही निमित्ताने भेटी दिल्या आहेत. माजी राष्ट्रपती ए. पी.जे. अब्दुल कलाम, व्यंकट रमण, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, भाजपचे लालकृष्ण अडवाणी, स्मृती इराणी, मुरली मनोहर जोशी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील अशा अनेकांनी संस्थेला भेट देऊन वाहवा केली आहे.
स्वातंत्र्यानंतर हजारो सिंधी बांधव स्थलांतर करून मोठ्या संख्येने मुंबईत आले. त्यांच्याकडे ना शिक्षणाच्या सोयी होत्या, ना घर होतं. सिंधी समाजातील हशू अडवाणी हे संघ विचारांचे होते. मुंबई उपनगरातील चेंबूर भागात याच ध्येयाने प्रेरित हा शिक्षणप्रेमी तरुण फाळणीनंतर विस्थापित झालेल्या विस्थापितांचे पुनर्वसन करण्याचं कार्य करत होता. पुनर्वसनामध्ये महत्त्वाचा भाग ठरतो तो म्हणजे शिक्षण. चेंबूर भागातील मुलांना भारतीय संस्कृतीतील मूल यांबरोबरच चांगलं शिक्षण मिळावं यासाठी हशू अडवाणी यांनी शिक्षण संस्थेचे स्वप्न पाहिलं आणि १९५९ साली विवेकानंद एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली आणि हशू अडवाणींचे शिक्षण संस्थेचे स्वप्न १९६२ साली साकार झाले. त्यानंतर विविध शैक्षणिक संस्थांची उभारणी झाली. त्यापैकी हशू अडवाणी कॉम्प्लेक्सची पायाभरणी करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी ६ जानेवारी २००३ रोजी आले होते. हशू अडवाणी या नि:स्वार्थी सामाजिक कार्यकर्त्याने समाजासाठी आपलं सर्वस्व अर्पण केले, अनेक पदे भूषवली; परंतु आपल्या पदाचा लाभ सरकारी यंत्रणेकडून कधीही उठवला नाही. त्यांचे आयुष्य म्हणजे तात्त्विक मूल्यांचे योगदान, स्वतःचा विचार कधीच केला नाही आणि इतर सहकाऱ्यांच्या सहकार्याने शैक्षणिक संस्था स्थापन केली, वाढवली आणि आज ती महाराष्ट्राची मानबिंदू ठरली आहे, असे गौरवोद्गार वाजपेयी यांनी त्यावेळी काढले होते. यातूनच हशू अडवाणी यांचे नि:स्वार्थी सामाजिक कार्य प्रतीत होतं.
संस्थेचे विश्वस्त आणि सभासद काही उच्चशिक्षित नव्हते तसेच लक्ष्मीचा वासही त्यांच्या घरी नव्हता. दहा शिक्षणप्रेमी एकत्र आले आणि त्यांनी एक २६२ विद्यार्थ्यांची शाळा विकत घेतली आणि त्यानंतर चांगल्या कामाला सढळ हस्ते मदत मिळत गेली आणि या बिजाचा वटवृक्ष झाला. शिक्षण संस्थांबरोबरच विवेकसिंधू केंद्र, नारी शाळेत स्त्रियांना शिवण कलेत पारंगत केलं जातं, तसंच व्होकेशनल गायडन्स ब्युरोमध्ये विद्यार्थ्यांना भवितव्याची निवड करण्यासाठी मार्गदर्शनही केलं जातं. दोन वर्षांपूर्वी या संस्थेने नागरी सेवा परीक्षांसाठी प्रशिक्षण देणारा उपक्रम सुरू केला आहे. तसेच लीडरशिप अँड रिसर्च अॅकॅडमीचीही सुरुवात केली आहे. शिक्षण क्षेत्रात आज प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना कॅपिटेशन फी, देणग्या द्याव्या लागतात; परंतु विवेकानंदच्या सर्व संस्थांत प्रवेश केवळ कर्तृत्वावर दिला जातो, कुठल्याही प्रकारची देणगी किंवा कॅपिटेशन फीचा स्वीकार केला जात नाही. विवेकानंद इंजिनीअरिंग कॉलेजची गणना तर महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये केली जाते. तात्त्विक मूल्य, शिस्त आणि ध्येय यावर संस्थेचा भर असून विद्यार्थ्यांना मूल्याधारित उत्कृष्ट शिक्षण देऊन त्यांना कर्तृत्ववान बनवणं याच धेयानं संस्था सतत कार्यरत असते.
कला आणि संस्कृतीचं दर्शन घडावं यासाठी १९९५ सालापासून दरवर्षी भक्ती संगीताचे कार्यक्रम आयोजित केले होते, जे खूप लोकप्रिय झाले होते. २००३ साली झालेल्या चैतन्य कार्यक्रमात तर पद्मभूषण संगीतकार नौशाद अली यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ या गीतेतील शिकवणीला अनुसरून आणि तेच संस्थेचं ब्रीदवाक्य स्वीकारून सर्व विश्वस्तानी, हशू अडवाणी यांनी लावलेलं छोटंसं रोपटं वाढवलं आहे.
संस्थेच्या सर्वच इन्स्टिट्यूटमध्ये अत्यंत दर्जेदार आणि मौलिक शिक्षण दिलं जात आहे, त्यामुळे भविष्यात विवेकानंद एज्युकेशन सोसायटी डीम्ड युनिव्हर्सिटी व्हावी, असे स्वप्न विश्वस्तांच्या मनात आहे.