Thursday, October 3, 2024
Homeसाप्ताहिककोलाजचन्नी, मान, अमरिंदर की बादल?

चन्नी, मान, अमरिंदर की बादल?

स्टेटलाइन : सुकृत खांडेकर

पंजाबमधील विधानसभा निवडणुकीकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे. गेली पाच वर्षे पंजाबात काँग्रेसची सत्ता आहे. कॅप्टन अमरिंदरसिंग यांना हटवून काँग्रेसने चरणजित चन्नी यांच्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली तसेच काँग्रेसने सुनील जाखड यांना हटवून प्रदेशाध्यक्षपदावर नवज्योत सिंग सिद्धू यांची नेमणूक केली. काँग्रेस हायकमांडने केलेले हे दोन्ही मोठे बदल पक्षाला विजय मिळवून देतील काय? पंजाबमध्ये गेली तीस वर्षे अकाली दल-भाजप युती होती. पण केंद्राने केलेल्या कृषी कायद्यानंतर अकाली दलाने भाजपशी काडीमोड घेतला. यंदाच्या निवडणुकीत अकाली दल व भाजप एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. पंजाबची सत्ता जिंकायचीच, अशा जिद्दीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष मैदानात उतरला आहे. त्यांनी भगवत मान यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषित केले आहे. काँग्रेस, अकाली दल, भाजप व आप अशा चौरंगी लढतील पंजाबची सत्ता कोणाला मिळणार? हा लाखमोलाचा प्रश्न बनला आहे.

पंजाबमध्ये ११७ जागांसाठी २० फेब्रुवारीला मतदान होणार असून १० मार्चला मतमोजणी होणार आहे. काँग्रेसला आपली सत्ता टिकविण्यासाठी झगडावे लागते आहे. भाजप आपली मतांची टक्केवारी जागा वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. अकाली दल राज्यात विस्तार व्हावा म्हणून रिंगणात आहे, तर आम आदमी पक्षाला चंदिगडच्या चाव्या काबीज करायच्या आहेत.

पंजाबमधील कडाक्याची थंडी वसंत पंचमीनंतर थोडीशी कमी होऊ लागली आहे. तरीही असलेल्या गारठ्यात निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे. मुख्यमंत्रीपदासाठी सर्व पक्षांनी मोठा जुगार खेळला असला तरी पाच वर्षं सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाला आपली सत्ता टिकविण्यासाठी अटापिटा करावा लागतो आहे. अकाली दल आपल्या केडरवरच्या आधारावर अधिकाधिक आमदार निवडून यावेत म्हणून प्रयत्न करीत आहे. भाजप नव्या कार्यकर्त्यांना जोडून मतांची टक्केवारी कशी वाढेल यासाठी झटत आहे. पाच वर्षांपूर्वी माझा प्रदेशात चांगले यश मिळवणारा आम आदमी पक्ष या वेळी दोआबातही प्रवेश करताना दिसतो आहे. शेतकरी संघटनांनी आपले उमेदवार स्वतंत्रपणे उभे केले आहेत. तीन-चार ठिकाणी पंचरंगी सामना होईल, असे चित्र आहे.

यापूर्वी कधीही झाले नाही, असे चौरंगी सामन्यात मतविभाजन बघायला मिळेल, असे राजकीय निरीक्षकांना वाटते. राज्यात चार मोठ्या पक्षांत रणधुमाळी चालू असली तरी पंजाबच्या प्रश्नांवर व विकासाच्या मुद्द्यांवर या निवडणुकीत चर्चा ऐकायला मिळत नाही. बदलता पंजाब किंवा नवा पंजाब कसा असावा?, हे कोणी सांगत नाही. निवडणूक जाहीरनाम्यात कोणाला फारसा रस नाही. २०१७मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे सर्वाधिक ७७ आमदार निवडून आले होते. आम आदमी पक्षाचे २०, अकाली दलाचे १५, भाजपचे ३ आणि लोक इन्साफ पक्षाचे २ आमदार विजयी झाले होते.

नवी दिल्ली-अमृतसर राष्ट्रीय महामार्गावर राजस्थानकडील अबोहर ते लुधियानापर्यंत सतलज नदीच्या बाजूला पसरलेल्या प्रदेशाला मालवा म्हटले जाते. विधानसभेच्या ११७ पैकी ६९ जागा या प्रदेशात येतात. मालवा म्हणजे राज्याच्या सत्तेची चावी कोणाकडे द्यावयाची हे ठरवणारा प्रदेश आहे. आम आदमी पक्षाने येथे बऱ्यापैकी बस्तान बसविले आहे. जनतेला आता बदल पाहिजे आहे, असे संकेत येथून मिळत आहेत. गेल्या सत्तर वर्षांपासून सत्ता उपभोगणारे काँग्रेस व अकाली दलासारखे पक्ष बाजूला पडतील व नवा पर्याय पुढे येईल, असे वातावरण आहे. मालवामधील चाळीस जागांवर आप, काँग्रेस व अकाली दल अशी चुरशीची टक्कर आहे. मालवामध्ये भाजप कमजोर आहे. अकाली दलाशी युती असूनही भाजपचा केवळ एक आमदार निवडून आला होता.

माझा हा काँग्रेसचा गड मानला जातो. २०१७च्या निवडणुकीत माझामधून काँग्रेसने २५ पैकी २२ जागा जिंकल्या होत्या. मात्र या वेळी काँग्रेसला तसे यश सोपे नाही. उलट तरणतारण वगळता अमृतसर, पठाणकोट, गुरदासपूर या जिह्यातील २१ पैकी पाच-सहा जागा भाजप मिळवू शकेल, असे चित्र आहे. अमृतसर पूर्व मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिद्धू व अकाली दलाचे विक्रमसिंह मजिठिया अशा दोन दिग्गजांमध्ये जबरदस्त लढत होत आहे. मजिठा विधानसभा मतदारसंघातून विक्रम मजिठियांची पत्नी गुनीव कौर मैदानात उतरल्या आहेत. गृहिणी असलेल्या गुनीव आता नेता झाल्या आहेत, त्यांना आव्हान देणारा विरोधक दिसत नाही.
दोआबा हा पंजाबमधील एनआयआर बेल्ट ओळखला जातो. विदेशात राहणाऱ्या पंजाबींचा प्रभाव या दोआबात दिसून येतो. या वेळी अनिवासी भारतीयांकडून पक्ष निधी उभारण्यासाठी आम आदमी पक्षाने कोणतीही मोहीम राबवली नाही किंवा कोणताही कार्यक्रम घेतला नाही. मात्र अनिवासी भारतीय असलेल्या पंजाबी लोकांचा ओढा आजही आम आदमी पक्षाकडे अधिक असल्याचे दिसते. विदेशात राहणारे पंजाबी ज्येष्ठ नागरिक हे आपल्या कुटुंबीयांना ‘आप’ला मतदान करा, असे सांगतात. २०१७मध्ये दोआबातील २३ जागांपैकी १५ जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. भाजपला केवळ १, तर अकाली दलाला ५ जागा मिळाल्या होत्या. या वेळी दोआबातून भाजपच्या जागा वाढतील व काँग्रेसच्या कमी होतील, असे अंदाज व्यक्त केले जात आहेत. अकाली दलाला २०१७ प्रमाणेच यंदाही ५-६ जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसने दोआबातून काही विद्यमान आमदारांची तिकिटे कापली, त्यामुळे पक्षाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकरी आंदोलनाचा परिणाम गढशंकर, चब्बेवाल अशा तीन-चार जागांवर होईल.

मुख्यमंत्री चरणजित चन्नी हे चमकौर साहिबमधून लढत आहेत, त्यांची स्थिती भक्कम दिसते. मात्र दुसऱ्या मतदारसंघात म्हणजे भूदौडमध्ये त्यांना आपने मोठे आव्हान दिले आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग परंपरागत पतियाळा शहर मतदारसंघात अडकून पडले आहेत. सुखबीरसिंग बादल हे जलालबादमधून, तर प्रकाशसिंग बादल हे परंपरागत लांबी मतदारसंघातून निवडणूक लढतीत आहेत. आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान धुरीमधून, नवज्योत सिंग सिद्धू अमृतसर पूर्वमधून, किसान संघटनेचे बलवीर सिंह राजेवाल समराला मतदारसंघातून रिंगणात आहेत. ऐंशी वर्षांचे कॅप्टन अमरिंदर यांनी वेगळा पक्ष स्थापन केला आहे व भाजपबरोबर समझोता केला आहे. ते काँग्रेसची मते कापण्याचे काम करणार हे चन्नी व सिद्धूपुढे आव्हान आहे. शिवाय तिकीट न मिळाल्यामुळे काँग्रेस बंडखोरही मैदानात उतरले आहेत. चरणजित चन्नी हे भगवंत मान यांच्यावर मात करू शकतील का?, या मुद्द्यावर फार मोठा जुगार खेळला जातो आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -