कर्नाटकात शिक्षण क्षेत्रात विशेषतः शाळा-महाविद्यालयात हिजाब विरुद्ध भगवा अशा संघर्षाने वातावरण ढवळून निघाले आहे. राज्यात भाजपचे सरकार आहे. राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना या धार्मिक वादाची मोठी डोकेदुखी झाली असून राज्यातील शाळा-महाविद्यालये तीन दिवस बंद ठेवण्याची पाळी या सरकारवर आली आहे. मुस्लीम विद्यार्थिनींचा काळा बुरखा परिधान करून शाळा-महाविद्यालयात येणे हा जर धार्मिक हक्क असेल, तर आम्हीही अंगावर भगवी शाल गुंडाळून येणार, अशी आक्रमक भूमिका हिंदुत्ववादी विद्यार्थी व हिंदू संघटनांनी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यात शांततेचे आवाहन केले असले तरी, त्यावर तोडगा शोधणे हे काही सोपे नाही याची जाणीव पोलीस व प्रशासनाला झाली असून केवळ पोलीस बळावर अशी संवेदनशील आंदोलने चिरडून टाकता येणार नाहीत, हेही सरकार समजून चुकले आहे.
मुस्लीम विद्यार्थिनी शाळा-महाविद्यालयात काळा बुरखा परिधान करून येतात, याला हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला आहे. शिक्षण संस्थांच्या ड्रेसकोडमध्ये हिजाब घालून येण्यास परवानगी आहे का, असा वाद निर्माण झाला आहे. हिजाबचा वाद गेल्या तीन दिवसांत राज्यभर पसरला असून हिंदू व मुस्लीम विद्यार्थी संघटना परस्परांच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. हिजाब विरुद्ध भगवा असा वाद पेटला असतानाच एका महाविद्यालयात तिरंगा ध्वजाच्या जागेवर भगवा फडकविण्यात आल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राज्यात वातावरण आणखी चिघळले आहे. हा वाद पेटविण्यास कोण जबाबदार आहे, याबाबत राज्य सरकार गप्प आहे. प्रथम शांतता निर्माण करणे व शैक्षणिक क्षेत्रात वातावरण चांगले ठेवणे महत्त्वाचे आहे, असे सांगत असले तरी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी कर्नाटकात हिजाबवरून वातावरण भडकविण्यास गजवा-ए हिंद ही संघटना कारणीभूत असल्याचे सांगून टाकले आहे. या संघटनेने राज्यातील जातीय वातावरण दूषित केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राज्य सरकार किंवा भाजप पक्ष या मुद्द्यावर अजून गप्प असताना एखादा केंद्रीय मंत्री एकदम असा कसा काय निष्कर्ष काढू शकतो, याचे अनेकांना मोठे आश्चर्य वाटले. हिजाब हा आमचा धार्मिक अधिकार आहे, हे सांगण्यासाठी चार मुस्लीम याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. तेव्हा न्यायमूर्तींनी स्पष्ट केले की, आम्ही कायद्यानुसारच या घटनेकडे बघू. कोणाच्या काय भावना आहेत, यापेक्षा कायदा महत्त्वाचा आहे. कायदा व संविधान जे सांगेल तोच आम्ही निवाडा देऊ. संविधान आमच्यासाठी भगवद् गीता आहे, हेही न्यायालयाने स्पष्ट केले. याचिकाकर्त्यांनी हिजाब हा धार्मिक अधिकार असल्याचे सांगताना कुराणच्या प्रतीही न्यायालयात सादर केल्या. हिजाबचा वाद हा काही प्रथमच कर्नाटकात उद्भवलेला नाही. यापूर्वी अनेकदा काळा बुरखा घालून शिक्षण संस्थात किंवा सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांना रोखण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यावरून अनेकदा वादळही निर्माण झाले आहे. या वर्षी १ जानेवारीला हिजाबवरून एका महाविद्यालयात ठिणगी उडाली होती. उडपीमधील एका महाविद्यालयात सहा विद्यार्थिनी हिजाब परिधान करून आल्या, तेव्हा त्यांना वर्गात प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला होता. महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने युनिफॉर्म पाॅलिसी तयार केली असल्याचे कारण त्यांना सांगण्यात आले. आम्हाला हिजाब परिधान करायला घटनेने मूलभूत धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे, अशी आक्रमक भूमिका मुस्लीम विद्यार्थिनींनी घेतली आहे. कर्नाटकातील कुंडापुरा महाविद्यालयात अठ्ठावीस विद्यार्थिनींनी काळा बुरखा घालून प्रवेश केला, तेव्हा पुन्हा हा वाद निर्माण झाला.
त्यांना महाविद्यालयात प्रवेश करण्यास रोखण्यात आले तेव्हा त्या मुस्लीम विद्यार्थिनींनी प्रवेशद्वारासमोरच धरणे धरले व आंदोलन पुकारले. त्याचा परिणाम हिंदू संघटनेचे विद्यार्थी अंगावर भगवी शाल परिधान करून व भगवी वस्त्रे फडकावत तेथे पोहोचले. जसा तुमचा हिजाबचा हक्क तसा आमचा भगव्याचा हक्क, असा संघर्ष सुरू झाला. मुस्लीम विद्यार्थिनींनी अंगावर पाहिजे तर भगवी शाल घ्यावी, असेही त्यांना सांगण्यात आले. ज्यांना काळा बुरखा घालून फिरायचे आहे व शिक्षण संस्थेत यायचे आहे, त्यांनी पाहिजे तर पाकिस्तानात निघून जावे, असे श्रीराम संघटनेने म्हटले आहे.
एकीकडे मुस्लीम विद्यार्थिनी प्रवेशद्वारावर काळा बुरखा घालून धरणे धरून बसल्या आहेत व दुसरीकडे अंगावर भगवा पट्टा किंवा भगवी शाल घालून हिंदू मुले वर्गात बसली आहेत, असे दृश्य कर्नाटकात दिसू लागले. सर्व विद्यार्थी समान आहेत, या भूमिकेतून काही शिक्षण संस्थांनी गणवेश धोरण जाहीर केले असले तरी त्याला छेद देण्याचे काम हिंदू व मुस्लीम संघटना करीत आहेत. राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतरच हिजाब व भगवा असा संघर्ष सुरू झाला, असा आरोप काँग्रेसने केला आहे.
हिजाबला काँग्रेस आणि जनता दल एसने पाठिंबा दिला आहे, तर भाजपच्या संघटना भगव्याचा पुरस्कार करीत आहेत. हिजाब परिधान केलेल्या एका विद्यार्थिनीकडे पाहून भगवी शाल घातलेल्या विद्यार्थ्यांच्या एका गटाने ‘जय श्रीराम’ अशा जोरदार घोषणा दिल्या व त्याला प्रत्युत्तर म्हणून त्या विद्यार्थिनीने ‘अल्ला हो अकबर’ अशा मोठ्या आवाजात घोषणा देऊन आपण माघार घेणार नाही, हे दाखवून दिले. जय श्रीराम विरुद्ध अल्ला हो अकबर असे घोषणा युद्ध सोशल मीडियावर व्हायरल झाले. या घोषणा युद्धापुढे बोम्मई सरकार हतबल झाल्याचे दिसले.