
नवी दिल्ली : देशात प्रांत आणि धर्माच्या नावाखाली देश तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे समान नागरी कायदा ही काळाची गरज बनल्याचे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी म्हटले आहे. कर्नाटकातून निर्माण झालेल्या हिजाब वादाच्या पार्श्वभूमीवर सिंह यांच्या वक्तव्याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्यास सूट देण्याची मागणी म्हणजे, देश तोडण्याचा प्रयत्न आहे. यासंदर्भात ट्विटरवर संदेश जारी करताना गिरीराज म्हणाले की, काही विशिष्ट वर्गातील लोक देशाचा कायदा ठरवू लागले आहेत. प्रांत आणि धर्माच्या नावाखाली देशाला तोडण्याचा प्रयत्न सुरुय. हे सगळं संपवायचं असेल, तर देशात समान नागरी कायदा आवश्यक असल्याचे सिंह यांनी सांगितलं. यापूर्वीही गिरीराज सिंह यांनी अनेकवेळा समान नागरी कायद्याची मागणी केली आहे.