Saturday, July 13, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यपर्यावरण प्रदूषण आणि प्लास्टिकचा पुनर्वापर

पर्यावरण प्रदूषण आणि प्लास्टिकचा पुनर्वापर

वृषाली आठल्ये, मुंबई ग्राहक पंचायत

सकाळी कचरावाल्याने नेहमीप्रमाणे घराची बेल वाजवली. मी आणि मायाने एकाच वेळी दरवाजा उघडला. मायाने प्लास्टिकचा कचरा असलेली भली मोठी पिशवी बाहेर ठेवली. मी मायाला विचारलं, ‘उद्या आपल्या सोसायटीत कंपनीची गाडी प्लास्टिक घेऊन जायला येत आहे ना? मग तू आजच हे कचऱ्यात का टाकत आहेस?’

त्यावर माया मला म्हणाली की, प्लास्टिकच्या रिसायकलिंगचं काही खरं नाही. कालच मी सोशल मीडियावर कुठेतरी लेख वाचला. त्यात म्हटलं होतं की, प्लास्टिकचे १०० टक्के विघटन अशक्य आहे आणि विशेष म्हणजे प्लास्टिक बाटली बनविणाऱ्या त्या परदेशी शीतपेय उत्पादक कंपनीनेही तो दावा तत्त्वतः मान्य केला आहे. आता तूच सांग, काय उपयोग हा प्लास्टिकचा कचरा त्या कंपनीला द्यायचा?

तिचं म्हणणं मला थोडं विचित्र वाटलं. कारण ती जे सांगत होती ते मला मिळालेल्या माहितीच्या अगदी विरुद्ध होतं. त्यावर थोडासा अभ्यास केल्यावर समजले की, परदेशातील काही बाटलीबंद पाणी विकणाऱ्या कंपन्यांनी त्यांच्या प्लास्टिकच्या बाटल्या १०० टक्के पुनर्वापर करण्यायोग्य असल्याचा दावा केला होता. मात्र समस्या अशी आहे की, काही बाटल्यांची झाकणं आणि सर्व प्लास्टिक लेबले-पॉलीप्रॉपिलीन-बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा सामान्यतः पुनर्वापर करता येत नाही, असे तेथील तज्ज्ञांचे मत आहे.

या बाटल्या पॉलिथिलीन टेरेफ्थालेटपासून बनवल्या जातात, ज्याला मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकच्या ‘सर्वात पुनर्वापर करण्यायोग्य’ प्रकारांपैकी एक मानले जाते; परंतु बहुतेक वेळा त्यांचा प्रवास कचरा भूमीवर किंवा कचरा जाळायच्या भट्टीत संपतो. वस्तुस्थिती अशी आहे की, प्लास्टिकचा पुनर्वापर करणे महाग आहे आणि पाश्चात्य देशांतील अनेक पुनर्वापर सुविधांकडे ते करण्यासाठी संसाधने नाहीत. प्लास्टिक वितळण्याआधी, गोळा करणे आवश्यक असते. नंतर त्यांची प्रतवारी किंवा गटवारी करणे आवश्यक असते. या सगळ्यांसाठी स्थानिक पालिकेचा पैसा खर्च होतो. तसेच रिसायकलिंग प्रक्रियेदरम्यान प्रदूषण होण्याचा धोका तर कायमचाच असतो.

असेही आढळून आले की, अमेरिकन नागरिक पूर्वीपेक्षा जास्त बाटलीबंद पाणी पीत आहेत. अमेरिकन लोकांनी २०१० मध्ये जवळपास ९ अब्ज गॅलनच्या तुलनेत २०२० मध्ये १५ अब्ज गॅलन बाटलीबंद पाण्याचा वापर केला. २०१५ पासून बाटलीबंद पाण्याच्या वार्षिक विक्रीने कार्बोनेटेड शीतपेयांसह इतर कोणत्याही पॅकेज केलेल्या पेयांच्या विक्रीला मागे टाकले आहे.

