स्वयंसिद्धा : प्रियानी पाटील
त्या ठरावीक दिवसांत महिलांच्या वेदना या कुणालाही सांगण्याच्या पलीकडच्या असतात. पालघरच्या यती राऊत यांनी महिला जागृतीचे कार्य हाती घेत, रूढी-परंपरा आणि अनेक समस्यांवर भाष्य करत प्रबोधनाच्या माध्यमातून याच वेदनांचे कंगोरे उलगडले आहेत.
महिलांची मासिक पाळी आणि त्यामागच्या रूढी-परंपरा, महिलांना होणारा त्रास, वेदना यावर आजही तितकसं उघडपणे बोललं जात नाही. सहन करणे हा शब्द महिलांनी अगदी आत्मसात करून घेतला आहे. आजही अनेक ठिकाणी घराघरांत पाळणूक केली जाते. घरातील कोणत्याही वस्तूंना हात लावू दिला जात नाही. ग्रामीण भागात तर या गोष्टी कसोशीने पाळल्या जातात. यामध्ये स्त्रीला आराम मिळावा हा उद्देश असला तरी लादण्यात येणाऱ्या बंधनात स्त्रीची घुसमट होताना दिसून येत आहे. यामुळे कधी कधी अपमानास्पद वागणूकही मिळून जाते. काही वेळा प्रथा, परंपरांपुढे तिचं काही चालत नाही! पण आरोग्याचं काय? आरोग्याच्या दृष्टीने तरी आजच्या स्त्रीने सतर्क राहिलं पाहिजे. परंपरागत रूढींना छेद दिला पाहिजे. समाजात अनेक बदल होत आहेत. वैचारिक प्रबोधनांच्या माध्यमातून याबाबतचे दृष्टिकोन आज बदलू पाहत आहेत. अनेक संस्था पुढे येत आहेत. अनेक महिला आपली नवी पिढी घडवण्यासाठी जबाबदारी पार पाडत आहेत. त्यातीलच एक आहेत, पालघरच्या यती राऊत ज्या महिलांच्या आरोग्याच्या विचार करता २०१७ पासून त्या सॅनिटरी नॅपकिनच्या व्यवसायात आहेत. महिलांची मासिक पाळी आणि त्या आनुषंगाने ज्या काही रूढी – परंपरा आहेत, ज्या समस्या आहेत त्यावर प्रबोधन करण्याचं काम यती करत आहेत. तसेच महिलांच्या आरोग्यविषयक ज्या समस्या आहेत त्यावरही बोलून महिलांना जागरूक करण्याचे कार्य त्या करत आहेत.
गेली ३ वर्षे याबाबतचे दोन ते अडीच हजार कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये बारा ते तेरा जिल्ह्यांत केले असल्याचे यती सांगतात. पालघर जिल्हा, ठाणे, मुंबई, पुणे, नाशिक, धुळे, जळगाव, रायगड, सांगली, सातारा, सोलापूर आदी ठिकाणी त्या कार्यरत आहेत. पुण्याला सॅनिटरी नॅपकिनची फॅक्टरी आहे. याठिकाणी महिला कामगार काम करतात. त्यांच्या हातालाही रोजगार मिळाला आहे.
बचत गटाच्या महिलांना सॅनिटरी नॅपकिनच्या विक्रीचे काम दिले जाते. विदाऊट केमिकल नॅपकिनची निर्मिती हा उद्देश ठेवून हे नॅपकिन बनवले जात असल्याचे यती राऊत यांनी सांगितले. मॅजिक जेल (केमिकल) आणि प्लास्टिकमिश्र नॅपकिनमुळे महिलांना अनेक प्रॉब्लेम उद्भवतात. गर्भाशयाचा कॅन्सर, गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर, सर्जिकल कॅन्सर, पीसीओडी या साऱ्यांची सुरुवात येथूनच होते. यासाठी विदाऊट केमिकलयुक्त आिण महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने सोयीस्कर असे नॅपकिन बनविले जात असल्याचे त्या म्हणाल्या.
सर्जिकल कॅन्सरमुळे आपली एक बहीण गमावली असून तिला श्रद्धांजली म्हणूनच समाजात आपण महिलांच्या हिताचे कार्य करत असल्याचे यती यांनी सांगितले.
