Monday, February 17, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखपोलीस भरती घोटाळा राज्याला लांच्छनास्पद

पोलीस भरती घोटाळा राज्याला लांच्छनास्पद

काय दुर्दैवं आहे बघा, सध्या महाराष्ट्रात ठराविक दिवसांच्या अंतराने विविध घोटाळे उघड होत आहेत आणि सामान्य माणूस या घोटाळ्यांची व्याप्ती आणि त्याने व्यापलेली निरनिराळी क्षेत्रे पाहून चक्रावून गेला असेल हे निश्चित. कारण ज्यांनी प्रामाणिकपणे विविध परीक्षा देऊन नोकरीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत त्यांचा मात्र पुरता हिरमोड झाला असेल. गेल्या काही दिवसांत म्हाडा भरती घोटाळा, आरोग्य भरती घोटाळा आणि सर्वात मोठा म्हणावा असा शिक्षक भरती घोटाळा. या शिक्षक भरती घोटाळ्यात आतापर्यंत ३०० बनावट प्रमाणपत्र जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणात आतापर्यंत ७ हजार ९०० जणांना पात्र केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बोगस शिक्षकांना आता जेलची हवा खावी लागणार हे नक्की झाले आहे. या बोगस शिक्षकांची यादी पत्त्यांसह तयार करण्यात आली आहे. ही यादी पडताळणीसाठी शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आली आहे. अपात्र उमेदवारांच्या मूळ गुणांमध्ये वाढ करुन पास करण्यात आल्याचा हा धक्कादायक प्रकार आहे.

या घोटाळ्याचा तपास सुरू असतानाच आता उघड झालेला मुंबई पोलिस दलामधील भरती घोटाळाही सर्वांचीच मती गुंगवून टाकणारा आहे. मुंबई पोलिस दलामधील १,०७६ शिपाई पदांसाठी १४ नोव्हेंबर २०२१ रोजी वेगवेगळ्या केंद्रांवर लेखी परीक्षा पार पडली. या परीक्षेला एक लाखांपेक्षा अधिक उमेदवार बसले होते. लेखी परीक्षा, मैदानी चाचणी तसेच अर्जावरील फोटो आणि प्रत्यक्षात हजर असलेला उमेदवार यामध्ये साम्य आहे का, हे तपासताना आठ उमेदवारांसाठी आठ डमी उमेदवारांनी परीक्षा दिल्याचे आतापर्यंत समोर आले आहे. मुंबई पोलिसांकडून करण्यात आलेल्या चित्रीकरणामुळे एकापाठोपाठ एक डमी उमेदवार सापडत गेले आणि हा एक मोठा घाटाळा झाल्याचे उघड झाले. यामध्ये औरंगाबाद आणि आसपासच्या जिल्ह्यांचे कनेक्शन समोर येत असून, पोलिस भरतीचे धडे देणाऱ्या खासगी क्लासेसचा यात सहभाग असल्याचे आढळले आहे. औरंगाबाद येथील एका शिक्षकाने तीन उमेदवारांची मैदानी चाचणी दिली आहे. यासाठी त्याने या तीन उमेदवारांकडून प्रत्येकी तीन लाख रुपये घेतले असल्याने आता पोलिस या शिक्षकाचा शोध घेत आहेत. अन्यही जिल्ह्यांमध्ये या प्रकरणाची व्याप्ती पसरली असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मुंबई पोलिस दलामधील शिपाई पदांसाठी वेगवेगळ्या केंद्रांवर लेखी परीक्षा पार पडली. या परीक्षेला एक लाखांपेक्षा अधिक उमेदवार बसले होते. कोणताही गोंधळ किंवा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रत्येक परीक्षेदरम्यान चित्रीकरण करण्यात आले होते. पाच जानेवारीला निवड झालेल्या अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी आणि कागदपत्रांची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. लेखी परीक्षा, मैदानी चाचणी तसेच अर्जावरील फोटो आणि प्रत्यक्षात हजर असलेला उमेदवार यामध्ये साम्य आहे का, हे तपासताना आतापर्यंत किमान आठ उमेदवारांसाठी डमी उमेदवारांनी परीक्षा दिल्याचे दिसत आहे.

औरंगाबाद येथील एका क्लासमध्ये मैदानी चाचणीबाबत मार्गदर्शन करणा-या शिक्षकाने तीन उमेदवारांसाठी मैदानी चाचणी दिली आहे. पोलिसांनी मूळ उमेदवारांना अटक केली असून त्याचा शोध सुरू आहे. केवळ मैदानी चाचण्यांसाठी शिक्षकाला प्रत्येकी तीन लाख रुपये दिल्याचे या उमेदवारांनी सांगितले. लेखी परीक्षा, त्यानंतर मैदानी चाचणीमध्ये उत्तीर्ण होऊन निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी आणि कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. राज्यातील विविध भागांतून निवड झालेले ४२ उमेदवार अद्याप पडताळणीसाठी गैरहजर आहेत. हे सर्व संशयाच्या भोवऱ्यात आहेत. भरती प्रक्रियेचे गेल्या अनेक वर्षांपासून चित्रीकरण करण्यात येते. सीसीटीव्ही कॅमेरा किंवा इतर कॅमेऱ्यातून सरसकट सर्व प्रक्रिया चित्रित होते. मात्र, यंदा प्रथमच सर्वांचे चेहरे कॅमेऱ्यात टिपण्यात आले. वैद्यकीय चाचणी आणि कागदपत्रे पडताळणीदरम्यान छातीवरील बॅच क्रमांकानुसार उमेदवाराचा चेहरा जुळविण्यात आला आणि ते करत असताना एकामागोमाग एक असे डमी उमेदवार सापडू लागले. नागपूर व पिंपरी-चिंचवड येथील पोलिस भरतीत बनावट परीक्षार्थींना बसवणाऱ्या रॅकेटचा उलगडा झाला असतानाच आता आणखी एका ‘मुन्नाभाई’ स्टाईल कॉपी करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. राज्य राखीव पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेत एका उमेदवाराने आपल्या जागी डमी उमेदवार बसवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. जामखेड येथील कॅम्पसाठी झालेल्या भरतीसाठी वाळूज पोलीस ठाणे हद्दीतील अंबेलोहळच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा झाली होती. या परीक्षेत एकाने डमी उमेदवारांकडून लेखी पेपर सोडवून घेतला. हा प्रकार भरती प्रकियेदरम्यानची व्हिडिओ शूटिंग बघितल्यानंतर उघड झाला. फसवणुकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी उमेदवाराला ताब्यात घेतल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

असाच प्रकार नागपूर पोलिस दलाच्या भरतीतही आढळला असून मूळ उमेदवारांऐवजी अन्य युवकांनी परीक्षा दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ‘डमी कॅन्डिडेट’ची ही कीड शहर पोलिस दलापुरतीच मर्यादित नाही तर ती राज्य राखीव पोलिस दलाच्या परीक्षेलाही लागल्याचे दिसत आहे. गेल्या महिन्यात नागपुरात झालेल्या एसआरपीएफच्या परीक्षेतही असाच प्रकार उघड झाला आहे. त्यामुळे राज्यातील विविध भरती प्रक्रियेतसुद्धा असेच प्रकार घडले असावेत, असा संशय पोलिसांना आला आहे. राज्यभरातील विविध भरती प्रक्रियेचे ‘स्कॅनिंग’ सद्ध्या सुरू आहे. एकामागोमाग एक असे हे घोटाळे उघड होऊ लागल्याने सामान्यजनांचा सरकारी भरती परीक्षा आणि प्रक्रियेवरचाच विश्वास उडून जाईल अशी एकंदर परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. तसे होऊ नये म्हणून सरकारने आणि तपासयंत्रणांनी या घोटाळ्यांचा तपास जरूर पूर्ण करावाच आणि तो करताना त्याच्या मुळाशी जाऊन घोटाळेबाज सूत्रधारांचा पर्दाफाश करून त्यांना जबर शिक्षा कशी होईल हे पहायला हवे. तसेच असे घोटाळे यापुढे होणार नाहीत याची पुरेपूर दक्षता घेतल्यास समाजाला लागलेली मोठी कीड नष्ट होईल, हे नक्की.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -