पुरोगामित्व, महिला स्वातंत्र्य, स्त्री-पुरुष समानता, धर्मनिरपेक्षता आणि अंधश्रद्धा निर्मूलन यांसारख्या इतर अनेक चळवळींचे माहेरघर असलेल्या तसेच अन्य राज्यांसह देशाला योग्य दिशा दाखविणाऱ्या आपल्या महाराष्ट्राला काही दुर्दैवी घटनांमुळे मान खाली घालावी लागत आहे. तसेच स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आणि संत-महात्मे, समाजसुधारक यांनी वेळोवेळी कीर्तन, मेळावे, सामाजिक चळवळी आदींच्या माध्यमांतून समाजातील घातक परंपरा, वृत्ती-प्रवृत्ती यांच्यावर आघात करीत सुदृढ समाज घडविण्यासाठी आपले आयुष्य वेचले, त्या सर्वांचे परिश्रम फळाला आले आहेत, असे वाटत असताना अचानक एखादे अमानवी कृत्य घडते आणि अवघा महाराष्ट्र हादरून जातो. राज्याच्या चांगल्या प्रतिमेला बाधा पोहोचते, मानवतेला कलंक लावणाऱ्या अशा घटना जर वारंवार घडू लागल्या, तर समाजातच काही तरी मोठा दोष निर्माण झालाय की काय, असे वाटून मनात एक भीती दाटून येते. समाजविघातक घटना या वारंवार का घडतात याचा विचार केला, तर एक गोष्ट ध्यानात येते की, गुन्हेगारांना किंवा गुन्हा करू इच्छिणाऱ्यांना कायद्याचा, पोलीस प्रशासनाचा किंवा एकूणच समाजजीवनाचाही धाक उरलेला नाही, असे दिसते. त्यामुळेच गुन्हेगार कोणत्याही थराला जाऊन घात लावून गुन्हा घडवितो. हे करताना त्यांना कशाचीच भीती व तमा उरलेली नाही, अशा वृत्तीने ते वागतात. संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारे जळीतकांड प्रकरण हिंगणघाट येथे दोन वर्षांपूर्वी घडले होते व त्याचा निकाल नुकताच लागला असून एकतर्फी प्रेमातून घडलेल्या या प्रकरणातील आरोपीला हिंगणघाट जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच आरोपीला पाच हजारांचा दंडही भरावा लागणार आहे. पीडिता ही हिंगणघाटपासून १५ किलोमीटर अंतरावरील दरोडा येथील आशा कुणावार महिला महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची प्राध्यापक म्हणून कार्यरत होती. या तरुणीला आरोपी विकेश नगराळे याने पेट्राले टाकून जिवंत जाळले होते. पीडिता ३ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी घरातून बसने हिंगणघाटला पोहोचली. नंदोरी चौकातून कॉलेजच्या दिशेने ती जात असताना आरोपी हा दबा धरून बसला होता. प्राध्यापिका दिसताच विकेशने दुचाकीतून काढलेले पेट्रोल तिच्यावर ओतले आणि पेटवून दिले. गंभीररीत्या भाजलेल्या पीडितेने आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेरचा श्वास घेतला.
या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात आला. या प्रकरणात महिला तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांनी कार्यालयीन कामकाजाच्या १९ दिवसांमध्ये दोषारोपपत्र पूर्ण केले. शिवाय २८ फेब्रुवारीला या प्रकरणातील आरोपी विक्की ऊर्फ विकेश नगराळे याच्याविरुद्ध तब्बल ४२६ पानांचे दोषारोपपत्र हिंगणघाटच्या प्रथमश्रेणी न्यायालयात दाखल केले. फास्ट ट्रॅक कोर्ट असल्यामुळे या प्रकरणी निकाल लवकर लागेल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र घटनेला दोन वर्षे पूर्ण झाली तरी नराधम आरोपीला शिक्षा झालेली नसल्याने संताप व्यक्त होत होता. जलदगती न्यायालयाकडे सोपविलेल्या या प्रकरणात शासनाने प्रख्यात कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली होती. या प्रकरणात २९ साक्षीदार तपासण्यात आले. त्यानंतर या प्रकरणाच्या खटल्यात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपल्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयाने खुनाचा गुन्हा सिद्ध केल्यानंतर आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच आरोपीने भोगलेल्या दोन वर्षांच्या कालावधीला शिक्षेतून सूट मिळणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायालयाने आरोपी विक्की नगराळेला शिक्षा सुनावल्यानंतर पीडितेला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत असली तरी न्यायालयाच्या निकालाने समाधानी नसल्याचे मत पीडितेच्या आई-वडिलांनी व्यक्त केले आहे. मात्र पीडितेचा स्मृतिदिनाच्याच दिवशी आरोपीला शिक्षा ठोठावल्यामुळे पीडितेच्या आई-वडिलांच्या भावना अनावर झाल्या होत्या. एका तरुण शिक्षिकेला भर रस्त्यावर अशा पद्धतीने जिवंत जाळले गेल्यामुळे हिंगणघाट आणि ग्रामीण भागातील वातावरण मोठ्या प्रमाणावर बदलल्याचे मतही अनेक शिक्षिका आणि विद्यार्थिनींनी व्यक्त केले आहे. जळीत हत्याकांडाच्या त्या दुर्दैवी घटनेनंतर महिला आणि मुलींच्या बाबतीत भीतीपोटी घरा-घरांतून अनेक बंधने लादली गेली आहेत. एकटे-दुकटे बाहेर जाण्यापासून तसेच रात्री उशिरा जास्त वेळ बाहेर राहण्याबद्दल, कुठल्या कार्यक्रमांना जाण्याबाबत, नाट्य- चित्रपटांचे उशिराचे खेळ पाहण्यावरही निर्बंध आले असल्याचे तेथील पाहणीतून आढळले आहे. याचाच अर्थ या भयाण घटनेने समाजमन घाबरून गेलेले आजही दिसत आहे. त्यामुळे देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याचा एक प्रकारे अधिक्षेपच होत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
ज्या महाविद्यालयाच्या शिक्षिकेसोबत ही दुर्दैवी घटना घडली होती त्या मातोश्री आशाताई कुणावार महिला महाविद्यालयजवळ पोलीस चौकीची मागणी ही दोन वर्षांनंतरही पूर्ण झालेली नाही. घटनेनंतर काही दिवस पोलिसांची गस्त सुरू राहिली. मात्र त्यानंतर पोलीसही निष्क्रिय झाले. आजवर पोलीस चौकीची मागणी प्रलंबित असल्याने परिसरातील शाळेत, महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनींना रोडरोमियो, टवाळखोरांच्या त्रासाला अजूनही सामोरे जावे लागत असल्याचे मत अनेक विद्यार्थिनी आजही व्यक्त करीत आहेत, हे ढिम्म पोलीस प्रशासनाचे द्योतक आहे. प्राध्यापिकेला जिवंत जाळण्यात आल्याच्या घटनेनंतर समाजमन संतप्त होऊन रस्त्यावर उतरले होते. अनेक ठिकाणी मोर्चे, आंदोलन करून या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला होता. तसेच या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी झाली होती. या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता, तर याच प्रकरणानंतर राज्यात ‘शक्ती कायदा’ आणण्यात येणार असल्याचे सांगितले होते. या हिवाळी अधिवेशनातच हा महत्त्वाचा कायदा विधिमंडळात मंजूर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अशा कायद्यांची ठोसपणे अंमलबजावणी व्हायला हवी आणि कायद्याबरोबरच पोलीस प्रशासनाचाही धाक समाजजीवनावर असायला हवा.