Monday, October 27, 2025
Happy Diwali

शिवसेनेच्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष!

शिवसेनेच्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष!

मुंबई : शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत आणि पदाधिकारी आज दुपारी चार वाजता मुंबईतील शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेसाठी स्क्रिन लावण्यात आले असून संजय राऊत काय धमाका करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे सर्व महत्त्वाचे नेते आणि खासदार उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप संजय राऊत गेल्या अनेक महिन्यांपासून करत आहेत. याच पार्श्वभूमीवर राऊत नेमका कोणता गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, आजच्या पत्रकार परिषदेसाठी मोठे शक्तिप्रदर्शन करण्याचीही तयारी शिवसेनेने केलेली दिसते. नाशिकहून शिवसेनेचे कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात मुंबईच्या दिशेने यायला निघाले आहेत. शिवसैनिकांना पत्रकार परिषद बाहेरुनच पहाण्यासाठी शिवसेना भवनाबाहेर मोठा एलईडी स्क्रिन लावण्यात आला आहे.

शिवसेना भवनातील आजच्या पत्रकार परिषदेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे. यासोबतच पत्रकार परिषदेत एक मोठा स्क्रिन लावण्यात आला आहे. त्यामुळे संजय राऊत पत्रकार परिषदेत 'व्हिडिओ बॉम्ब' फोडणार असल्याचे बोलले जात आहे. संजय राऊत आजच्या पत्रकार परिषदेसाठी एक पेन ड्राइव्ह घेऊन येणार असून व्हिडिओच्या माध्यमातून गौप्यस्फोट करण्याची शक्यता आहे. आता राऊत नेमका कोणता व्हिडिओ समोर आणतात हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

भाजपाचे ते 'साडेतीन' लोक कोण?

येत्या काही दिवसात भाजपामधील साडेतीन लोक हे अनिल देशमुख यांच्या कोठडीत असतील आणि देशमुख बाहेर असतील, असे राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे आता भाजपामधील ते साडेतीन लोक कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. शिवसेना भवनातील आजच्या पत्रकार परिषदेत त्यांची नावे सांगणार की नेहमीप्रमाणे तथ्य नसलेले सणसणाटी आरोप करणार याकडेही सर्वांचे लक्ष आहे. तसेच ही सर्व वातावरणनिर्मिती पाहता संजय राऊत नेमका कोणता आणि कोणावर रायकीय बॉम्ब टाकणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा