कथा : डॉ. विजया वाड
सिमी तशी दिसायला बरी होती. पण नजरेत भरावं, असं काही त्या रूपात नव्हतं. सिमंतिनी लग्नाची झाली तेव्हा तिच्या आईला, पुष्पीला काळजी लागली आणि आपली बहीण मंदा हिच्याकडे ती सिमीसह दाखल झाली.
“हिचं बघ तू आता.” सिमीची आई, पुष्पी मंदाला म्हणाली.
“विंचू आहे नं! लगेच जमवते.” विंचू म्हणजे विंदा चुके. विंचू या नावाने तो आजूबाजूला ओळखला जायचा. तशी जीभ तिखट होती, पण खटका उडाला तरच खटाखट चालायची. एरवी गपचिप असायचा विंदा ऊर्फ विंचू.
सिमी मंदामावशीकडे रमली. ‘विंचू’वर दोघी लक्ष ठेवून होत्या. सिमीसोबत चिवडा-लाडू पाठवून; पोहे, चिवडा चवीला दाखवून झाला. पण विंचूकडून कोरडे औपचारिक थँक्स यापलीकडे काही आले नाही. तेही अंतर राखून. काकूंना थँक्स. काकूंचे आभार आणि काकूंना बदल्यात श्रीखंड वड्या. त्यांना भारी आवडायच्या ना! काकूंना कळतच नव्हते की, पुढे कसे जावे ते!
पावसाळा आला, मावशी म्हणाली, ‘माझा धीर सुटत चालला गं. पावसाच्या सरी, घरी आल्या छपरीखाली… पण मुंडावळ्यांचं जमेना काही… काय करू सिमीबाई?’ यावर सिमी फक्त हसली. मावशीला कळेना, सिमीच्या मनात काय आहे?
मंदामावशी सिमीला शनीच्या पारावर आलेल्या गणरायाच्या तसबीरचे दर्शन घ्यायला घेऊन गेली. शनीचा पार मंदीनं एवढ्यासाठी निवडला होता की, विंचू तिथे दर आठवड्यात दर्शनाला यायचा. सिमीने पावसाळी दिवस निवडला होता. जाणीवपूर्वक बिनछत्रीची आली होती.
पावसाळी हवा! सरी आल्या हो! नाचून गेल्या. विंचू छत्री घेऊन आला होता. वेळ नेमकी निवडलेली! शिष्टाचार म्हणून विचारले,
“छत्री नाही?”
“नाई नं! नेमकी अवखळ पोरीसारखी सर आली. गुच्छ रंगांचे, सरींवर सरींचे, श्रावणमेघांचे निळ्या गर्दीचे… रंगीत वर्दीचे… अवखळ प्रेमाचे…
“अरे वा!”
“रविवार सकाळमध्ये आलेली कविता. मी करते, ते छापतात. चित्र काढून.”
“अरे वा!”
“उद्योन्मुख कवयित्रींना स्थान देतात रविवार पुरवण्या.”
“अरे वा!” विंचू म्हणाला. त्यावर बोलण्यासारखे काही नव्हतेच! “छान झालीय कविता” ती खूश झाली त्याचे. बोलणे ऐकून आणि त्यावर म्हणाली, “सरीवर सरी कोसळत असता. पावसात भिजता भिजता… चला तुडवू रस्ता, राहून नवी ओली संधी आता?” आणि चालू लागली की सीमी! विंचू नाइलाज होऊन तिच्या मागे आला.
घरी येईपर्यंत ओलेती पार सीमी! “घरी कशी जाऊ? जीव होतो भिऊ?
मला सांगा, तुमच्यात येऊ? की जाऊ?” येऊ की जाऊ? या दुविधेत विंचू
असताना शिरलीच खोलीत! मंदामावशी नेमकी गणपती दर्शनाला गेली होती. ठरवून प्लॅन करून?
“विंचू सॉरी हं! मंदामावशी नाही घरी…”
“अगं बस तू घरी. नथिंग टु फील सॉरी.”
सीमी आपलेच घर असल्यासारखी ऐसपैस बसली. ओलेती. आव्हानात्मक. एवढ्यात सीमी कुडकुडू लागली. खरेच कुडकुडू लागली.
“भिजलीस! तुला सहन झाले नाही.”
“मला थंडी वाजत्येय.”
“पांघरुण देऊ?”
“द्या.” पण ओठांचा चंबू करून म्हणाली.
“तुमचं द्या. तेवढीच ऊब!” विंचूला गुदगुल्या झाल्या. त्याने आपले पांघरुण अंथरायला दिले. पांघरले. तिच्यावर! “थँक्यू विंचू.”
“अगं त्यात कसलं थँक्यू?”
“तुझं अंथरुण दिलंस…, पांघरुण दिलंस; जणू मिठीत घेतलंस…”
विंचू लाजलाच त्या उघड बोलांनी. पुण्यातल्या पोरी ऐकत नाहीत. तो मनाशीच म्हणाला.
“विंचू, ओलेती मी तुला आवडले?”
“खूप.”
“मग घे ना जवळ.” सीमी अगदी जवळ सरकली. अगदी जवळ. कचकन् मिठीतच शिरली. विंचूला भान राहिले नाही.
आणि तेवढ्यात सिमीची मावशी घरी टपकली.
“विंचू, काय हे?”
“सॉरी मावशी.”
“दरवाजा उघडा. भान बाळगा…”
“सॉरी मावशी.”
“अरे सॉरी सॉरी काय? उपवर मुलगी!”
मावशीने कात्रीतच पकडले.
“दोघे लग्न करा.” मंदामावशी तेवढ्यात मुद्द्याचं बोलली.
अशी सोयरिक जुळली नि लग्न झालेसुद्धा.
लग्नासाठी काय लागते? उपवर मुलगा नि उपवधू मुलगी! बस्…!