मुंबई : मुंबई विमानतळावर विमानतळ गुप्तचर विभागाने केलेल्या तपासणीत झिम्बाब्वेच्या एका महिलेकडून ६० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे. या कारवाईत ७,००६ ग्रॅम हेरॉईन आणि १,४८० ग्रॅम एमडी नावाचे ड्रग्ज मिळाले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाचा साठा मिळाल्यानंतर तिला अटक करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, झिम्बाब्वेमधून येणारी महिला ड्रग्ज घेऊन मुंबईत येत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्याची माहिती मिळताच अधिकारी सतर्क झाले. तपासणी दरम्यान महिलेने हे ड्रग्ज तिच्या ट्रॉली बॅगमध्ये आणि फाइल फोल्डरमध्ये लपवून ठेवले होते. त्यात ७,००६ ग्रॅम हेरॉईन आणि मेथॅम्पचे मिश्रण सापडले. याशिवाय त्या महिलेकडून १,४८० ग्रॅम पांढरे क्रिस्टल ग्रॅन्युल देखील जप्त करण्यात आले आहे. या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे ५९ कोटी ४० लाख २० हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रवाशाकडून ड्रग्जची माहिती मिळताच गुप्तचर पथकाला आफ्रिकन प्रवासी मुंबईत येताना दिसले. या दरम्यान अधिकाऱ्यांची नजर एका झिम्बाब्वेच्या महिलेवर पडली. माहिती आणि संशयाच्या आधारे अधिकाऱ्यांनी महिला आणि तिच्या सामानाची तपासणी केली. चौकशीत महिलेने अधिकाऱ्यांना सांगितले की, हे ड्रग्ज दिल्लीला नेले जाणार होते. परदेशातील ड्रग्ज दिल्लीत नेल्यानंतर तिच्यावर मोफत उपचार करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पोलिसांनी सदर महिलेला अटक केली असून अधिक चौकशी सुरू आहे.