गुलदस्ता : मृणालिनी कुलकर्णी
२७ जानेवारी या दिवशी, लेखक, कृतिशील सामाजिक कार्यकर्ते आणि अनेक कलागुण अंगी असलेले डॉ. अनिल अवचट यांचे निधन झाले. मुक्तागंणसह सर्वांशी बाबा या नात्याने अनिल अवचट परिचित होते. गर्दच्या विळख्यात अडकलेला युवक या विषयावर अवचट यांचे अभ्यासपूर्ण लेखन वाचून पु. ल. देशपांडे यांनी देणगी द्यायचं ठरवलं. या व्यसनात अडकलेल्या मुलांसाठी काही तरी करायला पाहिजे, काही करता येईल का? या विचारातून, डॉ. सुनंदाच्या कल्पनेतून, प्रेरणेतून, तिच्याच प्रयत्नांतून पु. ल. देशपांडे यांच्या आर्थिक मदतीमुळे आणि त्यांनीच सुचविलेल्या नावानी “मुक्तांगण” हे व्यसनमुक्ती समुपदेशन, पुनर्वसन केंद्र’ पुणे येथे उभे राहिले.
मुक्तांगण केंद्रात आई, बाबा, ताई, काका या परिवाराच्या नात्याने साऱ्या रुग्णांना जोडत, भारतीय संस्कृतीवर आधारित घरगुती एकत्र कुटुंबाप्रमाणे सारे एकत्र राहतात. डॉ. सुनंदा यांनी कधीही आपला आवाज न चढवता सर्व पेशंटशी प्रेमाने, हसत-खेळत, संवाद साधत, या संस्थेत काय असावे हे त्यांच्याकडून काढून घेत. त्यांचे छंद, आवडी, मागणी लक्षात ठेवून पालकत्वाच्या नात्याने त्यांना देत असत. त्या म्हणतात, ‘जगणं काय असतं ते येथे समजलं.’ अनिल आणि सुनंदा अवचट या दोघांनी, कोणाचीही साथ नसलेल्या व्यसनींना, भरकटलेल्या मार्गातून व्यसनमुक्त करून नव्याने आयुष्य जगात यावे यासाठी आपली पूर्ण हयात वेचली. ही देशातील सर्वोत्तम व्यसनमुक्ती संस्था असून १०,००० ते १२,०००च्या वर व्यसनमुक्त आपल्या कुटुंबात आनंदानं जगत आहेत. व्यसनमुक्त राहिलेल्या कार्यकर्त्यांची मोठी फळी आज मुक्तांगणमध्ये कार्यरत आहे. आजचे नवे प्रश्न अवचटांची मुलगी मुक्ता सक्षमपणे हाताळीत आहे. नव्या प्रश्नात व्यसनी महिलांची संख्या वाढल्याने महिलांसाठी स्वतंत्र विभाग उघडला. डॉ. आनंद नाडकर्णी मुक्तांगणचे अध्यक्ष आहेत.
व्यसन ही एक सवय आहे. तो एक मानसिक आजार आहे. दारू, सिगारेट, गुटखा, तंबाखू अशा नशा देणाऱ्या मादक अमली पदार्थांच्या सेवनांनी मानवी शरीराच्या मज्जासंस्थेवर परिणाम होऊन येणाऱ्या ग्लानीत, आलेला ताण, नैराश्य कमी होते; परंतु नशा उतरताच पुन्हा त्याची पावले, हात त्याकडे वळतात. नशिल्या पदार्थांचे वारंवार सेवन करण्याची सवय तेच व्यसन!
पौगंडावस्थेतील विद्यार्थी-तरुण युवक मित्राच्या दबाबामुळे, आग्रहाखातर, प्रतिष्ठेच्या चुकीच्या कल्पनेमुळे, तारुण्यातील एक स्टाइल, थ्रिल, मौजमजा, जोश, जगावेगळं काही तरी करायचा अाविर्भाव, स्वतःविषयी जादा अभिमान, यातून पहिला घोट, झुरका, चव घेतात. नंतर काही जण त्याशिवाय राहू शकत नाहीत. मग ते मिळावे म्हणून काहीही करतात. हळूहळू सर्वांपासून दूर जात आयुष्याची एक एक पायरी खाली उतरली जाते. मोठ्यांचे पाहून शालेय विद्यार्थ्यांचा खिशात, दप्तरात गुटख्याची पाकिटे सापडतात.
