बंगळुरू : कर्नाटकमधील हिजाब प्रकरणाचे प्रतिसाद देशभर उमटू लागले आहेत. “बिकिनी असो, घुंगट असो, जीन्स असो, हिजाब असो किंवा डोक्यावर पदर घेणे असो, आपण काय घालायचे हे ठरवण्याचा अधिकार महिलांचा आहे. हा अधिकार भारतीय संविधानाने दिलेला आहे. महिलांचा छळ करणे थांबवा,” असे काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी ट्वीट करत म्हटले आहे.
उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात हिजाब परिधान केलेल्या मुस्लीम विद्यार्थीनींना प्रवेश नाकारण्यात आल्यापासून या वादाला तोंड फुटले आहे. कर्नाटकमधील अनेक शाळा आणि कॉलेजमध्ये हिजाब/बुरख्यावरुन वाद सुरू आहे. हा वाद आता न्यायालयात गेला असून, यावर सुनावणी होणार आहे.
एकीकडे मुस्लिम विद्यार्थिनी शाळा-कॉलेजमध्ये हिजाब परिधान करून आपला विरोध नोंदवत आहेत. तर हिंदू विद्यार्थी भगवे स्कार्फ घालून आपला विरोध नोंदवत आहेत.
कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाब वादावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनी ट्विटच्या शेवटी प्रियांकांनी ‘लडकी हूं, लड सकती हूं’ या मोहिमेचा हॅशटॅगही टाकला आहे.