पणजी : संजय राऊत हे व्हिक्टि्म कार्ड खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. गिधाडांच्या धमक्यांना सिंह घाबरत नाही, असे चोख प्रत्युत्तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या आरोपांना दिले आहे. संजय राऊत यांनी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत फडणवीस यांच्यावर आरोप केले होते. त्यावर उत्तर देत फडणवीस यांनी गोव्यातील पत्रकार परिषदेत राऊतांवर पलटवार केला आहे.
मोदींच्या सरकारमध्ये कुणाचाही बळी दिला जात नाही. राऊतांनी व्हिक्टिम कार्ड खेळणे सोडून दिले पाहिजे. संपादक असलेल्या संजय राऊतांचे व्क्तव्य हेडलाईनसाठी आहे. कोणत्या वक्तव्याची बातमी होणार हे त्यांना चांगले माहिती आहे. दिवसभर आपलेच नाव चर्चेत रहावे यासाठी राऊत दररोज सकाळी ९ वाजता मनोरंजन करत असतात. त्यांचे कोणीही मनावर घेत नाही. राऊतांच्या धमक्यांना कोणीही घाबरत नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले.