मुंबई : मराठा आरक्षणासाठी २६ फेब्रुवारीपासून छत्रपती संभाजीराजे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसणार आहेत. मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीत आरक्षण द्यावे म्हणून संभाजीराजे यांनी राज्यात आंदोलन उभारले आहे; परंतु कोरोना संसर्गामुळे आंदोलनाची पुढील दिशा ठरविली नव्हती, तरीही मराठा आरक्षण व समाजाच्या इतर अनुषंगिक मागण्याबाबत त्यांनी समाजातील सर्व क्षेत्रातील मुख्य घटकांशी विचारविनिमय केला. त्यानंतर मराठा आरक्षणाबाबत सोमवारी मुंबईत आपली पुढील दिशा जाहीर केली.
संभाजीराजे यांना मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा उचलून धरला आहे. यावेळी आक्रमक पवित्रा घेत, मराठा आरक्षणासाठी २६ फेब्रुवारीला मी स्वतः आमरण उपोषणाला मुंबईतील आझाद मैदानात बसणार असल्याचे संभाजीराजे यांनी आज स्पष्ट केले आहे. आज ते मुंबईत बोलत होते. २००७ पासून मी संपुर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. मराठा समाजही वंचित घटक आहे. त्यासाठीच आरक्षणाची भूमिका घेतली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
यावेळी ते म्हणाले, मी मराठा आहे म्हणून मराठा आरक्षणासाठी लढतो आहे असं नाही. ५ मे २०२१ ला आरक्षण रद्द झालं. मागील काही दिवसांत अनेकवेळा आंदोलनं केली. परंतू अजूनही कोणतीच मागणी पूर्ण नाही. मी आत्तापर्यंत आक्रमक होतो परंतू आता मी उद्विग्न झालो असल्याचे वक्तव्य खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केले.
समन्वयक यांनी मला टोकाची भूमिका घेऊ नका, असे सांगितले होते. परंतु सरकार या संदर्भात काहीही हालचाल करताना दिसत नाही. त्यामुळे माझी भूमिका आता मी बदलत आहे. येत्या २६ फेब्रुवारीला मी स्वतः आमरण उपोषणाला मुंबईतील आझाद मैदानात बसणार असल्याचे त्यांनी सांगितले. मी नेहमीच शाहू महाराजांचा वारसा जपला आहे. मी सर्वांना घेऊन जाणारा माणूस आहे. आम्हाला टिकणारे आरक्षण हवे आहे, तशी आम्ही वेळोवेळी मागणीही केली आहे. सर्व पक्षाच्या नेत्यांना आरक्षण कशामुळे गेलं हेही सांगितले आहे. आरक्षण देण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावाही केला आहे. मात्र यावर काहीही तोडगा निघालेला नाही. मी आरक्षण रद्द झाल्यानंतर रिव्ह्यू पिटिशन दखल करा असं सांगितल होतं. परंतू खुप दिवसांनंतर याचिका दाखल केली आहे. सध्या त्याची काय परिस्थिती आहे हे काहीच माहिती नाही. माझं स्पष्ट मत आहे की समिती स्थापन करा. परंतू अजून काहीच केलं नसल्याचे संभाजीराजेंनी सांगितले.
याचबरोबर, सर्व नेत्यांच्या दारी गेलो. मूक आंदोलन कोल्हापुरात केले. परंतू, या आंदोलनाने काहीच झाले नाही. मोजून पाच ते सहा मागण्या आहेत परंतू अजूनही मान्य होत नाहीत. सर्वोच्च न्यायालय म्हणत आहे की ५० टक्क्यांच्यावर आरक्षण द्यायचे असेल तर अपवादात्मक परिस्थीत असायला हवी. अनेकजण म्हणतात की ओबीसीमधून आरक्षण द्यायला पाहिजे, परंतु माझे म्हणणे आहे की टिकणारं आरक्षण द्या, असे संभाजीराजे यांनी सांगितले.
दरम्यान, मराठा आरक्षण व समाजाच्या इतर अनुषंगिक मागण्याबाबत संभाजीराजे यांनी समाजातील सर्व क्षेत्रातील मुख्य घटकांशी विचारविनिमय केला आहे. या चर्चेतून त्यांनी आज आंदोलनासंदर्भात निर्णय घेतला आहे.