
मुंबई : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राजभवनात नव्या दरबार हॉलचे उद्घाटन झाले. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. माझ्या आईने मला खूप करुणा दिली त्यामुळे मला कोरोनाची भीती नाही, असे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी त्यांच्या भाषणावेळी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोजक्याच शब्दात आपले बोलणे आटोपले. त्यांनी या नव्या वास्तूमध्ये आनंददायी घटना घडतील अशी अपेक्षा व्यक्त केली. तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवनाच्या परिसराचे वैशिष्ठ्य सांगताना म्हटले की, मलबार हिल तिन्ही बाजूंनी समुद्र आहे. अनेक वर्षांपासून बाण गंगा देखील येथे वास करते. सिद्धिविनायक आणि मुंबा देवीची यावर कृपा आहे. मी अडीच वर्षांपासून इथे आहे आणि राजभवन केवळ राजकीय वस्तू नाही तर ते लोकांसाठी असावे. विशेष करून कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विचार केला, असेही ते म्हणाले.
कोरोनानंतर ५-६ महिन्यांनंतर माझ्याकडे लोकांनी येऊन काही अधिकाऱ्यांचे कौतुक केलं आणि त्यांचा गौरव करण्यास सांगितलं. जवळ जवळ ५००० लोकांचा मी गौरव केला, असेही त्यांनी सांगितले.