
मुंबई : देश-विदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी साईबाबा मंदिर आणि शहर परिसराची दहशतवाद्यांनी रेकी केल्याचे समोर आले आहे. धक्कादायक घटना समोर आल्यानंतर शिर्डी शहरात खळबळ उडाली असून सुरक्षा व्यवस्थेत आणखी वाढ करण्यात आली आहे.
गुजरात दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेले अतिरेकी मौलाना शब्बीर पठाण, अयुब झबरावाला, मौलाना गनी उस्मानी यांनी मूळचे शिर्डीचे रहिवासी आणि सध्या दिल्लीत वास्तव्यास असणाऱ्या एका हिंदी चॅनेलचे संपादक सुरेश चव्हाणके यांच्या शिर्डीतील घरी आणि दिल्लीतील कार्यालयाची रेकी केल्याची कबुली दिली आहे. या दहशतवाद्यांकडून अवैध हत्यारे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी अद्यापपर्यंत सहा मौलवींसह अन्य दोन अशा आठ जणांना अटक करण्यात आली असून त्यांना १० दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
दुबईवरून आलेल्या दहशतवाद्यांनी शिर्डीत रेकी केल्याची कबुली दिली आहे. या दहशतवाद्यांचे पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेशी संबंध आहे. शिर्डी आंतरराष्ट्रीय संवेदनशील देवस्थान असल्याने या आधीही साई मंदिराला धमकीची निनावी पत्र तसेच मेल आले आहेत.