अमरावती : शहरातील राजापेठ उड्डाणपुलाच्या भुयारी मार्गात सांडपाणी साचत असल्याच्या माहितीवरून पाहणीसाठी आलेले महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर तीन महिलांनी अचानक धाव घेत शाई फेकली. कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या वाहनांचा टायर फोडण्याचा प्रयत्न केला आणि पेचकचने त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न देखील केला. बुधवारी दुपारी १ च्या सुमारास घडलेल्या या घटनेप्रकरणी आयुक्तांच्या तक्रारीवरून पोलिसांनी १० जणांविरुद्ध गुन्हे नोंदविले. याप्रकरणी आता आमदार रवी राणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजापेठ उड्डाणपुलावर विनापरवानगी स्थापित केलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटविल्याची पार्श्वभूमी या घटनेमागे असल्याचे बोलले जात आहे. ‘आम्ही समस्त शिवप्रेमी’ आणि युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी १२ जानेवारी रोजी राजापेठ उड्डाणपुलावर शिवरायांचा पुतळा बसविला होता. महापालिकेने १६ जानेवारीच्या मध्यरात्री हा पुतळा हटवून ताब्यात घेतला. तेव्हापासून आमदार रवि राणा विरुद्ध प्रशासन असा वाद पेटला आहे. ही बाब आ. रवि राणा यांच्या जिव्हारी लागल्याने त्यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, भाजप गटनेते तुषार भारतीय आदींना लक्ष्य केले. याप्रकरणी आयुक्तांवर झालेल्या शाईफेकीच्या हल्ल्यानंतर आता रवि राणांविरुद्ध कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजकीय सूडबुद्धीने मला अडकविण्याचा प्रयत्न – रवी राणा
याबाबत आमदार रवी राणा यांनी जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी दिल्लीत होतो. मीही माध्यमातून या बातम्या वाचल्या आणि पाहिल्या आहेत. या शाईफेक प्रकरणाचं मी समर्थन करणार नाही परंतु शिवप्रेमींच्या भावना दुखावल्यामुळे त्यांनी आयुक्तांच्या अंगावर शाईफेक केल्याचे राणा यांनी म्हटले. तसेच, मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पालकमंत्री यांच्यावरील दबावामुळेच आपल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मला काही पोलिस व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले. राणेंप्रमाणेच राजकीय सूडबुद्धीने मला अडकविण्याचा प्रयत्न होत असल्याचेही आमदार राणा यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे एका सुईचादेखील कुठे पुरावा मिळत नाही, पण ३०७ चा खोटा गुन्हा दाखल केल्याचे राणा यांनी म्हटले आहे.
दरम्यान, लोकसभेत मंगळवारी खासदार नवनीत राणा यांनीही हाच मुद्दा मांडला. शिवरायांचा पुतळा बसविण्यासाठी उद्धव ठाकरे सरकार परवानगी देत नाही, असा आरोप केला. दुसरीकडे हा पुतळा १९ फेब्रुवारी रोजी त्याच जागेवर पुन्हा बसविणार, असा निर्णय आमदार रवि राणा यांनी घेतला होता. त्यासाठी आयुक्त डॉ. आष्टीकर यांना निवेदनाद्वारे पुतळा बसविण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी युवा स्वाभिमान संघटनेने केली होती. यादरम्यान बुधवारी आयुक्तांवर शाई फेकल्याचे प्रकरण घडले.