नॉस्टेल्जिया : श्रीनिवास बेलसरे
महिपाल आणि अफगाणी अभिनेत्री शकीला यांच्या ‘अल हिलाल’(१९५८) या सिनेमातील इस्माईल आझाद यांनी गायलेल्या कव्वालीने रसिकांना वेड लावले. गीतकार होते शेवन रिझवी आणि संगीत बुलो रानींचे!
अमीर खुसरोंच्या रचनांनी १३व्या शतकात कव्वालीची सुरुवात झाली. त्यात दोन प्रकार असत. एक म्हणजे देवाची स्तुती आणि दुसरा प्रकार – अनावर भावनेचे प्रेमगीत! त्यात प्रेमयाचना, प्रेमातील चढउतार, विरह, प्रेयसीने केलेल्या प्रतारणेच्या तक्रारी, असे अनेक विषय येत.
औद्योगिकीकरण आणि त्यातून जगाचे फक्त बाजारपेठेत झालेले रूपांतर यामुळे मानवी भावविश्वातून सर्व निरागस, उत्कट, अमूर्त भावनांचे उच्चाटन होत गेले. त्याचा प्रभाव कलाविश्वावरही पडला. त्याचाच एक बळी होती कव्वाली! कारण हा मैफलीत गाण्याचा प्रकार! त्यासाठी एक सुस्थिर जग, शांतनिवांत आयुष्य आणि ते ‘तबियतने’ जगणारे रसिक आवश्यक असतात! मिनिटाला ४ वेळा मोबाइल चेक करणारी पिढी कव्वालीची मजा कितपत घेऊ शकेल?
कव्वालीत अगदी छोटीशी कल्पनाही खुलवली जायची. शेवन रिझवी यांनी त्यांच्या खेळकर मूडमधील कव्वालीत तेच केले होते. सुंदर युवती तरुणांना कशा छळतात, हा सर्वच युवकांच्या जिव्हाळ्याचा विषय! रिझवींनी या छळाचे अनेक पदर उलगडून दाखवले –
“हमें तो लूट लिया, मिलके हुस्नवालोंने
काले-काले बालोंने, गोरे-गोरे गालोंने…”
‘तिच्या’ नुसत्या दर्शनाने आपण कसे प्रेमात ओढले गेलो ते सांगताना शायर म्हणतात –
‘नज़रमें शोख़ियाँ और बचपना शरारत में,
अदाएं देखके हम फंस गए मोहब्बत में’
तिचा नखरेलपणा आणि तिच्या खोड्यांतील बालिशपणा पाहून आम्ही फसलो, असे ते म्हणतात. त्यांची दुसरी तक्रार आहे –
हम अपनी जानसे जाएंगे जिनकी उल्फ़तमें
यकीन हैं कि ना आएंगे वोही मैय्यतमें…
म्हणजे तिच्या प्रेमाराधनेत आमचा जीव गेला तरी ती आमच्या प्रेतयात्रेलासुद्धा येणार नाही! तिचा हा निष्ठुरपणा माहीत असून कवी म्हणतो, तिचे दर्शनच इतके घायाळ करणारे आहे की, ती जाईल तिथे कहरच होतो –
वहीं-वहींपे क़यामत हो, वो जिधर जाएं,
झुकी-झुकी हुई नज़रोंसे, काम कर जाएं,
तड़पता छोड़ दें रस्तेमें और गुज़र जाएं,
सितम तो ये है कि दिल ले लें, और मुकर जाएं,
हमे तो…
आपल्या झुकलेल्या सलज्ज नेत्रांनी ती घायाळ करते, हृदय चोरून अलगद निघून जाते. वर साळसूदपणे गुन्हा अमान्यच करते! त्यामुळे कुणाही सुंदरींच्या बोलण्यावर विश्वास ठेवणे म्हणजे स्वत:ला धोक्यात ढकलणे होय –
हज़ार लुट गए नज़रोंके इक इशारे पर,
हज़ारों बह गए तूफ़ान बनके धारे पर,
न इनके वादोंका कुछ ठीक हैं न बातों का…
असा इशारा देऊन कव्वाल अगदी टोकाला पोहोचतात. प्रेयसीला रागात जवळजवळ नागिणीचीच उपमा देऊन टाकतात –
‘बहुत हसीं हैं, वैसे तो भोलापन इनका,
भरा हुआ है मगर, ज़हरसे बदन इनका,
ये जिसको काट लें, पानी वो पी नहीं सकता,
दवा तो क्या है? दुआसेभी जी नहीं सकता’
या प्रेमाच्या खेळात आम्ही तर संपलोच, पण जाता जाता आमच्या पदरात काय पडले? प्रेमाचे फक्त ४ शब्द!
इन्हींके मारे हुए हम भी हैं ज़माने में
हैं चार लफ़्ज़ मोहब्बतके इस फ़साने में..
हमें तो…
जग या सुंदरींना फार निरागस समजते, पण तसे नाही. यांना एखाद्याला ठार करायला तलवार लागत नाही की, धनुष्यबाण! यांनी नुसते प्रेमाने पाहिले तरी एखाद्याचे हृदय बरबाद करून टाकतात.
ज़माना इनको समझता हैं नेकवर मासूम
मगर ये कैसे हैं, क्या हैं, किसीको क्या मालूम
इन्हें न तीर, न तलवारकी, ज़रूरत हैं
शिकार करनेको काफ़ी निगाहें उल्फ़त हैं
यांच्या घेऱ्यात शहाण्या माणसाने कधी येऊ नये, शायर म्हणतो – देवच मला यांच्यापासून वाचवो!
‘ख़ुदा बचाए हसीनोंकी तेज़ चालोंसे,
पड़े किसीका भी पाला ना हुस्नवालोंसे.
सौंदर्यवतींत खऱ्या प्रेमाची कमतरताच असते. उलट यांच्या चाहत्यांचे नशीब मात्र फार वाईट, हेच खरे!
हुस्नवालोंमें मोहब्बतकी कमी होती हैं
चाहनेवालोंकी तक़दीर बुरी होती हैं!
कवी म्हणतो – यांच्या बोलण्यात केवढा खोटेपणा असावा? डोळ्यांत लज्जा दिसते आणि नजरेत मात्र चक्क प्रेमाचे धीट आवाहन! काय समजायचे माणसाने?
इनकी बातोंमें बनावटही
बनावट देखी
शर्म आँखोंमें, निगाहोंमें
लगावट देखी
जवळीक दाखवून ऐनवेळी या अनोळखी बनून जातात. खरे सांगायचे तर चक्क बेईमानच नसतात का? अशी परित्यक्त प्रियकराची फिर्याद असते –
दोस्ती करके फिर अंजान नज़र आते हैं
सच तो ये हैं कि बेईमान नज़र आते हैं
यांच्यामुळे कितीजण जीवनाला मुकले, त्याची मोजदाद नाही, अनेकांची आयुष्ये बरबाद झाली –
मौतसे कम नहीं दुनियामें मुहब्बत इनकी,
ज़िंदगी होती बरबाद बदौलत इनकी,
दिन बहारोंके गुज़रते हैं मगर मर-मरके,
लुट गए हम तो हसीनोंपे भरोसा करके.
हमें तो…
ज्या काळी दुतर्फा प्रेम ही दुर्मीळ गोष्ट होती तो काळ! त्यातले केवळ कल्पनेने रंगवलेले हे प्रेमाचे मनोहारी चित्र! हेच तर जुन्या गाण्यांचे वैशिष्ट्य! आणि म्हणून तर हा नॉस्टॅल्जिया!