मुंबई : केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्राद्वारे यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली होती, असा आरोप नवाब मलिकांनी केला होता. मात्र समीर वानखेडे यांना राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने मोठा दिलासा दिला आहे. शुक्रवारी एका खटल्याची सुनावणी करताना आयोगाने वानखेडे यांच्या तक्रारीनुसार मलिकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. तसेच समीर वानखेडे उपलब्ध कागदपत्रांनुसार अनुसूचित जातीचे आहेत, असे म्हटले आहे.
याआधी महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे हे मुस्लिम आहेत, ते महार समाजाचे नाहीत. बनावट जात प्रमाणपत्राद्वारे त्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली होती, असा आरोप केला होता.
त्यानंतर आता समीर वानखेडे यांच्या तक्रारीवरून राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने समीर वानखेडे यांच्या तक्रारीवरून आयोगाने मुंबई पोलिसांना गुन्हा नोंदवण्यास सांगितले आहे. आयपीसी आणि एससी-एसटी कायद्याच्या कलम १८६, २११, ४९९, ५०३, ५०८ अंतर्गत गुन्हा नोंदविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यापूर्वी समीर वानखेडे यांच्या तक्रारीवरून आयोगाने गृह मंत्रालयाचे सचिव, महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांना नोटिसा पाठवल्या होत्या, पण त्यापैकी कोणीही आयोगासमोर हजर झाले नाही.