मुंबई : कर्नाटकात महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्यावरुन सुरु असलेल्या वादावर देशभरात आंदोलने करण्यात येत आहेत. या प्रकरणावरून महाराष्ट्रातही काही ठिकाणी हिजाब घालण्याचे समर्थन करत आंदोलने करण्यात येत आहेत. राज्य सरकारही हिजाबवरुन सुरु असलेल्या वादावर नजर ठेवून आहे. मात्र मुंबईतील माटुंगा येथील एमएमपी शाह महाविद्यालयामध्ये हिजाब, स्कार्फ किंवा घुंगटला बंदी असल्याचे निदर्शनास आले आहे.
मुंबईतील एसएनडीटी विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या माटुंगा येथील एमएमपी शाह कॉलेजमध्ये हिजाब, स्कार्फ आणि बुरखा घालून कॉलेजमध्ये प्रवेश करणाऱ्यांना बंदी आहे. महाविद्यालयाच्या नियमावली पुस्तिकेत यासंदर्भात उल्लेख करण्यात आला आहे. महाविद्यालयाची प्रतिष्ठा राखण्यासाठी विद्यार्थ्यांनी योग्य कपडे परिधान करावेत. कॉलेजच्या आवारात बुरखा/ घुंगट किंवा स्कार्फ घालण्यास सक्त मनाई आहे, असे कॉलेजने म्हटले आहे.
“मी आता यावर काही बोलू शकत नाही तुम्ही महाविद्यालयात येऊन मला भेटा. त्यानंतर मी तुम्हाला सविस्तर प्रतिक्रिया देईन. आमच्या महाविद्यालयाच्या नियमावली पुस्तिकेत ते आहे की नाही याबद्दल काहीही प्रतिक्रिया मी देणार नाही,” असे एमएमपी शाह कॉलेजच्या मुख्याध्यापकांनी सांगितले.
दरम्यान, राज्यातही हिजाब प्रकरणाचे पडसाद उमटल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याप्रकरणी भाष्य केले आहे. “आपण शाळेत, कॉलेजमध्ये जातो तेव्हा शिक्षणालाच प्राधान्य दिले पाहिजे. शैक्षणिक संस्थाचे जे नियम असतील ते सर्वांनी पाळले पाहिजेत. माझी सगळ्यांना विनंती आहे की दुसऱ्या राज्यामध्ये घडणाऱ्या एखाद्या घटनेवरुन महाराष्ट्रात आंदोलन करुन समाजात अशांतता निर्माण करणे राज्याच्या हिताचे नाही. राजकीय फायद्यासाठी अशा प्रकारचे आंदोलन करणे योग्य नाही. मी सर्वांना आवाहन करतो की शांतता ठेवण्यासाठी प्रयत्न करावा,” असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.