ब्रिजलाल सारडा
देशातील आघाडीच्या बजाज उद्योग समूहाची धुरा तब्बल ५० वर्षे वाहणारे ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचे पुण्यात निधन झाले. अनेक दिवसांपासून ते कर्करोगानं त्रस्त होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते; मात्र उत्तरोत्तर त्यांची प्रकृती खालावत गेली होती. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. दुपारी ही बातमी प्रसिद्ध होताच त्यांच्यांशी निगडित आठवणी जाग्या झाल्या. फिरोदिया, बजाज सारडा, धूत कुटुंबाचे संबंध सलोख्याचे होते. राहुल बजाज यांचा जन्म, सावित्री आणि कमलनयन बजाज या माता-पित्यांच्या पोटी कोलकत्ता येथे १० जून १९३८ रोजी झाला. व्यावसायिक असलेल्या या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय संपन्न होती. राहुल यांचे आजोबा जमनालाल बजाज हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातले स्वातंत्र्यसैनिक होते. राहुल यांच्या आजोबांना महात्मा गांधी आपला पाचवा पुत्र मानत असत. जमनालाल बजाज हे जवाहरलाल नेहरू यांचेही खूप जवळचे मित्र होते. काँग्रेस पक्षाच्या उभारणीत व राष्ट्रीय चळवळीत त्यांचं योगदान महत्त्वाचं होतं. बजाज आणि नेहरू या घराण्याचे गेल्या तीन पिढ्यांचे कौटुंबिक संबंध आहेत. कमलनयन आणि इंदिरा गांधी दोघे काही काळ एकाच विद्यालयात शिकत होते. कमलनयन यांच्या पहिल्या अपत्याचे राहुल हे नाव स्वतः जवाहरलाल नेहरू यांनी सुचवलेलं आहे. राहुल यांचं बालपण अतिशय शिस्तीच्या वातावरणात गेलं. गांधी आणि बजाज कुटुंबातील घरोब्याचे अनेक किस्से आहेत. राहुल बजाज यांचा जन्म झाला, तेव्हा इंदिरा गांधी कमलनयन बजाज यांच्या घरी गेल्या. माझी एक अतिशय मूल्यवान गोष्ट तुम्ही घेतलीत, अशी तक्रार त्यांनी कमलनयन यांच्या पत्नीकडे केली. ही गोष्ट होती – ‘राहुल’ हे नाव. हे नाव पंडित नेहरूंना आवडलेलं होतं आणि इंदिरांनी आपल्या मुलाचं नाव राहुल ठेवावं, असं त्यांना वाटत होतं; पण नेहरूंनी त्यांच्या डोळ्यांसमोरच लहानाच्या मोठ्या झालेल्या कमलनयन बजाज यांच्या मुलाचं नाव राहुल ठेवलं. असं म्हटलं जातं की, इंदिराजींनी राजीव गांधींच्या मुलाचं नाव ‘राहुल’ ठेवण्यामागे हेच कारण होतं. कारण हे नाव त्यांच्या वडिलांच्या आवडीचं होतं.
कमलनयन हे महात्मा गांधींच्या वर्ध्यातील संन्याशी आश्रमात वाढले. कमलनयन यांचे बंधू रामकृष्ण बजाज यांचे शिक्षण वर्धा येथील नवभारत विद्यालयात चालू असतानाच स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्याकरिता त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकला. त्यांनी १९४०-४५ या दरम्यान तीन वेळा कारावास भोगला. त्यांचे थोरले बंधू कमलनयन यांच्या निधनानंतर बजाज उद्योग समूहाची सूत्रं रामकृष्णजींकडे आली. बजाज उद्योगाचा विकास करतानाच त्यांनी बजाज फाऊंडेशनमार्फत जनसेवा चालूच ठेवली. तोच वारसा राहुल यांनी पुढे चालवला. ग्रामीण व दुर्गम आदिवासी भागांत आरोग्य व शिक्षण सुविधा पोहोचण्यावर त्यांनी भर दिला. पुढे हे कार्य राहुल बजाज यांनी चालू ठेवले.
बजाज कुटुंब कायम पुरोगामी विचाराचे. राहुल यांचा विवाह रूपा घोलप या महाराष्ट्रीय तरुणीशी १९६१ साली झाला. रूपा या त्या काळातील सौंदर्यवती व नवोदित मॉडेल होत्या. राहुल बजाज यांनी बजाज उद्योग समूहाचं अध्यक्षपद भूषवलंच, शिवाय राज्यसभेचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केलं. त्यांना २००१ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दरम्यानच्या काळात राहुल यांचे पुत्र राजीव बजाज आणि संजीव बजाज यांनी कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये प्रवेश केला. त्यांची मुलगी सुनयना यांचा विवाह ‘तेमाझेक इंडिया’चे माजी प्रमुख मनीष केजरीवाल यांच्याशी झाला. कधी थांबावं हे ज्याला कळतं, तो यशस्वी. गेल्या वर्षीच राहुल यांनी कंपनीतून अंग काढून घेतलं होतं.
कोरोनामुळे निर्माण झालेल्या कठीण काळात उद्योग जगतानेही मदतीचा हात दिला. कोरोना विरोधातल्या या लढ्यात बजाज उद्योग समूहानेही आपलं योगदान दिलं. कोरोना विरोधातील लढ्यासाठी बजाज उद्योग समूह शंभर कोटी रुपये देत असल्याची घोषणा या उद्योगाचे प्रमुख राहुल यांनी केली होती. त्यातून त्यांची सामाजिक बांधिलकी दिसून आली. सरकार आणि आम्ही काम करत असलेल्या देशातल्या दोनशेहून अधिक स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून हा पैसा जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत पोहोचेल याची काळजी आम्ही घेऊ, असे राहुल यांनी म्हटले होते. राहुल यांनी परमिट राजच्या काळात ‘हमारा बजाज’ची केलेली घोषणा चांगलीच लोकप्रिय झाली होती. बदलत्या जागतिक परिस्थितीतही त्यांनी बजाजला कायम अग्रस्थानी ठेवलं. निर्यातीत बजाजला कायम आघाडीवर ठेवलं. त्याचबरोबर काळाची पावलं ओळखून त्यांनी परदेशी कंपन्यांशी करार करून तिथल्या दुचाकी भारतीय तरुणांना उपलब्ध करून दिल्या.
त्यांचा सेवाभाव कायम लक्षातच राहणारा आहे. कोरोनाच्या काळात पुण्यासह, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही त्यांनी मदत केली. हातावर पोट असणाऱ्या आणि मजुरी करून जगणाऱ्या कामगारांसाठी, बेघर आणि पदपथावर राहणाऱ्या मुलांसाठी अन्न आणि निवाऱ्याची सोय करण्यासाठी काही संस्थांसोबत बजाज कंपनीने काम केलं. ग्रामीण भागातल्या लोकांचं जगणं सुसह्य करण्यासाठी थेट अनुदान, रोजगार संधींसाठी प्रयत्न केले. ग्रामीण भागात आरोग्याच्या पायाभूत सुविधांना बळकट करण्याच्या दृष्टीनं आरोग्य केंद्र आणि इतर आवश्यक सुविधांच्या बळकटीकरणासाठी निधी खर्च करण्याची त्यांची इच्छा होती.
राहुल बजाज यांनी गेल्या वर्षी २९ एप्रिल रोजी बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. वयाचं कारण देत त्यांनी हे पद सोडलं. १९७२ पासून ते या पदावर होते. त्यानंतर राहुल बजाज यांना कंपनीचे अध्यक्ष एमिरेट्स म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. बजाज ऑटोच्या संचालक मंडळावरील नीरज बजाज यांना कंपनीचे नॉन एक्झिक्युटिव्ह अध्यक्ष बनवण्यात आले होते. सीआयआयच्या बंद खोल्यांमध्ये होणाऱ्या बैठकांमध्ये उद्योग जगताच्या अडचणींविषयी काळजी व्यक्त व्हायची. मात्र त्याविषयी खुलेपणाने कोणीही बोलत नव्हतं; परंतु उद्योजकांच्या अडचणीविषयी तसंच सामाजिक प्रश्नांविषयी राहुल बजाज कायम बोलत राहिले. राहुल बजाज रोखठोक बोलत. विविध प्रसंगी त्यांनी सरकारविरोधात प्रश्नही उपस्थित केले होते. तसेच प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या विरोधातही त्यांनी कणखरपणा दाखवला होता. पियाजिओ कंपनीसोबत कराराचं उल्लंघन केल्याचं प्रकरण त्याचं उत्तम उदाहरण. राहुल बजाज यांच्या हाती कंपनीची धुरा आली, तेव्हा देशात लायसन्स राज होतं. म्हणजे देशभरात अशी काही धोरणं-नियम होते, ज्यामुळे सरकारच्या मर्जीशिवाय उद्योगपतींना काहीही करता येत नव्हतं. व्यापाराच्या दृष्टीने ही कठीण परिस्थिती होती. मर्यादित उत्पादन होत होतं. इच्छा असूनही उद्योगपती मागणी पूर्ण करू शकत नव्हते. असं म्हटलं जायचं की, कोणी स्कूटर बुक केली, तर अनेक वर्षांनी डिलिव्हरी मिळायची. म्हणजे ज्या परिस्थितीत इतरांना काम करणंही कठीण जात होतं, त्याच परिस्थितीत बजाज यांनी तथाकथितपणे निरंकुश पद्धतीनं उत्पादन केलं आणि स्वतःच्या कंपनीला देशातल्या सर्वांत मोठ्या कंपन्यांपैकी एक करण्यात यश मिळवलं.
७०-८०च्या काळात राहुल बजाज यांची ओळख युथ आयकॉन अशी बनली होती. त्यांच्या कंपनीची चेतक ही स्कूटर त्या काळात विशेष लोकप्रिय होती. या स्कूटरचं एक लाख उत्पादन करण्याची परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली होती; पण सरकारने त्यांना फक्त ८० हजार स्कूटर तयार करण्याची परवानगी दिली. त्यावरून त्यांची सरकारसोबत खडाजंगी झाली होती. बजाज चेतक (स्कूटर) आणि नंतर बजाज पल्सर (मोटरसायकल) या साऱ्या उत्पादनांमुळे त्यांच्या ब्रँडची बाजारातली विश्वासार्हता वाढल्याचे त्यांनी अनेकदा म्हटले.
राहुल बजाज यांनी आपल्या रोखठोक स्वभावाला कधीही आवर घातला नाही. त्यांनी आपली मतं परखडपणे मांडली. राहुल यांच्या जाण्याने उद्योगविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. उद्योगविश्वासाठी, उद्योग जगतासाठी आवाज उठवणारा उद्योजक काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली ही पोकळी भरून निघणं खरंच खूप अवघड आहे.
(लेखक प्रसिद्ध उद्योजक आहेत.)