व्यसनाला सुरुवात होण्याची कारणे. १) उत्सुकता, कुतूहल. २) अभ्यासातले मार्क्स, पालकांच्या अपेक्षा व तुलना. नोकरी, छोकरी, करिअर, व्यवसाय यातील अपयश. ४) घरात आपले मत विचारले जात नाही, आपल्याला कोणी किंमत देत नाही म्हणून चिडचिड, राग सुरू होतो. ५) जागा लहान, कुटुंब मोठे; जागा मोठी एकलेपणा घालविण्यासाठी : थोडक्यात ही मुले घराबाहेर पडतात तेथे कोण भेटतो त्या संगतीवर दिशा ठरते.गडकऱ्यांचे एकच प्याला नाटक.
प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर कोणतेही व्यसन सुटू शकते. डॉ. अच्युत गोडबोले यांनी एका विशिष्ट क्षणी, माझी काय ओळख पाठी राहावी हा विचार करून १० मिनिटांत सर्व व्यसनं सोडली. ड्रिंक्स किंवा अन्य काहीही घेणे चांगले की वाईट किंवा योग्य की अयोग्य यात न जाता कोणतेही सेवन स्वतःच्या करिअरच्या, प्रगतीच्या, कुटुंबाच्या सौख्याच्या आड येऊ नये आणि प्रत्येकाने स्वतःच्या शरीरावर होणाऱ्या परिणामांचा विचार करावा.
व्यसनमुक्त होण्यासाठी सर्वात प्रथम पराभूत मानसिकता झुगारून देणे गरजेचे आहे. तरुणाच्या भारतात, युवकांना जगण्याची इच्छा आहे. तो व्यसनापासून दूर राहू इच्छितो. मित्रानो! प्रथमतः स्वतःचे अंतिम ध्येय विसरू नका. संयम ठेवा. विशिष्ट काळ आपला नसतो. अपयशाशी झगडून उभे राहिलेल्या अनेकांची चरित्रे वाचा. याच वेळी पालकांच्या प्रोत्साहनाची, संवादाची, प्रयत्नांची घरात साथ हवी. हेही दिवस जातील हा आशावाद सांगावा. आजही पालक अभ्यासाव्यतिरिक्त युवकांच्या अंगी असलेल्या कला, छंदाकडे लक्ष देत नाहीत. कुठल्याही व्यसनापेक्षा, मुलाला त्याच्या छंदाची, मनात जे करायचे त्याची नशा त्याला चढू दे. जरा त्याना स्पेस द्या, त्यांना बोलू द्या.
युवकांनो, नैराश्य घालविण्यासाठी साहित्य वाचा, योगा करा, नवे मित्र जोडा, राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत समाजकार्यात, राणी बंग यांच्या शिबिरात भाग घ्या. निसर्ग तुम्हाला बोलवत आहे. स्वतःचे इंग्रजीचे, संगणकाचे, परदेशी भाषांचे ज्ञान वाढवा. लक्षात ठेवा दोस्तांनो! प्रत्येक गोष्टीला दोन-तीन पर्याय असतातच, नव्हे ठेवावेत. कधी क्लिक होईल हे तुम्हालाच समजणार नाही.
मुक्तांगणच्या उद्घाटनप्रसंगी पु. ल. देशपांडे म्हणाले होते, या संस्थेची भरभराट होवो असे न म्हणता ही संस्था बंद पडो असे म्हणीन; परंतु व्यसनाधीनतेचा प्रश्न वाढल्याने व्यसनमुक्ती केंद्राची संख्याही वाढत आहे. नुकतेच सुधा मूर्ती यांनी केलेल्या अर्थसाह्यातून पंजाबमध्ये मुक्तांगणसारखे केंद्र उघडले गेले. त्यासाठीच मला वाटते, तरुणांसाठी ओपन जीम, सर्वांसाठी मैदाने, योगा, छंद, कलाकौशल्याचे वर्ग, स्कीलशी निगडित संकुल शिक्षण केंद्र उभी राहावीत.
विशिष्ट ड्रेसचा आग्रह नसावा. अल्प प्रमाणात साधनसामग्रीही पुरवावीत. मोकळेपणाने विद्यार्थी तरुणांना खेळू द्या, चित्र काढू द्या, जिम करू द्या, वाचू द्या, शिकू द्या. वर्ग घ्यायला सेवाव्रती, निवृत्त नागरिक पुढे येतील. ऑस्ट्रलियात केर्नसमध्ये सर्वांसाठी खुला जलतरण तलाव पहिला होता. संकुलासाठी होणारा खर्च हा सुदृढ-सशक्त तरुणांसाठी राष्ट्राची उभारणी ठरेल. हे एक व्यसनमुक्तीसाठी उचललेले पाऊल.
[email protected]