मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्याने हिंदुह्रदयसम्राट असा उल्लेख केलेला राज ठाकरे यांचा बॅनर मुंबईत लावल्याने सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
याआधी मनसेने आपला झेंडा बदलल्यानंतर अनेकांनी राज ठाकरेंच्या हिंदुत्ववादी मुद्द्याकडे लक्ष वेधले. राज ठाकरे हिंदुत्वावादाचा मुद्दा घेऊन आता राजकीय वाटचाल करत असल्याचे अनेकांनी म्हटले. त्यातच, शिवसेनेने महाविकास आघाडीत सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेना हिंदुत्त्वापासून दूर गेल्याची टिका सातत्याने भाजपाकडून होत आहे. दुसरीकडे भाजप आणि मनसेत जवळीकता वाढताना दिसून आली. त्यातच, आता महापालिका निवडणुकांपूर्वीच मुंबईत झळकलेला हिंदुह्रदयसम्राट असा उल्लेख केलेला राज ठाकरेंचा बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
राज ठाकरे घाटकोपरमध्ये एका कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर तेथे हा बॅनर लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे राज ठाकरेंचा उल्लेख या बॅनरवर हिंदू ह्रदयसम्राट असा करण्यात आला आहे. यापूर्वी राज यांचा उल्लेख मराठी ह्रदयसम्राट असा केला जात होता. आता, हिंदू ह्रदयसम्राट अशी उपमा राज ठाकरेंना मनसैनिकांनी दिल्याने चांगलीच चर्चा होत आहे. कारण, यापूर्वी महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांनाच हिंदू ह्रदसम्राट असे म्हटले जाते.
हिंदू ह्रदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेची जबाबदारी उद्धव ठाकरेंकडे आली. त्यामुळे, राज ठाकरेंनी स्वतंत्र पक्ष स्थापन करुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. तरीही, बाळासाहेंबाच्या विचारांचे खरे वारसदार हे राज ठाकरेच असल्याचे मनसैनिकांकडून सांगण्यात येते. विशेष म्हणजे राज यांच्या देहबोलीत, भाषणातही ती लकब दिसून येते. त्यामुळेच, मनसैनिकांनी बाळासाहेंबाची उपाधी राज यांना दिल्याचे दिसून येत आहे.