ग्रामीण भागात आजही सॅनिटरी नॅपकिनचा वापर सर्रास टाळला जातो. जवळपास १६ ते १७ टक्केच नॅपकिनचा वापर केला जातो. अारोग्याला परंपरागत गोष्टी किती हितकारक आहेत, याचा विचार करून, स्वच्छतेला प्राधान्य देऊन महिलांनी जंतुसंसर्ग टाळण्यासाठी योग्य गोष्टीच आत्मसात केल्या पाहिजेत. घरात मुली असतील, तर त्यांच्याशी उघडपणे बोलून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. कारण काळ खूप पुढे सरकला आहे. मुली शाळा, कॉलेज, नोकरीच्या निमित्ताने जेव्हा बाहेर असतात, तेव्हा त्यांना कोणती गोष्ट योग्य, कोणती अयोग्य हे आई किंवा घरातील मोठी बहीण यांनी समजावून सांगणे गरजेचे आहे. यासाठी खासकरून शाळांमध्ये जाऊन स्वत: यती आिण त्यांची टीम प्रबोधनाचे कार्य करतात.
पूर्वी मासिक पाळीच्या काळात महिलांना घरात कीचनमध्ये इंट्री नसायची. तसेच कोणत्याही वस्तूला हात लावू न देणे, देवपूजा न करणे, आदी अनेक बंधनं प्रत्येकाच्या रीतीरिवाजाप्रमाणे घातली गेली होती. आज याचे प्रमाण काही अंशी कमी झाले असले तरी काही ठिकाणी तसेच असल्याचेही दिसून येते. मात्र तिच्या नशिबी खरंच आराम असतो का? तिला या दिवसांत भांडी, कपडे धुणे यांसारखी कामं तर करावीच लागतात. या काळात तिला होणाऱ्या वेदना सहन करत, ती रीतीरिवाजाचं पालन करत तोंडातून चकारही काढत नाही. या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी प्रबोधनाच्या माध्यमातून यती राऊत निश्चितच समाजकार्याचा वसा जोपासत आहेत.
विशेषत: शाळांमध्ये वावरणाऱ्या मुलींना मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने त्यांनी अनेक ठिकाणी शाळांमध्येही सॅनिटरी नॅपकिनचे महत्त्व पटवून देऊन, मासिक पाळी दरम्यान मुली कोणती काळजी घ्यावी, आरोग्य कसे जपावे, स्वच्छतेला प्राधान्य देणे, आदी गोष्टी सांगितल्या आहेत. त्याला प्रतिसादही चांगला मिळाल्याचे यती सांगतात.
घरात आईने किंवा कर्त्या महिलेने मुलींना त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल विचारणा केली पाहिजे. मुलगी, सून असेल तर तिला या काळात होणाऱ्या वेदनांवर उपाय करून दिले पाहिजेत. अनेकदा मुलींना या काळात चार-पाच दिवस त्रासामुळे शाळेत जाणे मुश्कील होऊन जाते. यासाठी घरगुती उपचार म्हणून गरम पाणी पिणे, ओवा, आळशी, गूळ आदी गोष्टी घरातच असतात, पण त्याचा वापर मात्र केला जात नाही, असे यती सांगतात. शाळांमध्ये याबाबतचे प्रबोधन केले जात असल्याचे यती सांगतात.
समाजात प्रबोधन करण्याच्या दृष्टीने, महिलांची मासिक पाळी या विषयावर उघडपणे बोलणे जरी जड असले तरी यती राऊत यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. केमिकलविरहित वापरले जाणारे नॅपकीन स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक असतात. अजूनही लोणचं, पापड, मसाल्यास हात लावू न देणे, यापेक्षा तिला या काळात तिला लोणचं, पापड खाऊ न देणे उत्तम असते. ओवा, आळशी, बाळशेपा, गूळ यांसारखे घरगुती पदार्थ या काळात खाल्याने त्या स्त्रीला हाेणारा त्रास बहुतांशी कमी होतो, असे यती राऊत सांगतात.
सामाजिक रूढी-परंपरांच्या विळख्यात स्त्री अडकली असली, तरी आरोग्याच्या बाबतीत तिने सतर्क असणे आवश्यक आहे. काय योग्य, काय अयोग्य याचा विचार करून आजच्या स्त्रीने स्वत:ला घडवता घडवता घरातील महिला, मुलींनाही त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल, उपायांबद्दलची जाणीव करून दिली पाहिजे.
यती राऊत यांनी अवलंबलेले कार्य समाजातील मुली, महिलांसाठी नव्या विचारांची प्रेरणा देणारे आहे, हे निश्चित.