नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. काल मुंबईसह अनेक शहरात मोदी यांच्या वक्तव्याविरोधात काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले होते. आज नागपुरात केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाबाहेर दाखल झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीसह आंदोलन केले. तर, भाजप कार्यकर्तेही याठिकाणी जमले आणि त्यांच्याकडूनही विरोधात प्रदर्शन केल्याने येथे तणाव निर्माण झाला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत महाराष्ट्र काँग्रेसने संपूर्ण देशामध्ये कोरोना पसरवला असे वक्तव्य केले होते. या आरोपामुळे काँग्रेस संतापली आहे. जोपर्यंत मोदी माफी मागत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला होता. त्यानुसार नागपूरमध्ये हे आंदोलन करण्यात आले. परिस्थिती पाहता पोलिसांनी याठिकाणी तगडा बंदोबस्त लावला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात नारेबाजी करत निषेध व्यक्त केला. दरम्यान, काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे, आ. अभिजित वंजारी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.