पुणे : पुण्यातील जम्बो कोविड सेंटरच्या उभारणीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यावरून उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री यांनी आज या संदर्भात आपली भूमिका मांडताना सोमय्यांचे आरोप फेटाळून लावले.
अजित पवार यांनी आज पुणे जिल्ह्यातील करोना स्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत कोविड सेंटरच्या अनुषंगानं होत असलेल्या आरोपांवरही चर्चा झाली. अजित पवार यांनी अधिकाऱ्यांकडून संपूर्ण माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांकडे भूमिका मांडली. जम्बो कोविड सेंटरच्या उभारणीत कुठलाही गैरव्यवहार झालेला नाही. सगळी कामे पारदर्शक पद्धतीनं झाली आहेत,’ असं अजित पवार यांनी सांगितलं.
“पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, राजेश पाटील आणि जिल्हाधिकारी अशा सर्व अधिकाऱ्यांचा कोविड सेंटरच्या कामामध्ये समावेश होता. या अधिकाऱ्यांना अतिशय पारदर्शकपणे हे काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आजच्या बैठकीत पहिल्यांदा त्यावरच चर्चा करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी हे काम कसे केले आहे याची माहिती देण्यात आली आहे. कोविड सेंटरच्या बाबतीत काहीही चुकीचे होऊ दिलेले नाही,” असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.