पुणे : काही दिवसांपूर्वीच भाजप नेते किरीट सोमय्या पुणे महानगरपालिकेत आल्यानंतर शिवसैनिकांकडून धक्काबुक्की झाली होती. यावेळी ते खाली पडल्याने त्यांच्या हाताला जखम झाली होती. त्यानंतर आज भाजपकडून त्यांचा त्याच ठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे. त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आज सकाळपासूनच पुणे महानगरपालिका परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवला आहे. तर काँग्रेसने यावेळी महानगरपालिकेच्या आवारात पक्षाचा कार्यक्रम घेणे योग्य नसल्याचे म्हणत त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला विरोध केला आहे.
किरीट सोमय्या यांनी पुण्यात दाखल होताच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. तसेच पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावर देखील सोमय्या यांनी गंभीर आरोप केले. वाधवान प्रकरणातून ते सुटले मात्र आपल्याला जीवे मारण्याच्या प्रयत्नातील आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्यानंतर ते आता सुटणार नाहीत, असे म्हणत त्यांनी पुणे महानगरपालिकेत एवढे गुंड कसे घुसले, पोलीस आयुक्तांना ते दिसत नाहीत का? त्यांना अटक का झाली नाही? असे सवाल गुप्ता यांना उद्देशून केले.