आपल्या भारतातील बाटलीबंद पाणी विकणाऱ्या एका प्रख्यात कंपनीने असा दावा केला आहे की, त्यांच्या बाटल्यांच्या प्लास्टिकचा १०० टक्के पुनर्वापर केला जातो. या कंपनीचे म्हणणे असे आहे की, वापरलेले प्लास्टिक हा कचरा नाही, तर ही एक संधी आहे. पेट्रोलियम डेरिव्हेटिव्हजमधून शोधले गेलेले प्लास्टिक हे एक अनोखे उत्पादन आहे. पुनर्नवीनीकरण केलेल्या प्लास्टिकचे पॉलिस्टरमध्ये रूपांतर केले जाऊ शकते. त्यापासून पादत्राणे, टी-शर्ट, पिशव्या, खुर्ची इत्यादी तयार करता येतात. यामुळे नैसर्गिक संसाधनांवरील ताण कमी होतो. प्लास्टिकची एकमेव समस्या म्हणजे त्याची विल्हेवाट लावताना बेजबाबदार मानवी हाताळणी. भारतात ६० टक्के प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर केला जातो आणि तो १०० टक्के करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असा दावाही या कंपनीने केला आहे.

प्लास्टिक पुनर्वापर प्रक्रिया म्हणजे प्लास्टिकवर प्रक्रिया करून पूर्णपणे नवीन वस्तू बनविणे. त्यात प्लास्टिक साफ करणे, त्याचे फ्लेक्समध्ये तुकडे करणे आणि नंतर ते इष्ट वापरासाठी मोल्डिंगसाठी उच्च तापमानात वितळणे इ. प्रक्रिया येतात.

कंपनीच्या म्हणण्यानुसार ते सध्या ‘बॉटल फॉर चेंज’ हा कार्यक्रम मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार, पनवेल, दिल्ली, नोएडा आणि चेन्नई येथे राबवत आहेत. आधी म्हटल्याप्रमाणे गोळा केलेल्या प्लास्टिकचे बारीक तुकडे करून त्याचा वापर अखाद्य उत्पादने उदा. कापडी फॅब्रिक, हँडबॅग, खिडक्यांवरील पट्ट्या आणि इतर उत्पादने तयार करण्यासाठी केला जातो.

या कार्यक्रमाद्वारे नागरिकांना प्लास्टिक वापरल्यानंतर स्वच्छ करणे आणि वेगळे साठवणे याविषयी माहिती आणि प्रशिक्षण दिले जाते. यात विविध गृहनिर्माण संस्था, कॉर्पोरेट, शाळा/कॉलेज, हॉटेल, रेस्टॉरंट या जनजागृतीमध्ये सहभागी होतात.

कंपनीच्या हाऊसकीपिंगमधील एक व्यक्ती एका विशिष्ट दिवशी विलग केलेले प्लास्टिक गोळा करते आणि ‘बॉटल फॉर चेंज’ कार्यक्रमांतर्गत नोंदणीकृत कबाडीवाला किंवा कलेक्शन पार्टनरला देते. कबाडीवाला त्यांना सर्व प्लास्टिकसाठी बाजारभावानुसार पैसे देतो. नंतर कबाडीवाला हे गोळा केलेले प्लास्टिक एरिया एग्रीगेटरला विकतो. त्यानंतर त्यावर प्रक्रिया केली जाते.

मी सांगितलेली ही माहिती मायाला पटल्यामुळे तिने आज्ञाधारकपणे ती पिशवी परत घरात नेऊन ठेवली. वाचकहो, तुम्हाला या लेखाद्वारे आवाहन की, प्लास्टिकचा कचरा वेगळा गोळा करून ठेवा. त्याचप्रमाणे आपल्या परिसरातील अशी एखादी संस्था शोधा जी आपल्या घरातून जमा झालेले प्लास्टिक घेऊन जाईल. यामुळे केवळ आपले घर, परिसर, देशच नाही, तर संपूर्ण जग स्वच्छ आणि सुंदर राहण्यास मदत होईल. लक्षात असू द्या, Cleanliness is next to Godliness.

mgpshikshan@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -