मुंबई (प्रतिनिधी): ऑस्ट्रेलियाच्या २०२०-२१ दौऱ्यात बोर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पहिल्या कसोटीत मानहानिकारक पराभवानंतर कर्णधार विराट कोहली हा पितृत्व रजेवर गेला. त्यानंतर हंगामी कर्णधार अजिंक्य रहाणेने नेतृत्वाची जबाबदारी सांभाळताना भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. ऑन फिल्ड मी काही महत्त्वाचे निर्णय घेतले होते आणि त्यामुळे यश मिळालं. पण, श्रेय मात्र दुसऱ्यांनी लाटले, असा दावा अजिंक्यने बॅकस्टेज विथ बोरिया’ या कार्यक्रमात बोलताना केला.
मी त्या दौऱ्यावर काय केलं, हे मला माहित्येय. मला ते कुणाला सांगण्याची गरज नाही. तो माझा स्वभाव नाही. असे काही निर्णय होते ते मी ऑन फिल्ड किंवा ड्रेसिंग रुममध्ये घेतले होते, परंतु त्याचं श्रेय दुसऱ्यांनीच लाटले. माझ्यासाठी मालिका जिंकणे महत्त्वाचे होते, त्यापुढे या गोष्टी नगण्य आहेत. ती माझ्यासाठी ऐतिहासिक मालिका आहे आणि त्यामुळेच त्याचे महत्त्व विशेष आहे. त्या मालिकेनंतर जे मीडियासमोर जाऊन हा माझा निर्णय होता किंवा तो कलाटणी देणारा कॉल माझा होता, असा दावा करत होते, हे त्यांच्यासाठी आहे. मला माहित्येत की मी कोणते निर्णय घेतले आणि त्या निर्णयाचा रिझल्ट काय मिळाला. होय मी संघ व्यवस्थापनाशीही चर्चा केली, परंतु मी जे निर्णय मैदानावर घेतले. त्याचेही श्रेय इतरांनी घेतले. मी स्वतः बद्दल फार बोलत नाही किंवा कौतुकही करत नाही. पण, तिथे मी जे काय केले, ते मला माहीत आहे, असे अजिंक्य म्हणाला.
ऑस्ट्रेलियाच्या २०२०-२१ दौऱ्यावरील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पहिल्या कसोटीत मानहानिकारक पराभवानंतर कर्णधार विराट कोहली हा पितृत्व रजेवर गेला. त्यानंतर अजिंक्यने युवा शिलेदारांना सोबत घेऊन ही मालिका २-१ अशी जिंकली. सक्षम नेतृत्वाची जबाबदारी सांभाळताना भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. मालिका विजयानंतर फिरकीपटू आर. अश्विन याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्हन स्मिथ याला जाळ्यात अडकवून बाद केल्याचे श्रेय माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांना दिले होते.
भारताचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या कसोटी कारकिर्दीवर संकट आहे. सातत्यपूर्ण कामगिरीशी झगडणारा अजिंक्य आता रणजी करंडक स्पर्धेत खेळून पुन्हा दमदार पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. पण, आगामी श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे अजिंक्यने पूर्ण लक्ष रणजी करंडक स्पर्धेवर केंद्रीत केले आहे. आता सध्या संघाबाहेर असलेल्या ३३ वर्षीय अजिंक्यने मोठा दावा केला आहे.
अजूनही माझ्यात क्रिकेट शिल्लक
लोकं जेव्हा म्हणतात की माझं करियर आता संपलं आहे, तेव्हा मी फक्त हसतो. ज्यांना हा खेळ कळतो ते अशा वायफळ चर्चा कधीच करत नाहीत. कसोटी क्रिकेटमधील माझं योगदान सर्वांना माहित आहे आणि जे या खेळावर प्रेम करतात ते समंजसपणेच बोलतात. मला माझ्या क्षमतेवर विश्वास आहे. मी चांगली फलंदाजी करू शकतो आणि अजूनही माझ्यात चांगले क्रिकेट शिल्लक आहे, असे अजिंक्यने म्हटले आहे.